चहाच्या पेल्यात बुडालेलं साम्राज्य.

शुएन सांग भारतात आला पामीरचं पठार ओलांडून. तो उतरला काश्मीरमध्ये. तिथे तो सहा महिने होता. हा रेशीम मार्गाचाच एक धागा होता. ही हकीकत इसवीसनाच्या सातव्या शतकातली. तिबेट आणि चीनमध्ये टांग घराण्याची सत्ता होती. तिबेट आणि चीनमध्ये  रेशीम मार्गावरील व्यापारावर नियंत्रण ठेवण्याची स्पर्धा  होती. तिबेटचा पसारा काश्मीर म्हणजे लेहलडाखपासून ते थेट आजच्या अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे. तिबेटच्या पूर्वेला चीनचा सिचुआन प्रांत आहे. त्याच्या खाली युनान. या प्रांतांवरही तिबेटच्या राजाचा डोळा होता. म्हणून टांग सम्राटाने तिबेटच्या राजाला आपली मुलगी देऊ केली. तिबेटच्या राजाची ती दुसरी बायको. तिने म्हणे तिबेटमध्ये दोन गोष्टी नेल्याबौद्ध धर्म आणि चहा.

तिबेटी बौद्धधर्माची गोष्ट

मैत्रेय नावाचा एक बोधिसत्व होऊन गेला. तो निर्वाणपदाला पोचला. देहत्याग करून जन्ममृत्युच्या फेर्यातून सुटायचा क्षण जवळ आला. त्यावेळी मैत्रेयाच्या डोक्यात विचार आला की आपण निर्वाणाला पोचलो असलो तरीही लाखोकरोडो लोक दुःखमुक्त झालेले नाहीत. पृथ्वीवरील शेवटचा माणूस दुःखमुक्त होईपर्यंत मी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन दुःखमुक्तीचा उपदेश करेन, अशी प्रतिज्ञा मैत्रेयाने केली. ह्या मैत्रेयाला तिबेटी बुद्धधर्मात म्हणतात अवलोकितेश्वर. तिबेटी बुद्ध धर्माचे हे वैशिष्ट्य आहे. त्याच्या भोवती धर्म संघटना, कर्मकांड आणि राज्यव्यवस्था गुंफली गेली आहे. दलाई लामा अवलोकितेश्वराचा अवतार आहे अशी समजूत वा मान्यता आहे.

चीनची राजकन्या पद्मसंभव बौद्धाची प्रतिमा घेऊन आली होती. तिबेटच्या राजाने हा धर्म स्वीकारला. पुढे बौद्ध धर्म केवळ तिबेटमध्येच नाही तर रेशीम मार्गावरचा महत्वाचा धर्म बनला. अनेक जमातींनी या धर्माचा स्वीकार केला. तेराव्या शतकात मंगोल आक्रमकांनी तिबेट पादाक्रांत केला. मंगोल बादशहा कुबलाई खानाने एका तिबेटी बौद्ध भिक्षूला राजगुरू म्हणून घोषित केलं. तिबेट आणि मंगोल साम्राज्याचा धर्म राखण्याची जबाबदारी या राजगुरूवर सोपवण्यात आली होती. त्यातून पुढे दलाई लामा हे पद निर्माण झालं. असो.

चहाची गोष्ट

तिबेटला जगाचं छप्पर म्हणतात, पृथ्वीचा तिसरा ध्रुव असंही म्हणतात. कारण ध्रुवीय प्रदेश वगळता बर्फाचं सर्वाधिक आवरण तिबेटमध्ये आहे. समुद्र सपाटीपासून ४००० मीटर उंचीवर आहे तिबेट. म्हणून त्याला हिमालय वा लँण्ड ऑफ स्नो असंही म्हणतात. भारतीय उपखंड युरेशियाला धडकल्यानंतर हिमालयाची पर्वतरांग तयार झाली. भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली घुसली. त्यामुळे तिबेट अधिक उंच झालं. त्यामुळे भारताच्या बाजूने अगदी काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत उंच उभा कडा ओलांडला की मग तिबेटचं पठार सुरू होतं. तिबेटच्या मध्यभागी उभं राह्यलो तर ईशान्य आणि आग्नेय दिशेला ह्या पठाराचा उतार आहे. त्यापैकी ईशान्य दिशेचा प्रांत आम्दो (Amdo) वा चिनी भाषेत चिंघाय (Qinghai), पूर्वदक्षिणेला (आग्नेय) आहे खांग्पा (Kham). आणि तिबेटचं पठार म्हणजे पश्चिम आणि मध्य तिबेट. ल्हासा ही तिबेटची राजधानी या प्रदेशात आहे. ह्या प्रदेशाच्या दक्षिणेला आहे भारत आणि नेपाळ. आजचे दलाई लामा आम्दो वा चिंघाय प्रांतातले आहेत. या प्रांतात पीत नदीचा(हांग हो) उगम आहे. आम्दो आणि खांग्पा हे तिबेटचे भाग असले तरीही तेथील तिबेटी जमातींमध्ये ल्हासाच्या सत्तेबद्दल फारशी आपुलकी नव्हती. आम्दो आणि खांग्पा यांची भौगोलिक रचना आणि जीवनपद्धती मध्य आणि पश्चिम तिबेटपेक्षा खूप वेगळी आहे. तिबेट राज्यावर चढाई करणार्या कम्युनिस्ट चीनच्या लालसेनेला त्यांचा पाठिंबाच होता.

