रेशीम मार्गावरील ग्यान की दुकान…
युनान, मिस्र, रोमां सब मिट गए जहाँसे बाकी हैं अब तक नामोनिशां हमारा, असं म्हणणार्या इक्बालला चीनचा विसर पडला. भारत आणि चीन या दोन अतिप्राचीन संस्कृती आहेत. म्हणजे आजही त्या जिवंत आहेत. या देशांतील आजच्या भाषा, भूषा, केशरचना, खाद्य संस्कृती, आचार, विचार, परंपरा यांचं नातं थेट अतिप्राचीन काळात दाखवता येतं.
या दोन्ही संस्कृतींचा संबंध तिबेटशी आहे. तिबेटमध्ये शेकडो हिमशिखरं सात हजार मीटर्सपेक्षा उंच आहेत तर १३ पर्वतशिखरं आठ हजार मीटर्सपेक्षा उंच आहेत. जगातील ही सर्वात उत्तुंग पर्वतरांग आहे. एक लाख चौरस किलोमीटरवर ३५ हजार हिमनद्या असणारा तिबेट हा जगातला एकमेव प्रदेश आहे. ध्रुवीय प्रदेशानंतर गोड्या पाण्याचा एवढा मोठा साठा केवळ तिबेटमध्येच आहे. म्हणून तर तिबेटला आशियाचा वॉटर टॉवर म्हणतात. सिंधु, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या भारतीय उपखंडातील प्रमुख नद्या आणि त्यांच्या अनेक उपनद्या इथेच उगम पावतात. चीनमधील पीत नदी आणि यांगत्से या दोन प्रमुख नद्यांचे उगमही तिबेटमध्येच आहेत. या नद्या हिमालयातून वाहात येताना भरपूर गाळ घेऊन येतात. म्हणून या नद्यांची खोरी सुपीक आहेत. प्राचीन काळी शेती उत्पादन हाच प्रमुख स्त्रोत होता, केवळ खाण्यापिण्याचा नाही तर व्यापाराचा म्हणून सरकारी महसुलाचा. तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं त्यामुळे जनावरं आणि माणसांशिवाय शेती उत्पादन वाढवणं अशक्य होतं. म्हणून प्राचीन काळापासून चीन आणि भारत या दोन्ही देशांची लोकसंख्या प्रचंड होती. पाकिस्तानची निम्मी लोकसंख्या पंजाबात म्हणजे सिंधु नदीच्या खोर्यात आहे. तर भारतातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता गंगा-यमुनेच्या खोर्यात म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालात आहे. अवघा बांग्ला देश म्हणजे गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश आहे.
शेती उत्पादनामुळे हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांनी व्यापारात मुसंडी मारली. धान्य, मसाल्याचे पदार्थ, सुती वस्त्रं ही भारताची मिरासदारी होती तर रेशीम आणि चिनीमातीची अर्थात सिरॅमिकची भांडी हे चीनची खासियत होती. त्यापैकी तलम आणि झगमगतं रेशीम हे अचंबित करणारं उत्पादन होतं. भारत आणि चीन हे दोनच देश पक्क्या मालाचा पुरवठा करणारे होते. त्यामुळे हे दोन्ही देश प्राचीन काळी संपन्न होते. त्यांचा माल ज्या मार्गांनी मध्य आशियात आणि तिथून पुढे युरोपपर्यंत जात असे त्याला म्हणतात रेशीम मार्ग. जलमार्ग आणि खुष्कीचे मार्ग यांच्या जाळ्याला म्हणतात रेशीम मार्ग. तो एक महामार्ग नाही. परंतु इतिहासपूर्व कालापासून हा रेशीम मार्ग अस्तित्वात होता असं मानलं जातं.
राष्ट्रांच्या सीमा नेहमीच बदलत असतात पण देशाच्या सीमा बदलत नाहीत. कारण देशाच्या सीमा भूगोल, भाषा व संस्कृती निश्चित करतात. चीनमधील रेशीम आणि रेशमाचं तंत्रज्ञान व्यापारी मार्गावरून पार युरोपपर्यंत गेलं. साखर आणि साखरेचं तंत्रज्ञान भारतातून पश्चिम आशियात जेरूसलेमपर्यंत गेलं. अफगाणिस्तानातून हिंग आणि इराणमधून केशर आपल्या देशात आलं. चीन मधील सफरचंद, पीच ही फळं युरोपात गेली. कलिंगड, डाळिंब, द्राक्ष मध्य आशियातून भारतात आली. सामोसा उझबेकिस्तानातला. त्याला तिथे म्हणतात साम्सा.
