त्यांनीच इंदिरा गांधींना ‘गुंगी गुडिया ते आयर्न लेडी’ बनवलं ..

१९६६ मध्ये लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी पहिल्यांदाच पंतप्रधान बनल्या होत्या. पण त्या पूर्वी पक्षात बंडखोरीने डोक वर काढलं. मोरारजी देसाई पक्षाच्या या निर्णयाने नाराज होते. पण लगेच पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर कोणाला नाराज करून चालणार नव्हते.

१९६७ च्या निवडणूका कॉंग्रेसने जिंकल्या आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या. या मंत्रिमंडळात इंदिरांनी मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधान बनवले. अननुभवी असलेल्या इंदिराना पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचा हा दबाव हाताळायला अवघड जात होते. त्यांच्या या शांततेचा आणि दबावाचा विरोधक चांगलाच समाचार घ्यायचे. राम मनोहर लोहिया यांनी तर त्यांना एकदा नेहरूंची गुंगी गुडिया देखील म्हंटले. 

त्यामुळे इंदिरा यांना ही सगळी परिस्थिती हाताळणारे कोणीतरी विश्वासातील व्यक्ती हवा होता. अशावेळी त्यांना इंग्लंडमध्ये भारताचे उपउचायुक्त आणि त्यांचे जुने मित्र असलेले परमेश्वर नारायण उर्फ  पी. एन हक्सर यांचे नाव चटकन आठवले. हक्सर यांना भारतात बोलून घेतले आणि पंतप्रधान सचिव कालांतराने मुख्य सचिव बनवण्यात आले. 

सन १९७० पर्यंत पक्ष व सरकारमधील सर्वसत्ताधीश बनवण्यापर्यंतच्या कामात पी. एन. हक्सर यांची प्रचंड मदत झाली. या जबाबदारीच्या भूमिकेनंतर हक्सर हे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष झाले आणि मग जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलपती.

माजी केंद्रिय पर्यावरण मंत्री जयराम रमेश “इंटरट्विंड लाइव्हज : पी. एन. हक्सर अँड इंदिरा गांधी’ या पुस्तकात सांगतात,

“इंदिरा गांधी १९७२ पर्यंत हक्सर यांच्यावरच अवलंबून होत्या. १९७१चे युद्ध, भारत-रशिया मैत्री करार, शिमला करार, आणि भारताच्या पहिल्या अणु चाचणीच्या प्रयत्नांचे शिल्पकार पीएन हक्सर हेच होते. साडे पाच वर्षात असा एकही निर्णय नव्हता ज्यात इंदिरा गांधी यांनी हक्सर यांची मदत किंवा सल्ला घेतला नव्हता” 

देशातील बँकांचे त्वरेने राष्ट्रीयीकरण करण्याची गरज हक्सर यांना ९ जुलै १९६९ पर्यंत वाटत नव्हती,  त्या नंतरच्या तीन दिवसांतच कॉग्रेसने राष्ट्रपतिपदासाठी संजीव रेड्डींचे नाव घोषित केले. इंदिरा गांधींची त्यांच्या नावास पसंती नव्हती. त्यामुळे इंदिराजींच्या अधिकारासच आव्हान मिळाले होते. चार दिवसांतच इंदिराजींनी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा राजीनामा घेतला.

त्यानंतर मात्र दिनांक १२ ते १५ जुलै १९६९ या तीन दिवसांतच इंदिराजींनी हक्सर यांच्याशी चर्चा केली, दिनांक १६ जुलैला त्यांनी हक्सर यांना याबाबत अर्थतज्ज्ञ के. एन. राज यांच्याबरोबर विचारविनिमय करण्यास सांगितले. व मगच त्या बँक राष्ट्रीयीकरण करण्याच्या ठाम निर्णयापर्यंत आल्या.

इंदिराजी व हक्सर यांचे वैचारिक सूर जुळलेले होते. दोघेही मूळचे काश्मिरी पंडित; अलाहाबादमध्ये वाढलेले. पुढे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये हक्सर शिकले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी परराष्ट्र  खात्यात रुजू झाले. हक्सर हे उत्तम गणिती व राजनीतिशास्त्रज्ञ तसेच युद्धशास्त्र व मानववंशशास्त्र याचेही अभ्यासक.

