रेशीम मार्ग – कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म.

चीन नावाचं एक राजघराणं होतं. या राजघराण्याने आजच्या चीनमधील विविध प्रांतांतील राजांचा पराभव करून चीनचं एकत्रीकरण केलं म्हणजे साम्राज्य स्थापन केलं. इसवीसन पूर्व ३ र्‍या शतकात. म्हणून देशाचं नाव चीन.

ची हु आंग डी हा चीनचा पहिला सम्राट. त्याने सर्व छोटे-मोठे राजे, सामंतशहा यांची हकालपट्टी केली. प्रबळ केंद्रसत्ता स्थापन केली. चिनी भाषा, वजनं-मापं यांचं प्रमाणीकरण केलं. मिंग नदीला बांध घालून, कालवे काढून पूर आणि दुष्काळावर नियंत्रण मिळवलं. नवं युद्धतंत्र विकसित केलं. शेती आणि उद्योगांचा विकास केला. चीनची जगप्रसिद्ध भिंत बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्याने हाती घेतला. त्याच्या आधीच्या छोट्या राज्यांनी आपआपल्या राज्याच्या संरक्षणासाठी भिंती बांधल्या होत्या. परंतु पहिल्या सम्राटाने उत्तरेकडून होणार्‍या मंगोल टोळ्यांच्या आक्रमणापासून बचाव करण्याकरता हजारो किलोमीटर लांबीची भिंत बांधण्याचं काम सुरू केलं. शेळ्या, मेंढ्या, घोडे, उंट पाळणारे म्हणजे मागासलेले पशुपालक भिंतीच्या पल्याड तर शेती करणारे प्रगत चिनी भिंतीच्या अल्याड, अशी विभागणी त्याने केली.

हा सम्राट कमालीचा जुलमी आणि निर्दय होता. भिंत बांधण्याच्या कामावर त्यावेळच्या चीनमधील एक पंचमांश लोकसंख्या राबत होती. स्त्री, पुरुष, मुलं. कडाक्याची थंडी, पाऊस यांचा मारा सहन करत हे अर्धपोटी, उपाशी लोक राबत होते. लाखो लोक जायबंदी झाले, काम करताना लाखो मेले. त्यांची प्रेतं भिंतीतच गाडण्यात आली. या सम्राटाला मेल्यानंतरही आपली चतुरंगी सेना सोबत हवी होती. म्हणून तर त्याने आपल्या कबरीमध्ये हजारो मातीचे सैनिक ठेवण्याचा आदेश दिला. त्या कामासाठी काही हजार कारागीर काही दशकं राबत होते. अमर होण्याचा ध्यास घेतला होता या सम्राटाने. त्यासाठी एक खास औषधी बनवण्यात आली. पण त्याचा परिणाम नेमका उलट झाला. ते औषध प्याल्यावर सम्राटाचा मृत्यू झाला. या सम्राटाच्या जुलमी कारभाराला प्रजा विटली होती. त्याच्या मृत्यूनंतर प्रजेने बंड केलं. आणि हान घराणं सिहांसनावर आरुढ झालं.

गौतम बुद्ध आणि कन्फ्युशिअस हे समकालीन होते. म्हणजे इसवीसनपूर्व पाचव्या शतकातले. या काळात चीनमध्ये अंदाधुंदी माजली होती. अनेक छोटे-मोठे राजे, सरंजामदार यांची सत्ता होती. त्यांच्या आपआपसांमधील युद्धामुळे राजकीय-सामाजिक व्यवस्था खिळखिळी झाली होती. राजकीय, सामाजिक, नैतिक अधःपतनाच्या काळात सद्गुणी होणं शक्य आहे असा कन्फ्युशिअसचा ठाम विश्वास होता. या परिस्थितीत सद्गुणी कसं होता येईल या प्रश्नाच्या उत्तराचा शोध तो घेऊ लागला.

