हडपसर घोरपडी कोंढवा मुंढवा ही नावे कशी पडली?
उत्तरेत मराठेशाहीचा दरारा कायम करणारे दोन महत्वाचे सरदार घराणे म्हणजे शिंदे आणि होळकर. महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळे दिल्लीवरही मराठी सत्ता प्रस्थापित होऊ शकली.
पण उत्तर पेशवाईतील राजकारणामुळे हळूहळू या दोन्ही घराण्यात तंटे सुरू झाले.
इंदूरच्या गादीच्या वादातून पुण्याला आलेल्या दुसऱ्या मल्हारराव होळकर यांची दौलतराव शिंदेंनी हत्या केली. त्यांची गरोदर पत्नी जिजाबाई याना कैदेत टाकले. होळकरी साम्राज्य घशात घालण्याचा हा प्रयत्न होता. याला पेशव्यांचे अनुमोदन होते.
यशवंतराव होळकर म्हणजे दुसऱ्या मल्हारराव होळकरांचे सावत्र भाऊ. ते पराक्रमी होते. अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी खर्ड्याच्या लढाईत निजामाला पाणी चाखायला भाग पाडल होतं.
पण स्वकीयांच्या राजकारणामुळे त्यांना रानोमाळ भटकावे लागले.
यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यांस यशवंतरावांस कैद करण्यास भाग पाडले परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे तीनशे स्वारांसह चाकरीस राहिले.
पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य संपादन केले आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली.
दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता.
पेशवाईच्या गादीवर बसलेले दुसरे बाजीराव हे स्वभावाने चंचल व हलक्या कानाचे होते. त्यांचा बराचसा काळ विलासी जीवनात व्यतीत होत असे. दूरदृष्टी नसल्यामुळे त्यांनी घेतलेले अनेक निर्णय चुकले.
आपल्या दोन पराक्रमी सरदार घराण्यातील वाद मिटवण्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे होते मात्र तसे घडले नाही. यशवंतराव होळकरांनी केलेल्या काही मागण्या मान्य करून सामोपचाराने प्रश्न मिटवता आला असता.
सर्व मराठी सत्ता एकत्र आल्या असत्या तर इंग्रजांना भारतात स्थापने कधीही शक्य झाले नसते.
उलट यशवंतराव होळकर यांचे मोठे बंधू विठोजी होळकर यांना शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली.
यामुळे वेळ अशी आली की भावांच्या मृत्यूमुळे संतप्त झाले यशवंतराव होळकर भलेमोठे सैन्य घेऊन पुण्यावर चालून आले.
गेल्या कित्येक वर्षात पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यावर हल्ला करायचं धाडस झालं नव्हतं. पण आता दोन मराठी सेना एकमेकांच्या समोर उभ्या होत्या.
पेशव्याच्या बाजूने अर्थातच दौलतराव शिंदेंची सेना लढणार होती. दोन्ही बाजूला जवळपास लाखभर सैन्य होत. यात कवायती फौजा, तोफा, घोडदळ यांचा समावेश होता.
२५ ऑक्टोबर १८०२ ऐन दिवाळीच्या दिवशी युद्धाला तोंड फुटले.
घनघोर लढाई झाली. स्वतः जातीने लढाईत उतरून नेतृत्व करणाऱ्या यशवंतराव होळकरांच्या पराक्रमाने पराकाष्ठा केली. शिंदेंच्या कवायती फौजेला होळकर भारी पडू लागले.
संध्याकाळ पर्यंत दौलतराव शिंदेंचा मोठा पराभव झाला होता.
पर्वताच्या टेकडीवरून लढाईचे निरीक्षण करणाऱ्या बाजीराव पेशव्यांनी रागरंग ओळखून पुण्यातून पळ काढला.
हेच ते युद्ध जिथे दुसऱ्या बाजीरावास पळपुटा बाजीराव ही उपाधी मिळाली.
दोन्ही कडचे हजारो सैनिक ठार झाले होते. हा आकडा त्याकाळच्या मानाने देखील प्रचंड मोठा होता.
संपूर्ण पुण्यासाठी ही काळी दिवाळी ठरली. असे युद्ध त्यांनी न भूतो न भविष्यती पाहिले होते.
ही लढाई झाली ते ठिकाण म्हणजे कवडीचा माळ. तिथे मोठी लढाई झाली म्हणून या गावाचं नाव घोरपडी अस पडलं. मेलेल्या लोकांच्या मुंड्या टाकल्या ते ठिकाण मुंढवा तर हाड टाकली ते ठिकाण हडपसर.
युद्ध कैद्यांना यशवंतराव होळकरांनी जरेबंद करून ठेवल होतं ते ठिकाण कोंढवा म्हणून प्रसिद्ध झाले. मराठेशाहीच्या दुर्दैवी इतिहासाची साक्ष देत आजही ही गावे उभी आहेत.
संदर्भ- मराठा रियासत खंड आठवा गोविंद सखाराम सरदेसाई
हे ही वाच भिडू.
- खान तुटकी बोटे घेऊन दिल्लीला गेला पण जाताना पुण्याला स्वारगेट देऊन गेला.
- बोंबल्या गणपतीचा मोदी गणपती कसा झाला?
- काय आहे अप्पा बळवंत चौकाच्या नावामागची आख्यायिका?
धन्यवाद बोलभीडू, खूपच रोचक अशी माहिती आपण आम्हाला दिलीत, मला या नावांबद्दल आधीपासून जाणून घायचे होते …👌👌
येरवडा नाव कसे पडले त्याची माहीती द्यावी
मी येरवड्यात राहतो
no- 9657223896
पहिल्यांदाच ऐकतोय… खूपच रंजक माहीती दिलीत.. धन्यवाद..
Shewale wadi he kase tasech maratheshahit Shewale hote ka
What about Bhosari ?