मुंबईतल्या त्या रोगाच्या साथीत लाखों हिंदू मृत्यूमुखी पडले पण पारशी वाचले कारण…

एकोणीसाव शतक. भारतात इंग्रजांच राज्य होतं. गेल्या शंभर एक वर्षात इंग्रजांनी मुंबईला गजबलेल शहर बनवलं होतं. संपूर्ण देशातून लोक पोटापाण्याचा धंदा शोधत मुंबईला येत होते. लोकसंख्येचा आकडा प्रचंड प्रमाणातवाढत जाऊन १० लाखाच्या पार पोहचला होता. मुंबई खऱ्या अर्थाने भारताची आर्थिक राजधानी बनली होती.

अशात १८९६ हे साल उजाडलं ते मुंबईसाठी यमदूत बनूनच.

नुकतच मुंबईमध्ये भुयारी गटारी बनवल्या होत्या. भारतात आतापर्यंत उघडी गटारे आपल्या सवयीची होती. ही जमिनीखालून घातलेल्या पाईपेची गटारे रोगराई थांबवून मुंबईकरांचं आरोग्य सुधारतील असा त्याकाळच्या गव्हर्नरचा अंदाज होता. पण झालं उलटचं.

जुलै महिन्यात झालेल्या प्रचंड पावसाने मांडवी येथील धान्याची गोदामे भिजली आणि त्याबरोबर तिथे मोठ्याप्रमाणात असलेले उंदीर देखील मेले. हे मेलेले उंदीर मुंबईच्या बंद गटारीतून एक महाभयंकर रोग पसरवत होते.

त्याच नाव प्लेग.

प्लेग हा त्याकाळातला दुर्धर रोग होता. एकतर तो संसर्गजन्य होता. त्याच्यावर कोणताही उपाय नव्हता. शिवाय लोकांच्या अडाणीपणामुळे त्यात वाढच झाली होती.

सुरवातीला मान्डवीमध्ये असलेला हा रोग थोड्याच काळात सगळ्या मुंबईत पसरला. आधी फक्त ताप आलाय म्हणून झोपलेल्या पेशंटच्या काखेत प्लेगची गाठ दिसू लागायची.कुठलच औषध लागू पडत नव्हत. आठदहा दिवसात म्हणजे पेशंटचा मृत्यू ठरलेला.

सप्टेंबर १८९६ पर्यंत हा रोग मुंबईच्या कानाकोपऱ्यात पसरला. सरकारने प्लेगची साथ आहे हे अधिकृतरित्या घोषित केलं. जागोजागी औषध फवारणी सुरु झाली.रस्ते साफ करण्यात येऊ लागले. घरातही जंतुनाशक फवारणी अनिवार्य केली. अनेक कर्मठ लोक मात्र त्या औषध फवारणी करणार्यांना घरात घुसू देत नव्हते.

त्यांच्या घरात येण्याने धर्मभ्रष्ठ होतो असं त्यांचं म्हणण होतं.

भयंकर वेगाने प्लेग मुंबईत पसरू लागला. रोज शेकडो लोक मरत होते. अनेकांनी शहर सोडण्याचा निर्णय घेतला.

मात्र मुंबईतून हा रोग इतरत्र पसरू नये यासाठी बस रेल्वे जहाजे येथे वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय उतारूंना चढू देत नव्हते. गाव ओस पडल होतं. जिथे घरात प्रवेश दिला जात नाही तिथे लष्करी बळाचा वापर करून औषध फवारणी केली जात होती.

तरीही हा प्लेग आटोक्यात येत नव्हता.अखेर मुंबईच्या गव्हर्नर संडहर्स्टने तार करून एका खास व्यक्तीला बोलवून घेतल. त्याच नाव,

“डॉ. वाल्डेमेर हाफकिन”

तो मुळचा रशियन, जन्माने ज्यू. रशियामध्ये ज्यूंच्यावर तिथल्या राजाने अत्याचार सुरु केल्यावर पळून फ्रान्सला आला. पॅरीस मध्ये जगप्रसिद्ध संशोधक लुई पाश्चर यांच्या हाताखाली मदतनिस म्हणून लागला. तिथे वेगवेगळ्या रोगावर उपाय शोधण्यासाठी प्रचंड प्रयोग सुरु होते.

याच काळात लुई पाश्चर यांनी देवी या रोगावर लसीकरणाचा क्रांतिकारी शोध लावला.  