हक्सर यांच्यावर ब्रिटिश मजूर पक्षाच्या विचारांचा प्रभाव होता. विचाराने ते अमेरिकाविरोधी व सोव्हिएत रशियाच्या बाजूचे होते. शासनसत्ता आणि सार्वजनिक उद्योगांचे ते पुरस्कर्ते होते.

खरे म्हणजे, इंदिराजींनी सन १९६७ मध्ये पक्षासमोर जो दहा कलमी कार्यक्रम ठेवला होता, त्यात बँकांवर सामाजिक नियंत्रण असावे, या कलमाचाही समावेश होता. त्यात राष्ट्रीयीकरणाचा उल्लेखच नव्हता. मोरारजींचा बँक राष्ट्रीयीकरणास विरोध होता आणि ते कॉंग्रेसमधील भांडवलदारधार्जिण्या सिंडिकेटचे एक नेते होते. त्यामुळे बंगळूरू येथे १९६९ च्या पहिल्याच आठवड्यात कार्यकारिणीची जी बैठक झाली, त्यापूर्वी हक्सर यांनी सिंडिकेटविरुद्ध हल्लाबोल करण्याचा सल्ला इंदिराजींना दिला होता.

सन १९६८ मध्ये लोकसभेत बोलताना, इंदिराजींनी भूमिहीन शेतमजुरांच्या समस्या मांडल्या व मुस्लिमांबद्दल सहानुभूती प्रकट केली. दलितोद्धारासाठी नव्या कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“कामगारांच्या बेशिस्तीबद्दल बोलणाऱ्या उद्योगपतींनो, तुमचे नफे मात्र फुगत चालले आहेत,’ असा इशारा त्यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना दिला.

सार्वजनिक उद्योगांचे मूळ काम विकासाचा पाया रचण्याचे आहे, फायदा कमावणे हे नाही, असे मतही त्या मांडू लागल्या. या भूमिकांवर हक्सर यांच्या विचारांची छाप होती.

राजकीय नैतिकतेबाबत हक्सर हे इंदिराजींचे मार्गदर्शक असल्याचे रमेश यांनी पुस्तकात सांगितले आहे. बँक राष्ट्रीयीकरण, कॉँग्रेसमधील फूट, बांगलादेशची निर्मिती, निक्सन- किसिंजर यांना दिलेला शह, १९७१ चा “भारत-सोविएत करार’ आणि सन १९७२ चा “सिमला करार’ या सर्व बाबतीत इंदिराजींनी जबरदस्त राजकीय कर्तृत्व दाखवले. या काळात हक्सर हेच त्यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार होते.

सिमला कराराला मंत्रिमंडळाचा असलेला विरोध हक्सर यांनी ४५ मिनिटांमध्ये दूर केला होता. 

एकेकाळी भारताचे संरक्षणमंत्री राहिलेल्या कृष्ण मेनन यांच्या “इंडिया लीग’मध्ये फिरोज गांधी, इंदिराजी व हक्सर यांनी मिळून काम केले होते. पुढे इंदिराजी पंतप्रधान बनल्यावर त्यांच्या भूमिकांना डावे, पुरोगामी असे वेळोवेळी बदल देण्यास हक्सर यांचा सिंहाचा वाटा होता. हक्सर उच्चवर्णीय, उच्चवर्गीय जगातले असूनही, त्यांच्या दृष्टिकोनात लोकाभिमुखता होती.

संजय गांधी हे पंतप्रधानांचे चिरंजीव असल्यामुळे त्यांनी मारुती मोटारसारखा व्यवसाय हाती घेऊ नये, असे हक्सर यांचे मत होते. ते प्रखरपणे मांडून त्यांनी पदत्याग केला. पंतप्रधांनांच्या सचिवालयातून ते बाहेर गेले; परंतु पुढेही इंदिराजींचे विशेष दूत म्हणून हक्सर यांनी काम केले. विविध देशांचे दौरे करून, भारताच्या आंतरराष्ट्रीय सबंधांची बाजू त्यांनी बळकट केली.
हक्सर यांना जाऊन आज २२ वर्षे लोटली. नेहरू, इंदिरायुगाचे ते साक्षीदार होते. त्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिकाही वठवली. भारताच्या अनेक निर्णयांवर त्यांच्या विचारांची सावली होती. 
Leave A Reply

Your email address will not be published.