आज दिंडीचं जे नयनमनोहरी रूप दिसतं त्याचं श्रेय जात हैबतबाबांना.

वारी म्हणजे आपुलकीचा सोहळा वारी म्हणजे चैतन्याचा महामेळा,
वारी म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची ओढ,
वारी म्हणजे अमाप उत्साह…
आपल्यामध्ये असलेलं मीपण काढून टाकायचं असेल, तर वारीमध्ये जायलाच हवं असं म्हटलं जातं.

पंढरीच्या वारीची परंपरा ही श्री संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्याही पूर्वीपासून चालत आलेली आहे. माऊलींचे पणजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी हेसुद्धा आपेगाव ते पंढरपूर वारी करत. संत ज्ञानेश्‍वर, संतनामदेव महाराज, संत सांवता माळी, संत चोखोबा, संत तुकाराम महाराज आदी सर्व संतांची मांदियाळी त्यांच्या काळात पंढरीच्या पांडुरंगाची वारी करीत असे.

किंबहुना, ज्या भागवत-धर्माची मुहूर्तमेढ संतांनी रोवली त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांचे एकत्र भेटण्याचे ठिकाण व समय म्हणजे पंढरीची आषाढ शुद्ध एकादशीची वारी होती.

आजच्या या पालखी सोहळ्याची परंपरा ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहूकरयांनी इ.स. 1685 मध्ये म्हणजेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्यासदेह वैकुंठगमनानंतर (इ.स. 1649) 36 वर्षांनी सुरू केली. तुकोबारायांच्या पादुका श्री देहू क्षेत्रावरून पालखीत घालून श्री क्षेत्रआळंदीत येऊन श्री माऊलींच्या पादुकांसमवेत पंढरीस घेऊनजाण्याची परंपरा अशी सुरू झाली.

तपोनिधी श्री नारायण महाराज देहुकर यांनीच वारी सोहळ्यात आणि संप्रदायात “ज्ञानोबा-तुकाराम” या भजनाची प्रथा सुरू केली. हा ऐश्‍वर्यपूर्ण पालखी सोहळा इ.स. 1685 पासून इ.स. 1830 पर्यंत एकत्रितपणे सुरू राहिला. त्यानंतरपुढे देहूकर मोरे यांच्या सांगण्यावरून थोर भगवद्भक्त व पूर्वाश्रमीचे श्रीमंत शिंदे सरकार यांचे पदरी सरदार असणारे; परंतु नंतर विरक्तहोऊन आळंदीस वास्तव्यास असणारे श्रीगुरू हैबतबाबा यांनी इ.स. 1831 पासून माऊलींच्या पादुकांची स्वतंत्र आषाढ वारी सुरू केली.

जशी वारी दिसते तसं तीच रूप देण्याचे श्रेय जात हैबतबाबांना.

हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या दरबारात सरदार होते. मूळ गाव आरफळ जि. सातारा येथे  भेट देण्यासाठी ते निघाले असता, भिल्लांनी त्यांची सर्व संपत्ती हरण करून त्यांना व त्यांच्या बरोबरच्या लोकांना गुहेमध्ये कोंडले. हैबतबाबांनी अहोरात्र हरिपाठाचा घोष सुरू केला. दरम्यान,भिल्ल नायकाच्या पत्नीला मुलगा झाला. त्याप्रीत्यर्थ नायकाने गुहेवरील शिळा दूर केली तेव्हा श्रीगुरू हैबतबाबा व अन्य लोक अन्नपाण्याअभावी निश्‍चेष्ट पडल्याचे त्याला दिसले.

त्या अवस्थेतही हैबतबाबांच्या मुखातून हरिपाठाचे अभंग उमटत होते. हे पाहून त्या भिल्ल नायकाने हैबतबाबांची पूर्ण शुश्रुषा करून त्यांची संपत्तीसह सन्मानाने मुक्तता केली. पुढे हैबतबाबा आरफळला न जाता थेट आळंदीस आले व अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत मग्न राहिले.

पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून हैबतबाबा यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांचे दरबारी सरदार असलेले श्रीमंत अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे लवाजमा, नैवेद्याचीव्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला. त्यातील हत्ती वगळता बाकीचा सारा सरंजाम आजतागायत सुरू आहे.

श्रीगुरू हैबतबाबा यांचा मूळ पिंड सरदार घराण्याचा असल्याने, त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखे शिस्तबद्ध स्वरूप दिले. म्हणून आजही या सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम,भजनाची पद्धत इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत श्रीगुरू हैबतबाबा यांनी इ.स. 1831 पासून ज्या प्रकारे सुरू केली तशीच पाळली जाते.

वारकरी संप्रदायाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे ‘वारी’.

या वारीवरूनच वारी करणारा म्हणून या संप्रदायास “वारकरी संप्रदाय”असे नाव पडले आहे.अनेक जण या संप्रदायास भक्तिपंथ, माळकरी पंथ असेही म्हणतात. वैशिष्टचा विचार करायच म्हणलं तर “वारी” या शब्दापासुन करावा लागेल  ‘भारत देशात वारी हा शब्द व ही संकल्पना फक्त वारकरी संप्रदायातच आढळते. देशातील अन्य संप्रदायामध्ये ‘यात्रा’असा धार्मिक शब्द आढळतो. पण ‘यात्रा’ व ‘वारी’ या शब्दात संकल्पनात्मक जमीन-अस्मानाचा फरक आहे. पंढरपूरची ‘यात्रा’नाही, तर वारी आहे.

असंख्य भाविक बालाजी दर्शनास तिरुपतीला,काशीला, तसेच चार धाम दर्शनाला जातात. त्याला वारी म्हणत नाहीत, तर ‘तीर्थयात्रा’ म्हणतात. या यात्रा भाविक स्वेच्छेने -स्वत:च्या सोईने केव्हाही व कधीही करता येतात आणि ठरावीक काळानेवारंवार करीत नाही.पण पंढरीची वारी ही एकदाच करण्याची नसूनसातत्याने, वारंवार, जन्मभर व पिढयानपिढया करण्याची साधनाआहे.

सातत्य, नियमितपणा हे जसे वारीचे मुख्य वैशिष्टय आहे, तसे दुसरे वैशिष्टय म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाची वारी ही एकटयाने नव्हे, तर समूहाने करायची आहे. सर्व विठ्ठलभक्तांनी एकत्र जमून, अभंग गात, टाळमृदुंगाच्या गजरात वाजत गाजत नाचत आनंदाने पंढरीची वारीकरण्याची पध्दत आहे. अशा प्रकारे टाळ, मृदुंगासह, हाती भगवीपताका घेऊन अभंग गात, नाचत पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांच्यासमूहास ‘दिंडी’ म्हटले जाते.

दिंडी’ हा वारकरी संप्रदायाच्या संघटनात्मक रचनेचा एक वैशिष्टयपूर्ण घटक आहे.

एका दिंडीत किती वारकरी असावेत याविषयी काहीही दंडक नाही. 15-20 वारकऱ्यांपासून 1500-2000 वारकरी एकादिंडीत असू शकतात. पण एका दिंडीत वीणाधारक एकच वारकरी असतो. ‘एक वीणा एक दिंडी’ असे थोडक्यात म्हणता येईल. आता दिंडीची ढोबळमानाने रचना पाहू. प्रारंभी भगवी पताका धारणकरणारे काही वारकरी, त्यामागे टाळ वाजविणारे टाळकरी वारकरी,मध्ये मृदुंगवादक, त्यामागे गळयात वीणा धारण करणारा वीणेकरी,त्यामागे अन्य महिला वारकरी, त्यांमध्ये काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी होतात. अशी सर्वसाधारण एकादिंडीची रचना असते.

