चहा पिणे हे पाप समजलं जायचं त्या काळात त्यांनी महाराष्ट्राचा चहा ब्रँड बनवला..

स्वातंत्र्यापूर्वी काळ. इंग्रजानी भारतात आणलेला चहा पिणे हे त्याकाळी पाप समजलं जायचं. कोणाला वाटायचं त्यामुळे धर्म बाटतो तर कोणाला वाटायचं ते विष आहे. सगळ्यात मोठा परिणाम तर गांधीजींच्या स्वदेशी चळवळीने केला होता. सात्विक अहिंसक विचारांचे गांधीजी चहाचे देखील विरोधक होते.

चहा म्हणजे एखाद्या नशेडी लोकांचे पेय असंच त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं.

भारतात चहाचे मळे रुजले होते मात्र चहा पिणे रुजले नव्हते.

महाराष्ट्रात तरी हि परिस्थिती बदलली शिवराम हरी गद्रेंनी.

गद्रे मूळचे कोकणातल्या देवरूखचे. वडील शिक्षक. सोबत किराणा मालाचं दुकान चालवायचे. अत्यंत सचोटीने व्यवसाय करणारे म्हणून हरी गद्रे यांना ओळखलं जायचं. त्यांच्या मुलांपैकी फक्त शिवराम उर्फ नाना हे इंग्रजी चौथी पर्यंत शिकले. पण लवकरच त्यांनी सुद्धा शिक्षण सोडलं आणि वडिलांच्या व्यवसायात उतरले.

त्यांचा मोठा भाऊ अनंत हरी गद्रे यांना कोकणात झुणका भाकर गद्रे म्हणून ओळखलं जायचं. टिळक भक्त असणारे हे समतावादी होते. त्या वेळी सत्यनारायणाची पूजा घालायचे आणि सत्यनारायणाच्या पूजेनंतर सार्वजनिक सहभोजन आयोजित करायचे.

सहभोजनाचं वैशिष्ट्य असे की, त्या सहभोजनाला जात-पात, धर्म कसल्याही प्रकारचा विचार न करता सगळ्यांनी एका पंक्तीत बसायचं आणि जेवायचं. जेवणाचा बेत झुणका-भाकर असायचा. म्हणून त्यांना गाडगे बाबानी समतानंद हि पदवी दिली.

अनंत गद्रे हे पत्रकार होते. त्यांनी आपल्या धाकट्या दोन्ही बंधूसह म्हणजेच दामोदर आणि शिवराम यांच्या सोबत मुंबईत त्यांनी मौज प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली. आचार्य अत्रेंचं ‘झेंडूची फुले’ आणि ‘कऱ्हेचे पाणी’ ही त्यांचीच प्रकाशनं. वि.स.खांडेकर यांना देखील लेखनात त्यांनीच आणलं.  पण मन सामाजिक कार्याकडे ओढत असल्यामुळे त्यांनी ‘मौज’ प्रकाशन , त्यांचे परममित्र श्री. पु. भागवत यांना विकले.

वयाच्या पंधराव्या वर्षी व्यवसायात उतरलेल्या शिवराम उर्फ नाना यांच्याकडे व्यापारी डोकं होतं.

त्यांनी संगमेश्वरमध्ये होलसेल व्यापारी म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याकाळात देखील या व्यवसायात गुजराती मारवाडी यांचं प्रमाण मोठं होतं. ते मोठ्या प्रमाणात माळ घ्यायचे आणि कमी किंमतीत विकायचे. नानांनी देखील आपली खरेदीची पद्धत बदलून टाकली. चहा घ्यायचा ना कलकत्त्याला घ्यायचा. साखर घ्यायची ना, कराचीला घ्यायची. मसाल्याचे पदार्थ घ्यायचे ना, कोचीनला जाऊन घ्यायचे.

गद्रेंच वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रामाणिकतेवर सगळ्यांचा विश्वास असायचा. गद्रे कधी कोणाला फसवणार नाहीत हे त्यांच्या बद्दल बोललं जायचं.

शिवराम गद्रे यांचं व्यापारानिमित्त देशभर फिरणं व्हायचं. फिरताना त्यांचे डोळे कान उघड असायचं. जगात काय घडतंय, पुढे कोणते बदल होणार आहेत, काय ट्रेंडिंग आहे हे ओळखायचं कसब त्यांनी मिळवलं होतं. होलसेलमध्ये तांदूळ खरेदी करण्याच्या निमित्ताने ते ब्रह्मदेश आणि पूर्व भारतात जात असत. तेव्हा त्यांच्या व्यापारी नजरेनं चहाची सतत वाढणारी मागणी हेरली आणि कलकत्त्याला जाऊन चहाच्या लिलाव केंद्रातून चहा खरेदी सुरू केली.

docu0012 scaled

स्वतः गांधीवादी असूनही येता काळ हा गांधीवादाचा नाही हे त्यांनी ओळखलं होतं. चहा पिणे काही पाप नाही आणि तो पुढील काळात अतिशय लोकप्रिय होणार ते बघून त्यांनी याच व्यवसायात उडी घेतली. दोघा भावांच्या मिळून दामोदर शिवराम आणि कंपनी नावाची फर्म सुरु झाली.