त्याकाळात ताओ दर्शन (तत्वज्ञान) चीनमध्ये लोकप्रिय होतं. ताओ दर्शनाची धारणा अशी की मानवी समाज ही एक कृत्रिम व्यवस्था आहे. आनंदी राह्यचं असेल तर निसर्गानुकूल व्यवहारांची कास धरायला हवी. निसर्गाशी एकरुप झाल्यानेच माणूस आनंदी होऊ शकतो. कन्फ्युशिअसला हे मान्य नव्हतं. माणूस म्हणजे प्राणी वा पक्षी वा झाड नाही, असं तो म्हणत असे. त्यावेळच्या चीनमध्ये सर्वशक्तीशाली देवाची कल्पना नव्हती. दोन नैसर्गिक शक्ती असतात अशी मान्यता होती. एक शक्ती म्हणजे ड्रॅगन. ही शक्ती स्वर्गाची आहे तर दुसरी शक्ती आहे भूमीची. या दोन शक्तींमध्ये समतोल साधणं, मेळ घालणं ह्यामध्ये मानवी जीवनाचं साफल्य आहे अशी मान्यता होती. या दर्शनानेही कन्फ्युशिअसचं समाधान झालं नाही. कारण त्यामधून सद्गुणी होण्याचा मार्ग दिसत नाही, राजकीय-सामाजिक व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाही, असं त्याचं म्हणणं होतं.

कन्फ्युशिअसने चिनी इतिहासाचा अभ्यास केला. कधीतरी प्राचीन काळात असं सुवर्णयुग होतं की ज्यामध्ये राजकीय आणि सामाजिक व्यवस्था उत्तम होत्या. त्या राज्यात सद्गुणांचा परिपोष होत असे. त्यामुळे सुख, समाधान आणि शांती नांदत होती. आनंद सर्वत्र भरून राह्यलेला होता. ती व्यवस्था पुन्हा निर्माण करायला हवी, अशी कन्फ्युशिअसची धारणा होती. ही व्यवस्था निर्माण करायची तर सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेची उतरंड अशी हवी की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्थानाची, त्या स्थानाबरोबर येणार्‍या कर्तव्यांची आणि जबाबदार्‍यांची जाणीव असेल, दडपशाही नाही तर परस्पर समजुतीने समाजाचे राजकीय व सामाजिक व्यवहार होतील.

ह्यामध्ये कर्मकांड वा विधींची भूमिका निर्णायक असते कारण शुद्ध हेतूने, निर्मळ मनाने विधी पार पाडले तर चारित्र्य निर्मिती होते, अशीही कन्फ्युशिअसची धारणा होती. कुटुंब हे मॉडेल तसं आहे असं तो सांगत असे. कुटुंबामध्ये पति-पत्नी, पिता-पुत्र, लहान-थोर अशी अनेक नाती असतात. नात्यांची उतरंड असते. प्रत्येकाला आपलं स्थान माहीत असतं. त्या स्थानानुसार प्रत्येक व्यक्तीचे हक्क, कर्तव्यं आणि जबाबदार्‍या निश्चित होतात. त्या पार पाडल्याने कुटुंब आनंदी, सुखी होतं. अशा कुटुंबाचा आधार प्रेम असतो. हे मॉडेल समाजाच्या राजकीय-सामाजिक व्यवस्थेला लागू करायला हवं, असं दर्शन वा तत्वज्ञान कन्फ्युशिअसने मांडलं.

सम्राटाला साक्षात स्वर्गातून सत्ता मिळाली आहे. सत्ता गाजवायचा त्यांना अधिकार आहे. मात्र सम्राटाचा प्रजेशी असणारा व्यवहार पिता-पुत्रांसारखा हवा. आपल्या मुलांप्रमाणे राजाने प्रजेचा सांभाळ करायला हवा. राजाने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली, प्रजेवर अन्याय, अत्याचार केले तर स्वर्ग त्याला धडा शिकवतो. महापूर येतात, दुष्काळ पडतात. कन्फ्युशिअस होहँग हे वा पीत नदीच्या खोर्‍यातला होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये महापूर आणि दुष्काळाचे संदर्भ देतो. जुलमी राजाच्या विरोधात प्रजा बंड करते, तो प्रजेचा अधिकार आहे असंही कन्फ्युशिअस बजावतो.

माणूस जन्मतःच सद्गगुणी नसतो. शिक्षणाने तो सद्गुणी बनतो. त्यामुळे स्थिर, समतोल, शाश्वत आणि आनंदी सामाजिक-राजकीय व्यवस्था निर्माण करायची तर शिक्षण अपरिहार्य आहे. शिक्षण घेतलेल्या शहाण्या माणसांच्या सल्ल्यानुसार राजाने राज्यकारभार करायला हवा, असं कन्फ्युशिअस सांगतो. कन्फ्युशिअसला अनेक शिष्य मिळाले. काही शिष्योत्तम सरकारी अंमलदारही झाले. परंतु कन्फ्युशिअसला राजाश्रय मिळाला नाही. आपल्याला स्वामी मिळणं आता शक्य नाही असं वृद्ध कन्फ्युशिअस म्हणत असे.  वयाच्या ७३ व्या वर्षी कन्फ्युशिअसचं निधन झालं.