भारतातला बौद्ध धर्म तिबेट, मध्य आशिया या मार्गाने चीनमध्ये पोचला. अरबस्थानातील इस्लाम समुद्रमार्गे भारत, चीन, मलेशिया, इंडोनेशिया मार्गे चीनच्या बंदरांमध्ये दाखल झाला. तुर्कस्तानातला इस्लाम इराक, इराण, अफगाणिस्तान म्हणजे मध्य आशियातून हिंदुस्तान आणि चीनपर्यंत गेला. चीनमधला कागद, भारतातील अंकपद्धती, गणित, आयुर्वेद याच मार्गाने पश्चिम आशिया आणि तिथून युरोपपर्यंत गेलं. स्फोटाच्या दारूचा शोध चीनमधला. हिंदुस्तानात तोफखाना आणला बाबराने.
चीनमधून निघणारा रेशीममार्ग सिकीयांग प्रांतातून जातो. एका हाताला गोबीचं वाळवंट तर दुसर्या हाताला तिबेट यांच्यामध्ये आहे सिकीयांग. आजही तिबेट आणि सिकियांग हे स्वायत्त प्रांत आहेत, निदान कागदोपत्री. प्रत्यक्षात हे दोन्ही प्रदेश चीनच्या अधिपत्याखाली आहेत. सिकियांगमध्ये मुसलमानांची, म्हणजे तुर्की मुसलमानांची संख्या अधिक आहे तर तिबेटमध्ये तिबेटी बुद्धधर्माचं पालन केलं जातं. या दोन प्रांताच्या पूर्वेला मेनलँण्ड चायना वा चीनची मुख्यभूमी आहे. तिबेट आणि सिकीयांग या दोन्ही प्रांतांमध्ये फुटीरतावादी आंदोलनं अधून-मधून डोकं वर काढत असतात. या दोन प्रांतांतील पायाभूत सुविधा आणि सैन्यदलं यांच्यावर चीनला प्रचंड खर्च करावा लागतो. प्राचीन रेशीमार्गाची नव्याने आखणी केली तर चीनच्या वस्तूंना मध्य आशिया आणि युरोपची बाजारपेठ मिळवणं शक्य होईल; तिबेट आणि सिकीयांग हे दोन प्रांत चीनमध्ये एकात्म करण्याची करण्याचा प्रश्नही सुटेल. दक्षिण आणि मध्य आशियावर चीनचं राजकीय वर्चस्व निर्माण होईल यासाठीही चीनने वन बेल्ट वन रोड, हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. चीनच्या या साम्राज्यवादी आकांक्षांची बीजं आणि भारतातील विविधतेची बीजंही भूगोलात आणि भूगोलाच्या राजकारणात आहेत. त्याचाच शोध या लेखमालेत घ्यायचा आहे.
रेशीममार्गावरून युवान श्वांगचं बोट धरून काही काळ आपण जाऊ. कारण हा बौद्ध भिक्षू याच मार्गावरून भारतात आला आणि त्याच मार्गाने माघारी गेला. त्याने आपल्या प्रवासाची सविस्तर हकीकत लिहून ठेवली आहे. त्याच्याशिवाय चेंगीजखान, तैमूरलंग, बाबर असे सेनापतीही सोबत करतील. रेशमासोबत दिग्विजयला बाहेर पडलेला चहाही भेटेल. पर्वतरांगा, नद्या, वाळवंट, गवताळ प्रदेश, हवामान आणि संस्कृती देश कसा घडवतात आणि देशाचं राष्ट्र व पुढे साम्राज्य कसं होतं हे जाणून घेण्यासाठी हा प्रवास करायचा आहे. प्रवासाच्या अखेरीस वाचकाला हिंदुस्तान वेगळा दिसू लागला तर ही लेखमाला सार्थकी लागेल.
हम लोगोंको समझ सको तो समझो दिलबरजानी,
जितना भी तुम समझोगे उतनी हो हैरानी….
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी.
खरंच खूप ज्ञान आहे या लेखात, पन वाचताना मजा आली, पुढील लेखनाची वाट पाहतोय…
लेख खूप आवडला सुनील सर
छान माहिती आहे
नेहमीप्रमाने खुप छान माहिती, धन्यवाद!
Ich entschuldige mich, aber meiner Meinung nach lassen Sie den Fehler zu.
fotos y videos zoogilia en 3gp
SIR u r magnet