सरकारने साखर खुली करायला लागल्यानंतर या चहाच्या व्यापाराला भरभराट येऊ लागली. त्या काळात चहा सुटा मिळायचा. नानांनी त्या काळामध्ये चहाचे पाऊच तयार करून ते विकायला सुरू केले. पुढे त्याच्यामध्ये मोठी ड्यूटी सुरू झाली मग त्यांनी बॅग करायला सुरुवात केली.

पूर्वी ते नुसते चहा विकायचे. नंतर त्यांनी ब्रँडिंग सिस्टिम आणली. ब्रँडिंग सिस्टिम म्हणजे आपला एक ब्रँड बाजारामध्ये रुजला पाहिजे आणि तो चालला पाहिजे. त्यांच्या चहाचा ‘एच. पी. गोल्ड’ नावाचा ब्रँड आहे हे ‘एच. पी.’ म्हणजे काय आहे? तर‘हरी पांडुरंग.’ म्हणजे आपल्या वडिलांचे नाव देऊन त्यांनी एच. पी. जी. म्हणजे एच. पी. गद्रे अशा नावावर आपला बँड सुरू केला.

फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशभरात एका भारतीयाने चहाचा ब्रँड बनवावा हे दुर्मिळ होतं. 

docu

कोकणात आंब्याचे व्यापारी आंबे विकत घेत नाहीत तर ते अख्खी बाग घेतात आणि त्यातून जेवढे आंबे येतील त्यातून आपला नफा कमवतात. नानांनी ते आयुष्यभर पाहिलं होतं. त्यांनी ते चहाच्या व्यापारात देखील अंमलात आणलं.

चहाच्या दर्जावरही आपलंच नियंत्रण हवं हे जाणून १९५०च्या दशकात तामिळनाडूतल्या कुन्नूर इथल्या चहाचे मळे त्यांनी  निगराणीसाठी घेतले. त्यांचा पुतण्या माधवराव हा तिथेच स्थायिक होऊन त्यांनी व्यवसाय वाढवला.

चहाचं हे क्षेत्र मराठी माणसांसाठी नवीन होतं. लिलाव, मोठमोठय़ा खरेद्या, वितरण या साऱ्यांवर गद्रेबंधूंनी प्रभुत्व मिळवलं, तरीही टी टेस्टिंग ही गोष्ट अपरिचितच होती. त्यात परावलंबित्व नको म्हणून वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी श्यामराव गद्रे कलकत्त्याला स्थायिक झाले.

त्यांनी अल्पावधीतच टी टेस्टिंग आणि ब्लेंडिंगमध्ये प्रावीण्य मिळवलं.

बदलत्या हवामानानुसार चहापत्तीची चव आणि दर्जा बदलत असतो. टेस्टिंग आणि ब्लेंडिंगमुळे त्यावर नियंत्रण राहतं. आपल्या व्यवसायाला फायदा व्हावा म्हणून गद्रे आसाममध्ये गुवाहाटी इथं स्थायिक होऊन त्यांनी १९७० ते १९९४ असं दीर्घकाळ आसाममध्ये वास्तव्य केलं.

बघता बघता एचपी चहाच साम्राज्य महाराष्ट्रभरात पसरलं. आपल्या सचोटी आणि सत्तर वर्षे सांभाळलेला दर्जा यामुळे दामोदर शिवराम कंपनीचा एच पी फक्त कोकणातच नाही तर ते अमेरिका, ब्रिटनलाही चहा निर्यात करण्यापर्यंत पोहचली आहे.

आज शेकडो कोटींची उलाढाल असूनही गद्रे कुटुंबीयांनी आपल्या यशाचा वाटा सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी देखील वापरला. नानासाहेब गद्रे हे हयात असताना  कोल्हापुरात रोटरी क्लब, जनता बँक याच्या माध्यमातून सामाजिक कार्यात कार्यरत होते. असं म्हणतात की बाबूराव धारवाडे यांनी केशवराव भोसले नाट्यगृहात शिवराम गद्रे यांचा  जो सत्कार केलेला होता त्याचं वर्णन त्या वेळी वर्तमानपत्रात आलं होतं की,

‘नाना उभे होते आणि नानांच्या टोपीपयर्तं हारांचा ढीग गेलेला होता. सहा फूट हारांचा ढीग .

त्यांनी व त्यांच्या वारसदारांनी कोल्हापूरच्या अनाथाश्रमापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत, करवीरनगरवाचन मंदिरापासून ते वेदपाठशालेपर्यंत आणि शिक्षण संस्थांपासून ते गायन समाज देवळ क्लबपर्यंत अनेक संस्थांच्या मदतीसाठी कायम हातभार लावला. व्यवसाय आणि समाजकार्य हे दोन्ही हातात हात घालून करता येते हे त्यांनी दाखवून दिलं .

स्वातंत्र्यलढ्याच्या पूर्वी पासून ते एकविसाव्या शतकापर्यंत आपला ब्रँड आणि गुणवत्ता तशीच राखलेली फार कमी उदाहरणे देशभरात आढळतील, महाराष्ट्राचा एच पी चहा यात मात्र आघाडीवर असेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.