चीन पहिल्या सम्राटाच्या मृत्यूनंतर हान घराण्याने सत्ता हाती घेतली. प्रजेवर जुलूम-जबरदस्ती केली तर प्रजा बंड करते, ह्या कन्फ्युशिअसच्या शिकवणुकीला त्यामुळे दुजोरा मिळाला. कन्फ्युशिअसचं महत्व हान सम्राटांच्या ध्यानी आलं. निष्ठा, इमान, प्रामाणिकपणा ही मूल्यं जनतेमध्ये रुजवायची तर कन्फ्युशिअसच्या शिकवणीनुसार राज्यकारभाराची घडी बसवण्याचा निर्णय नव्या सम्राटाने घेतला. सरकारी अधिकार्‍यांना कन्फ्युशिअसच्या विचारधनाचा अभ्यास सक्तीचा करण्यात आला. त्यासाठी शाळा काढण्यात आल्या. शिक्षण, विधी वा कर्मकांड आणि सद्गुण यांना महत्व प्राप्त झालं. समतोल आणि मेळ साधण्यामध्ये कला, साहित्य, संगीत यांना अनन्यसाधारण महत्व आहे अशी कन्फ्युशिअसची शिकवण होती. म्हणून कला-साहित्याला उत्तेजन देण्याचं धोरण राज्यव्यवस्थेने स्वीकारलं. कन्फ्युशिअस राजेशाहीचा धर्म बनला. संपूर्ण चीनमध्ये एक भाषा, एक चलन, वजनं-मापांचं प्रमाणीकरण, सरकारी अंमलदार आणि नोकर यांच्यासाठी प्रशिक्षणाची एक व्यवस्था आणि प्रस्थापित राजकीय-समाजिक घडीला मान्यता देणारं कन्फ्युशिअसचं दर्शन हे सर्व चीनमध्ये इसवीसनपूर्व काळात घडलं. थेट विसाव्या शतकातपर्यंत ही घडी कायम राह्यली होती.

१९११ मध्ये चीनमध्ये लोकशाही क्रांती झाली. सम्राटाची सत्ता उलथून टाकण्यात आली. लोकशाहीची मागणी करणार्‍या तरुणांनी कन्फ्युशिअसचा धिक्कार केला. १९५० च्या दशकात माओ झेडाँगच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट क्रांतीने कन्फ्युशिअसच्या शिकवणुकीवर हल्ला चढवला. लाल सैनिकांनी कन्फ्युशिअसचे पुतळे फोडले, मंदिरं तोडली, ग्रंथ जाळून टाकले. त्याची कबर तोडली.

२१ व्या शतकामध्ये पारंपारिक चिनी म्हणजे कन्फ्युशिअसच्या शिक्षणविचारावर आधारीत हजारो शाळा चीनमध्ये सुरु झाल्या आहेत. चीन अजूनही स्वतःल कम्युनिस्ट म्हणवतो पण शी जिन पिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचा साम्राज्य विस्तार सुरू झाला आहे. वन बेल्ट वन रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्दिष्ट तेच आहे. त्यामुळे कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म होतो आहे.

 

सुनिल तांबे यांच्या “ग्यान की दुकानचा” पहिला भाग वाचण्यासाठी क्लिक करा

रेशीम मार्ग: होहॅंग हे आणि यांगत्झे.

1 Comment
 1. Babasaheb says

  .
  कुटुंबात उतरंड असते..
  प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीनुसार वागतो..
  त्यामुळे सर्वत्र आनंद असतो..
  .
  पण कुटुंबातील आनंदाचं खरं कारण म्हणजे
  दुसऱ्याने पार पाडलेल्या जबाबदारीतुन मला आनंद मिळतो म्हणून मी माझी जबाबदारी आनंदाने पार पाडतो..
  .
  आणि दुसरं असं की एखाद्या स्थानाबद्दल हेवा जरी वाटला तरी सहसा ते स्थान प्राप्त स्वतःला प्राप्त होण्याची शाश्वतीही बरीच असते..
  .
  उदा. भविष्यात मुलगा बाप होऊ शकतो, मुलगी आई होऊ शकते..
  सध्याच्या आईबापांनीही जुन्या भूमिका निभावलेल्या असतातच..!

Leave A Reply

Your email address will not be published.