पालखीसाठी बैल खूप काळजीपूर्वक निवडले जातात.

तुकोबांच्या पालखी सेवेचा मान मिळावा यासाठी ‘श्रीक्षेत्र देहूसंस्थानकडे  दरवर्षी अनेक बैलजोडी मालकांकडून अर्ज येतात. त्यांची छाननी करून निवड समिती प्रत्यक्ष भेट देऊन बैलजोड्यांची पाहणी करते. यासाठी निवडीचे निकष  ठरलेले असतात.

उंची सुमारे सहा फूट (वशिंडापर्यंत), वजन साडेपाचशे ते सहाशे किलो, बैलांचा रंग पांढरा शुभ्र,काळ्या केसांची झुबकेदार लांब शेपूट,रुबाबदारपणा, वशिंड, उंच शिंग, शेपूट, डोळे, नखे, चाल,गरीब, मवाळ, शांत स्वभाव.आरोग्यसंपन्नता यांची पाहणी केलीजाते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला महत्त्वाचा असतो. बैलाची भार वाहून नेण्याची क्षमता आजमावली जाते. तसेच बैलाचा स्वभाव पाहिला जातो. संपूर्ण वारी मार्गात बैलजोडी सतत गर्दीतून वाटचाल करत असल्याने शांत स्वभावाची बैलजोडी निवडली जाते.

पालखीच्या वार्तांकनात हा विषय सहसा येत नाही परंतु राजन सरानी सांगितलेलं हे सर्वसमावेशक पालखी च एक सुंदर उदाहरण येथे वारीचे वैशिष्ट्य सांगताना आवर्जून सांगत आहे.

एक दंतकथा आहे 

अनगडशहा भटके सुफी फकीर. त्यांच्याकडं भीक मागण्याचा चमला (वाडगा) होता. कुणी कितीही दान वाढलं तरी तो रिकामाच राहत असे. कुणी तरी बाबांना सांगितलं, देहूत तुकाराम नावाचा मोठा सच्छिल, साधू वृत्तीचा माणूस आहे, त्यानं दान टाकलं तर तुझा वाडगा भरेल.

बाबा देहू आणि तुकाराम शोधत निघाले. देहूत आले.

आले खरे, पण आता तुकाराम महाराज आणि त्यांचं घर कसं ओळखायचं? तर बाबा देहूतल्या प्रत्येक घरासमोर दान मागू लागले. जिथं वाडगं भरेल, ते घर महाराजांचं हे आपोआपच कळेल.

एकेक घर करत बाबा महाराजांच्या दाराशी आले. महाराज घरी नव्हते, पण त्यांची आवली जात्यावर दळण दळत बसली होती आणि शेजारीच त्यांची मुलगी बसली होती. तवर बाहेरून आवाज दान वाढा असा आवाज आला. महाराजांची मुलगी लगेच कळवळ्यानं दळीखालचं पीठ उचलून वाढायला निघाली, तर आईनं अडवलं आणि नको वाढू म्हणाली. पण मुलीनं ऐकलं नाही आणि ओंजळभर पीठ बाबांच्या वाडग्यात वाढलं, तर काय आश्चर्य, वाडगा पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला.

बाबांना आनंदानं उचंबळून आलं. कारण त्यांना त्यांची मंजिल मिळाली होती.

बाबा मग कायमचे देहूतच राहिले. तुकाराम महाराज आणि ते मित्र झाले. आषाढीला तुकाराम महाराजांची पालखी निघाली कि तिचा पहिला मुक्काम गावातच अनगडशहा बाबाच्या दर्ग्यावर असतो.

कीर्तन,भजन,भारूड,गवळण,प्रवचन,मनोरा रिंगण फुगडी इत्यादी माध्यमातून संगीत,गायन,खेळ,अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ असणारा पालखी सोहळा ही वाचण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे.

फोटो सौजन्य- अप्पा चौगुले

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.