खादीच्या कपड्यांना नावं ठेवली म्हणून या देशभक्त डॉक्टरने राणीवर उपचार करायला नकार दिला

असं म्हंटल जात की, रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांनी त्या रुग्णाचा जात, धर्म किंवा इतर कोणताही बॅकग्राऊंग बघायचा नसतो. केवळ उपचार करायचे असतात. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये नाही म्हणायचे नसते.

पण आपल्या इतिहासात एक असे देशभक्त डॉक्टर होऊन गेले, ज्यांनी रुग्ण आणि ते देखील राजमहालामधील राणीने भारतीय खादीला नाव ठेवली म्हणून उपचार करायला त्यांनी नकार दिला.

या वैद्याच नाव अजमल खान.

अगदी आजोबा- पंजोबांपासून खानदानी डॉक्टर अशी या हकिमांची मुख्य ओळख. १८९२ मध्ये रामपूरच्या नावाबाचे मुख्य हकीम म्हणून काम केलेले अजमल खान यांनी जुन्या दिल्लीमधील सगळ्यात श्रीमंत पण उपचारात गुण असणारे हकीम म्हणून नावलौकिक मिळवला होता.

एका दिवसात त्यांच्या दिवानतख्तमध्ये ते २०० रुग्णांना केवळ चेहरा बघून आजार सांगायचे आणि बरे करायचे. त्यांच्या याच उपचार पद्धतीमुळेच त्यांना मसीहा-ए-हिंद हा खिताब मिळाला.

अजमल खान हे केवळ डॉक्टर नव्हते. तर स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढणारे देशभक्त म्हणून देखील त्यांना ओळखलं जात. असहकार आंदोलन, खिलाफत चळवळ अशा सगळ्या आंदोलनांमध्ये हकीम अजमल खान यांचा सहभाग होता.

ते काँग्रेसचे सक्रिय आणि पहिल्या फळीतील नेते होते. याच दरम्यान १९२१ मध्ये त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पण त्यांच्या या कामगिरीबद्दल नंतर केव्हा तरी. आज त्यांच्या देशभक्तीचा किस्सा वाचूया.

तर हकीम खान हे सुरुवातीपासूनच खादीचा वापर करत होते का, तर नाही. अगदी सुरुवातीच्या काळात ते मुघली पोशाख वापरायचे. म्हणजेच एक मोठा अंगरखा आणि त्याच्यावर कोट. यानंतर ते अलीगढ़च्या पहरावामध्ये दिसू लागले. यामध्ये एक लांब शेरवानी आणि अलीगढी पायजमा आणि त्याच्यावर मॅचिंग करणारी मोठी कॅप असा काहीसा पोषाख असायचा.

गांधीजींच्या आंदोलनाशी जोडले गेल्यानंतर हकीम अजमल खान यांनी खादीचा वापर करायला सुरुवात केली. गांधीजींशी त्यांची पहिली भेट झाली ती, १९१९ मध्ये रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह चालू असताना. त्या आंदोलनावेळी गांधीजी दिल्लीला आले होते. त्यावेळी खान सत्याग्रहाशी संबंधित काही बाबी समजून घेण्यासाठी गांधीजींकडे गेले असताना त्यांच्या शिकवणीने ते प्रचंड प्रभावित झाले.

त्यानंतरच्या भेटींमध्ये गांधीजी आणि हकीम खान या दोघांमधील जिव्हाळा वाढत गेला. गांधीजी देखील सांप्रदायिक समस्येवर काही माहिती किंवा सल्ला हवा असल्यास त्यासंबंधित ते खान यांचा विचार घ्यायचे 

पुढे १९२१ मध्ये अहमदाबाद मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. यात त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष बनवलं गेलं. अध्यक्ष बनणारे ते ५ वे मुसलमान होते. त्याच दरम्यान त्यांनी खिलाफत चळवळीचे देखील नेतृत्व केले होते.

याच दरम्यान चालू असणाऱ्या असहकार चळवळीदरम्यानचा त्यांचा किस्सा प्रसिद्ध आहे. ते जरी काँग्रेसचे मोठे नेते असले तरी त्यांनी अद्याप हि डॉक्टरकी सोडली नव्हती. त्यामुळे त्यांना रामपूरचे नवाब, ग्वालियरचे राजे अशा वेगवेगळ्या नवाब आणि राजांकडे उपचार करण्यासाठी आमंत्रित केले जायचे.

एकदा एका राजाने आपल्या महालामध्ये आजारी राणीवर उपचार करण्यासाठी हकीम अजमल खान यांना आमंत्रित केले होते. जेव्हा ते तिथे गेले तेव्हा राणीने विदेशी कपडे घातले होते. संपूर्ण खोली विदेशी सामानाने भरली होती. अजमल राणीच्या हाताची नाडी तपासात म्हणाले,

वेळ बदलत आहे. आता तरी तुम्हाला विदेशी कपड्यांचा वापर टाळून केवळ खादीचा वापर करायला हवा.

प्रत्युत्तरात राणी म्हणाली, हकीमजी खादीचा वापर करायला काहीच हरकत नाही. पण ती इतकी मोठी आणि खडबडीत असते की अंगावर टोचल्यासारखी होते.

हे ऐकताच अजमल खान यांनी रागाच्या भरात त्या राणीचा हात सोडत उभे राहिले आणि म्हणाले, मग तर मी तुमच्यावर उपचार पण करू शकणार नाही. जिथे तुम्हाला खादी टोचते, तिथे माझे हात पण तुम्हाला टोचत असतील. कारण मी पण खादीसारखाच हिंदुस्थानी आहे. ते तडक तिथून बाहेर पडले. 

अजमल खान यांची हि गोष्ट ऐकताच तिथे उभ्या असलेला राजाची मान शरमेनं खाली गेली. आणि त्याने खान यांची माफी मागत आपल्या घरामध्ये एकही विदेशी वस्तू न ठेवण्याचे आश्वासन दिले. आणि त्याचे पालन देखील केले. दुसऱ्याच दिवसापासून राजाने कपड्यांपासून ते जेवणापर्यंत सगळ्या गोष्टीत स्वदेशीचा वापर करायला सुरुवात केली.

अशा या महान देशभक्त आणि क्रांतिकारी नेते, हकीम अजमल खान यांचा १९२७ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर पुढच्या काही वर्षात भारताला स्वातंत्र्य देखील मिळाले, मात्र त्यावेळी झालेल्या फाळणीमध्ये हकीम अजमल खान यांचा मुलगा हकीम मोहम्मद नबी खान पाकिस्तानमध्ये गेला. त्याने लाहौरमध्ये ‘हकीम अजमल खान दवाखाना’ सुरु केला. ज्याच्या शाखा आज पाकिस्तानमध्ये सर्व मोठ्या शहरांमध्ये आहेत.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.