विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..?

आचार्य विनोबा भावे.

महात्मा गांधींचे पटशिष्य. महात्मा गांधींनी ज्यावेळी असहकार चळवळीसाठी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करायचा निर्णय  घेतला त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती.

विनोबा हे खऱ्या अर्थाने गांधीजींच्या अध्यात्मिक तत्वज्ञानाचे वारसदार होते. विनोबांच्या वडिलांनी लहानपणीच आपली मुले गांधीजींना दान दिली होती. त्यामुळे गांधीजींच्याच प्रभावाखाली लहानचे मोठे झालेले विनोबा कट्टर गांधीवादी होते.

vinoba
गांधीजी आणि विनोबा

विनोबांचा जेव्हा कधी विषय निघतो त्यावेळी त्यांच्या आणीबाणीतील भूमिकेविषयी देखील चर्चा झडतात. विनोबांनी कसं आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हणत भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील या काळ्या कालखंडाची पाठराखण केली होती हे सांगताना त्यांची चेष्टा केली जाते.

आज विनोबांच्या जयंती दिनी हे समजून घेणं औचित्यपूर्ण ठरेल की विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..? म्हंटलं असेल तर का आणि नसेल म्हंटलं तर त्यांच्या नावासोबत हे अनुशासन पर्वाचं झेंगट नेमकं का जोडलं जातं..?

विनोबांचं मौनव्रत

मुळात आणीबाणी लागू करण्यात आली त्या दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी विनोबा आपल्या वर्षभराच्या मौनात होते. २५ डिसेंबर १९७४ रोजीच त्यांनी आपल्या मौनव्रतास सुरुवात केली होती, जे २५ डिसेंबर १९७५ पर्यंत चालणार होतं.

त्याकाळात इंदिरा गांधी आणि काँगेसकडून आणीबाणीच्या कालखंडास ‘अनुशासन पर्व’ असं संबोधण्यात येत असे. याचकाळात वसंतराव साठे विनोबांना भेटायला त्यांच्या पवनार येथील ब्रम्ह विद्या मंदिर येथील आश्रमात गेले होते. आणीबाणीविषयी विनोबांना नेमकं काय वाटतं याचा अंदाज घेणे हा या भेटीमागचा हेतू होता.

वसंतराव साठे यांच्याकडून ज्यावेळी याबाबतीत विचारणा झाली त्यावेळी मौनात असलेल्या विनोबांकडून  ‘अनुशासन पर्व..?’ असं प्रश्नार्थकपणे विचारणारी चिट्ठी वसंत साठे यांच्याकडे सरकवण्यात आली. या प्रश्नार्थक चिन्हाचा अर्थ काय होतो, हे इथं वेगळं सांगायला नको.

विनोबांचं त्यावेळी मोठं प्रस्थ होतं आणि आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी आणि आणीबाणीच्या विरोधात रस्त्यावर असणाऱ्या जे.पी. या दोन्ही नेत्यांना ते आदरणीय होते. आणीबाणी लादणारी काँग्रेस आणि विरोधातील आंदोलक या दोहो बाजूच्या लोकांना विनोबा आपल्या गोटात हवे होते.

‘विनोबा आपल्या बाजूने असणं’ हे आपल्या भूमिकेला असलेलं मोठंच नैतिक समर्थन असल्याचं ते द्योतक होतं !

वसंतराव साठेंची चलाखी

वसंतराव साठे हे मुरलेले राजकारणी होते. ही संधी त्यांनी साधली नसती तर नवलच. विनोबांच्या या चिट्ठीचा त्यांनी व्यवस्थित वापर करून घेतला. विनोबांच्या चिट्ठीतील प्रश्नचिन्ह काढून टाकत ही बातमी त्यांनी आकाशवाणीवरून चालवली. विनोबांचं आणीबाणीला समर्थन असल्याचा प्रचार आणि प्रसार त्यावेळी माध्यमांमधून करण्यात आला.

त्यावेळी माध्यमांवर सेन्सॉरशिप लागू असल्याने या बाबीची वस्तूनिष्ठता तपासण्यात आली नाही आणि विनोबांच्या नावे ‘अनुशासन पर्वाचा’ हा डाग लागला तो कायमचा. सरकारने आणि काँग्रेसने तर या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार केलाच पण विरोधात असलेल्या समाजवाद्यांनी देखील या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि ते विनोबांवर खट्टू झाले.

२५ डिसेंबर १९७५ रोजी म्हणजे आपल्या मौनव्रताला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी विनोबा त्यातून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी ‘अनुशासन पर्व’ शब्दाचा अर्थ समजावून सांगितला. हा शब्द शासनकार्त्यांशी संबंधित नसून, आचार्यांच्या अनुशासानाशी संबंधित होता, असं विनोबांनी सांगितलं.

राज्यकर्त्यांचं नव्हे, आचार्यांचं अनुशासन !

राज्यकर्त्यांचं अनुशासन नसतं तर ते ‘शासन’ असतं आणि आचार्यांचा उपदेश हा ‘अनुशासन’ असतो असं विनोबांनी सांगितलं. जगभरातील लोकांनी जर राज्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चालायचं ठरवलं तर या जगात कधीच सुख आणि शांती नांदणार नाही. याउलट आचार्यांच्या ‘अनुशासना’च्या मार्गानेच हे लक्ष्य साध्य केलं जाऊ शकतं, असा एकंदरीत विनोबांच्या सांगण्याचं सार होतं.

विनोबांच्या या स्पष्टीकरणाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. कदाचित तशी ती घेतली जाऊ दिली गेली नसेल, पण तेव्हाचपासून ‘अनुशासन पर्व’ हा शब्द विनोबांशी जोडला गेला, जो आजपर्यंत कायम आहे.

अजित बायस 

संदर्भ – विनोबा चरित्र 

 

Leave A Reply

Your email address will not be published.