हाजी मस्तानमुळे औरंगाबादमध्ये काँग्रेसचा उमेदवार पडला होता..

पांढरे कपडे, पांढरे शूज, पांढरी फरची कॅप. आपल्या पांढऱ्या आलिशान मर्सिडीजमधून हा काळाकुळीत माणूस उतरायचा तर मुंबई स्तब्ध होऊन जायची. एक साधा डॉकवर काम करणारा कामगार ते अंडरवर्ल्डवर राज्य करणारा सुलतान हा प्रवास यशस्वीपणे पार करणारा म्हणजे डॉन म्हणजे हाजी मस्तान.

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर मस्तानने अनेक वर्ष राज्य केले. त्याने स्मगलिंग व इतर अनेक काळ्या धंद्यातून बरेच पैसे कमवले. या काळ्या धंद्यात देखील काही उसूल पाळले. जेव्हा आपल्या तत्वांना मुरड घालायची वेळ आली तेव्हा तो या धंद्यातून बाहेर पडला.

इतकंच नाही तर जयप्रकाश नारायण यांच्या समोर आपल्या ८० साथीदारांसह पुन्हा स्मगलिंग करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली.

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगून आल्यापासून हाजी मस्तानच आयुष्यच बदलून गेलं होतं. गुन्हेगारी विश्वातला आपला दरारा कमी झाला नसला तरी तो समाजकारणात उतरला. फक्त फोटोपुरते समाजकार्य न करता त्याने खरोखर झोपडपट्टीमध्ये जाऊन लोकांना मदत करण्यास सुरवात केली.

इथे तो थांबला नाही तर त्याने १९८१ साली एक राजकीय पक्ष स्थापन केला. नाव दिलं, दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ.

दलित नेते जोगेंद्र कवाडे यांच्या सोबत त्यांनी हा पक्ष स्थापन केला होता. दलितांची आणि मुस्लिमांची एकटा घडवून त्या वज्रमुठीने काँग्रेसला दणका द्यायचा अशी त्यांची इच्छा होती. पण जेवढी लोकप्रियता हाजी मस्तान यांनी कमावली होती तेवढं यश त्यांना राजकारणात मिळालं नाही.

कमीतकमी मुंबईवर तरी विजय मिळवू हा विश्वास असणारा हा डॉन पॉलिटिक्समध्ये पूर्णपणे फसला.

मुंबईमध्ये नाही पण एकदा औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीत मात्र हाजी मस्तानची हवा दिसली होती.

गोष्ट आहे १९८४ सालची. तेव्हा केंद्रात आणि राज्यात सगळीकडे आय काँग्रेसची सत्ता होती. इंदिरा गांधींची हत्या झाल्यामुळे संपूर्ण देशात काँग्रेसबद्दल सहानुभूतीची लाट होती. त्यावर्षी राजीव गांधींनी चारशेच्या वर खासदार निवडून आणण्याचा विक्रम केला. पण या सगळ्यात हक्काची एक सीट ते जिंकू शकले नाहीत.

ती सीट होती औरंगाबादची.

१९८४ साली औरंगाबादमध्ये आय काँग्रेसकडून  वसंतदादा सरकारमध्ये मंत्री असलेल्या अब्दुल अझीम यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसकडून साहेबराव पाटील डोणगावकर यांना तिकीट मिळाले होते.

साहेबराव डोणगावकर हे सहकारातील मोठं नाव. गावच्या सरपंचपदापासून सुरवात करणारा हा तळागाळातला  नेता. शरद पवारांचा विश्वास संपादन करून त्यांचा खास कार्यकर्ता समर्थक म्हणून राज्यात ओळख मिळवली होती. याच्या आधी देखील त्यांनी औरंगाबादमधून त्यांनी लोकसभा लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.

यावेळी साहेबराव डोणगावकर जोर लावणार याची सगळ्यांना खात्री होती. मात्र काँग्रेसची लाट आणि अब्दुल काझी या दिग्गज नेत्याला तिकीट मिळाल्यामुळे काँग्रेसचा विजय खात्रीशीर मानला जात होता.

पण या सगळ्या निवडणुकीत तिसरा अँगल आला होता डॉन हाजी मस्तानचा.

कोणालाही अपेक्षा नसताना हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित मुस्लिम अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ पक्षाकडून औरंगाबाद मतदारसंघामध्ये खलील जाहेद याला तिकीट देण्यात आलं. खरं तर हाजी मस्तान यांच्या पक्षाने राज्यात इतरत्र कोठेही उमेदवार नव्हता. त्यांचा पक्ष फक्त औरंगाबाद मधून निवडणूक का लढवतोय यावरून खमंग चर्चा सुरु झाली होती.

असं म्हणतात की शरद पवारांच्या एस काँग्रेसमधील एका गटाने मुस्लिम मतांचे विभाजन होण्यासाठी हाजी मस्तान यांना गळ घालून उमेदवार उभा करायला सांगितलं होतं.

तस बघायला गेलं तर साहेबराव पाटील डोणगावकर हे आणि त्यांचा समाजवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचे होते. मात्र, मुस्लिम मतांमध्ये फूट पडत असताना त्यांनीही हिंदू मते स्वत:कडे वळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. औरंगाबादच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम अशी जात-धर्माच्या नावावर पहिल्यांदाच ही निवडणूक झाली.

मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर राज्य करणाऱ्या हाजी मस्तान यांच्याबद्दल औरंगाबादमध्ये देखील क्रेझ होती. अनेक तरुण हाजी मस्तान यांच्या पक्षाला मतदान करायच्या मताचे होते. या तिसऱ्या कोनामुळे निवडणुकीतील चुरस वाढली.  

शेवटी निकाल हाती आला तेव्हा  साहेबराव पाटील डोणगावकर यांना थेट विजय मिळाला. राज्यात मंत्री   असून,काँग्रेसची लाट असूनही अब्दुल अझीम यांना पराभव स्वीकारावा लागला. याला कारणीभूत ठरले दलित मुस्लिम महासंघाचे खलील जाहेद. त्यांनी तब्बल ४० हजार मते मिळवली होती. त्यांनी फक्त काँग्रेसची मते खाल्ली असं नाही तर त्यांच्यामुळे हिंदूंनी एकगठ्ठा मते टाकून डोणगावकरांना जिंकून दिले.

आजकाल काँग्रेस वंचित बहुजन विकास आघाडी, एमआयएम या पक्षांना विरोधी पक्षांची बी टीम म्हणते तेव्हा हाजी मस्तान यांच्या दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ पक्षावर अशीच टीका करण्यात आली होती.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.