पश्चिम आणि मध्य तिबेटचं हवामान कमालीचं थंड आणि कोरडं आहे. त्यामुळे खुरट्या गवताशिवाय तिथे फारशा वनस्पती नाहीत. बार्ले म्हणजे जवाची शेती आणि पशुपालन हाच तिथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय. त्यात शेती तर पोटापुरतीही होत नाही. त्यामुळे तिबेटी जनजीवन प्रामुख्याने भटक्या जमातींचं आहे. या जमातींतले लोक याक, घोडे, शेळ्या, मेंढ्या यांचे कळप घेऊन गवताच्या शोधात भटकंती करणारे. त्याशिवाय व्यापार होताच. याकचं दूध, लोणी आणि मांस हा त्यांचा मुख्य आहार. वनस्पती नाहीतच. याकचं दूध वा लोणी विकायचं त्याबदल्यात बार्ले, मका आणि अन्य जिन्नस घ्यायचे. कुटुंबातला एक पुरुष सतत भटकंती करणारा. त्यामुळे दोन किंवा तीन भावांनी एका बाईशी विवाह करण्याची चाल होती. पांडव तिबेटमधून आले असा कच्चा सिद्धांत इतिहासाचार्य राजवाड्यांनी म्हणूनच नोंदवला आहे. आजही हिमाचल प्रदेशातील शेतकरीपशुपालक समुहांमध्ये दोन भावांनी एका बाईशी लग्न करण्याची प्रथा आहे. असो.

चीनचा युनान प्रांत म्यानमार आणि लाओस यांना खेटून आहे. हा डोंगराळ प्रदेश आहे. त्याचाही संबंध युरेशियन प्लेटला भारतीय उपखंड धडकला याच्याशी आहे. या भूस्तरीय रचनेमुळे भारतीय उपखंडात नैऋत्य मॉन्सूनचं चक्र सुरू झालं. चीनच्या या भागात पूर्व आशियाई मॉन्सूनचं चक्र सुरू झालं. त्यामुळे तिथली हवा उष्णदमट आहे. हे हवामान चहाच्या झाडांना मानवणारं आहे.

युनान प्रांतातल्या जंगलात चहाचे वृक्ष आहेत. शेकडो वा हजारो वर्षांचे. तिथल्या आदिवासी जमातींमध्ये चहा ही ईश्वराची देणगी मानली जाते. दरवर्षी मार्च महिन्यात चहाच्या वृक्षाची पूजा केली जाते, कोंबडीचा बळी दिला जातो. प्रत्येक जमातीचा चहा देव आहे. चहाच्या पानांचा नैवेद्य त्याला दाखवला जातो. ब्लांग जमातीला म्हणे ईश्वराने पहिल्यांदा चहाची चव दिली. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी असं म्हटलं जातं. ह्या आदिवासी जमाती झाडावर चढून चहाची कोवळी पान खुडतात, दगडावर भाजतात आणि मग उकळत्या पाण्यात टाकून तो चहा पितात. चहा पिण्याचा हा सोहळा शतकानुशतके सुरू आहे.