पुढच्या अनेक पिढ्यांवर उपकार करणाऱ्या लुई पास्चरचा हाफकिन हा पट्टशिष्य. कलकत्त्यात कॉलराची साथ आली आहे म्हणून युरोपात सुखासुखी पैसा छापण्याची संधी सोडून भारतात आला. तिथे मेहनत करून ही साथ आटोक्यात आणली, तोवर त्याहून महाभयंकर संकट मुंबईत अवतरले होते.

सगळेजण मुंबईसोडून जात होते. एकही गोरा ब्रिटीश तिथे थांबायला तयार नव्हता आणि अशात हा हाफकिन स्वतःहून मुंबईत आला.

तो दिवस होता ७ ऑक्टोबर १८९६.

मुंबईच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी प्रचंड रांग लागली होती. प्रत्येक क्षण आणिबाणीचा होता. प्लेगवर उपाय आणि लसदोन्ही ताबोडतोब हवे होते. हाफकिनला  ग्रँट मेडिकल कॉलेजमधील प्रयोगशाळेचे एक दालन उपलब्ध करून देण्यात आले. सोबत काही मदतनीस दिले.

हाफकिनने दणक्यात आपले प्रयोग सुरु केले.

प्लेगचे जंतू घेऊन हाफकिनने काही दिवस ते वाढू दिले. या वाढलेल्या जंतुना त्याने प्रथम क्लोरोफॉर्म दिला आणि नंतर त्यांना मृत केले. हे मेलेले जंतू हीच हाफकिनची प्लेगवरची लस होती. काही उंदरावर त्याने ही लस टोचून प्रयोग करून पाहिला. लस टोचलेले उंदीर खणखणीत बरे झाले.

आता पुढचा प्रयोग माणसावर करायचा होता. पण या महाभयानक रोगाची परीक्षा घ्यायला कोणीही तयार होत नव्हत. अखेर हाफकिनने स्वतःच ते हलाहल चाखायच ठरवलं. मुंबईच्या लाखो लोकांचं सुदैव की त्याचा प्रयोग यशस्वी ठरला. हाफकिनची प्रयोगशाळा गव्हर्नरच्या प्रशस्त राजवाड्यात हलवण्यात आली.

पण अजूनही काही अडथळे बाकी होते. हिंदू धर्मातील अनेकांनी आपण शाकाहारी असून ही लस टोचून घेण्यास नकार दिला.

जुन्या अंधश्रद्धाच्या विळख्यात अडकलेल्या अडाण्यांना लस टोचून घेण्यापेक्षा नवस बोलून हा रोग आटोक्यात येईल असा गैरसमज झाला होता. या उलट पारशी समाजातील रोग रांगा करून करून दोन दोनदा ती लस घेऊन आले.

याचा परिणाम असा झाला की मृतांमध्ये प्रचंड प्रमाण हिंदूंचे होते त्यामानाने पारसी लोक अभावानेच आढळून आले. हाच प्रकार पुण्यामध्येही झाला. जवळपास ७ लाख या रोगात मृ त्युमुखी पडले होते.

देवदूत बनून आलेल्या हाफकिनचे मुंबईवर प्रचंड उपकार आहेत. जिथे त्याची प्रयोगशाळा होती त्या गव्हर्नरच्या बंगल्याचे त्याच्या स्मरणार्थ हाफकिन इंस्टीट्युट असे नामकरण करण्यात आले.

शनभर वर्षांपूर्वी प्लेगमुळे जशी परिस्थिती झाली होती कोरोना मुळे अगदी तशीच परिस्थिती पुन्हा जगावर ओढवली आहे. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे कोरोना या रोगावरची विक्रमी वेळेत शोधण्यात आली आहे. काही दिवसात याच लसीकरण देखील सुरु होईल पण जगभरातील काही मुस्लिम संघटनांनी जर या लसित डुक्कराची चरबी असेल तर मुसलमानांनी ती घेऊ नये असा फतवा जाहीर केला आहे.

त्याकाळी हिंदूंनी जी चूक केली तीच चूक मुस्लिम उलेमा करताना दिसत आहेत हे नक्की.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Yaseen ali says

    फक्त मुसलमान समाजाचा उल्लेख करू नका, त्या बरोबर jew लोक पण विरोध करत आहे असं सांगा ….तेंव्हा तुमची बातमी परिपूर्ण होईल

Leave A Reply

Your email address will not be published.