पुअर चहा जगातला सर्वश्रेष्ठ चहा समजला जातो. त्या चहाची चव आणि स्वाद लाजबाब आहे असं मानलं जातं. पुअर चहा जितका जुना तितका मौल्यवान. असा चहा विक्रीला येत नाही पण आलाच तर ५०० ग्रॅम चहाला एक लाख डॉलर्स मोजावे लागतात. पुअर चहावर आजही पारंपारिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. भाजलेली चहाची पानं दगडावर उभं राहून वाटली जातात. चहा पानांच्या भाकया बनतात. या भाकया घोड्यावर लादून दाली या शहरात आणल्या जात. तिथून या चहाचा प्रवास सुरू व्हायचा ल्हासाच्या दिशेने. सुमारे पाच हजार किलोमीटर लांबीचा रस्ता. हेंगडुआन पर्वतरांग पार केली की तिबेटचं पठार सुरू होतं. डाली ते तिबेटचं पठार हा प्रवास चहाचे बोजे माणसांच्या पाठीवरून करायचे आणि पुढे घोड्यांच्या पाठीवरून. हा रस्ता इतका दुर्गम आणि खडतर आहे की लोक म्हणायचे केवळ उंदीर आणि पाखरंच या रस्त्यावरून जाऊ शकतात. अनेक घोडे, माणसं खोल दरीत पडून मरायची. भटक्या व्यापार्यांनी हा रस्ता बनवला म्हणे. आता हाच रस्ता मोटार रस्ता बनला आहे. चहाने भरलेले ट्रक या रस्त्यावरून ल्हासाला जातात. तिथून चहा तिबेटच्या कानाकोपर्यात जातो. प्राचीन काळी हाच चहा ल्हासावरून तिबेटच्या कानाकोपयात आणि त्याशिवाय नेपाळ भारतात यायचा. नथुला खिंडीतून जाणाऱ्या रस्त्याला रेशीम मार्गाचा धागा समजलं जातं. काही वर्षांपूर्वीच ही खिंड व्यापारासाठी खुली करण्यात आली. दार्जिलिंग चहा आणि आसाम चहा या चहाच्या भारतीय जाती आहेत. नथूला खिंडीपासून हे प्रदेश फारसे दूर नाहीत. चहा हे आदिवासींचं पेय होतं. चीनच्या सम्राटाला ते नजराणा म्हणून देण्यात आलं. त्यानंतर चहाची मिजास वाढली.

तिबेटी लोकांच्या आहारात वनस्पती नाहीत त्यामुळे जीवनसत्वांचा पुरवठा केवळ चहामधूनच होतो. हाडं फोडणार्या थंडीत उकळलेल्या चहात याकचं लोणी घुसळून चिमूटभर मीठ टाकायचं, की झाला तिबेटी चहा. दिवसाला ५० कप चहा पितात तिबेटी लोक. या चहाच्या व्यसनापायी तिबेटी राज्य खिळखिळं झालं. तिबेटी लोकांना चहा हवा होता तर चिनी सम्राटांना तिबेटी घोडे हवे होते. कारण तिबेटी घोडे विलक्षण काटक आणि वेगवान समजले जात. मंगोल आक्रमकांशी लढण्यासाठी चिनी सम्राटांना घोड्यांची गरज होती. चहाचा सर्व व्यापार चिनी सम्राटांनी ताब्यात घेतला होता. साँग राजघराण्याच्या काळात एका घोड्याला एक किलो चहा असा दर होता. मिंग घराण्याने हाच दर ६०७० ग्रॅमवर आणला. चहा महाग झाला आणि घोडे स्वस्त. पण तिबेटी लोकांना चहाचं व्यसन लागलं होतं. घोडे एवढ्या स्वस्त किंमतीला विकले गेल्याने तिबेटी राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. लष्करी शक्तीवर विपरीत परिणाम झाला. आणि ते साम्राज्य कोसळलं. तिबेट चीनचं अंकित राष्ट्र बनलं पुढे मंगोलांनी तिबेटवर राज्य केलं. त्यानंतर पुन्हा तिबेट चीनच्या आश्रयाला गेलं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनने तिबेटवरची पकड घट्ट केली.

तिबेटी राष्ट्रवाद हा मूलतः वांशिक म्हणजे जमातीचा, भटक्या जमातीचा राष्ट्रवाद आहे. आधुनिक राष्ट्रराज्य हा त्याचा आधार नाही. धर्म हा त्याचा आधार आहे. म्हणून तर दलाई लामा या राष्ट्रवादाच्या केंद्रस्थानी आहे. ल्हासा हे तिबेटचं धार्मिक आणि राजकीय केंद्र आहे. तिबेटी लोकांचं ते तीर्थस्थळही आहे. अतिशय दुर्गम भागातून शेकडो किलोमीटरची खडतर यात्रा लोटांगण वा साष्टांग नमस्कार घालत पूर्ण करणारे अनेक गरीब तिबेटी आजही आहेत. या यात्रेमध्ये अनेक तिबेटी त्यांच्या भोजननिवासाची सोय करतात, रस्त्यावरील वाहनांचे चालक त्यांना पैसे वा दक्षिणा देतात. त्यातून तिबेटी समूहाचा एकोपा घट्ट होतो. आज ना उद्या कधीतरी तिबेट स्वतंत्र राष्ट्र होईल ही भावना प्रत्येक तिबेटीच्या हृदयात तेवत राहते.

सुनिल तांबे –

Leave A Reply

Your email address will not be published.