इस्लाममधील हलाला पद्धत नेमकी काय आहे ?

जगात असा कोणता धर्म नाही ज्याच्यात अनिष्ट चालीरीती, प्रथा नाहीत. आणि विशेष करून ज्या चालीरीती असतात त्याचा बळी शक्यतो महिलाच असतात. हे सांगायचं कारण की, दिल्लीत अशाच अनिष्ट चालीरीतीला बळी पडलेली एक महिला.

आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत पुन्हा लग्न करण्यासाठी एमआयएमचे नेते रियाझुद्दीन यांनी आपल्या मित्राला सोबत नेऊन ‘हलाला’चा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्लीमधील जामिया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता हे वाचल्यावर कोणालाही सहज प्रश्न पडेल तो म्हणजे हलाला म्हणजे काय ? 

तर इस्लाममध्ये तीन प्रकारचे काडीमोड असतात. तलाक (पतीचा एकतर्फी निर्णय), फस्क (पत्नीचा एकतर्फी निर्णय) आणि खुलअ (दोघांच्या संगनमताने). आता यातल्या तलाक या एकाच प्रकारात एक विचित्र तरतूद करण्यात आली आहे.

पती-पत्नीमध्ये तलाक झाला असेल आणि चूक झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली असेल तर पती पत्नीशी संबंध ठेवू शकतो. त्यासाठी महिलेला निकाह हलालाचं पालन करावं लागतं. म्हणजे तिला एखाद्या व्यक्तीशी लग्नं करावं लागतं. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याला तलाक देऊन पहिल्या पतीसोबत निकाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हणतात. वारंवार तलाक घेण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी ही प्रथा प्रचलित झाल्याचं सांगण्यात येतं.

हा निकाह हलाला म्हणजे वैध विवाह असं मानलं जात. पण याला कुराणात काही नियम सांगितले आहेत.

जर दुसऱ्या विवाहात पती मरण पावला किंवा त्यानंही तलाक दिला आणि त्यावेळी जर पहिल्या पतीची इच्छा असेल आणि अर्थातच त्या पत्नीचीही, तरच हा विवाह होऊ शकतो. दुसरं म्हणजे यात योगायोगाला महत्त्व दिलं गेलं आहे. जाणीवपूर्वक जर असं करण्यात आलं तर तो विवाह अनैतिक ठरवला जातो हे इथं लक्षात घ्यायला हवं.

दुसरं म्हणजे दुसऱ्या विवाहात घटस्फोट मिळालेली किंवा विधवा झालेली स्त्री जर आपल्या पहिल्या विवाहाच्या पतीशी लग्न करू इच्छित असेल तर तिला ती संधी मिळावी यासाठी हा विवाहाचा प्रकार आहे. त्यामुळे घटस्फोटीत किंवा विधवा स्त्रिच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळते जी एकूणातच चांगली गोष्ट आहे.

पण यावर आक्षेप का घेण्यात येतात किंवा वाद का उठतो. 

या हलालामुळे स्त्रियांवर अत्याचार होतात. पण ही पद्धत मुळात एका घटस्फोटीत किंवा विधवा मुसलमान स्त्रिला पुनर्विवाहाची परवानगी देते ही अत्यंत महत्त्वाची बाब इथं विसरून चालणार नाही.

हलालामुळे मुसलमान स्त्रिवर अन्याय होतो कारण वाईट स्वार्थी माणसं सगळीकडेच असतात जी आपल्या फायद्यासाठी कोणतीही गोष्ट हवी तशी तोडून मोडून आपला स्वार्थ साधून घेत असतात. त्यामुळे हलालाचा उपयोग करून मुस्लिम धर्मगुरुंनी, पुरुषांनी मुसलमान स्त्रियांचं लैंगिक शोषण केलं आहे.

अलीकडच्या काळात पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर त्याच्याशी विवाह करायचा असेल तर त्या पत्नीला कारण नसताना व तिची इच्छा नसतानाही दुसऱ्या विवाहाच्या बंधनात अडकवण्याचा प्रकार सुरू झाला. यातूनच मग त्यासाठी या दुसऱ्या नवऱ्याला पैसे देऊन आधीच पटवण्याचे प्रकार सुरू झाले जेणेकरून त्यानं ताबडतोब तलाक द्यावा.

पहिल्या पतीशी लग्न करण्यासाठी दुसरा विवाह करून घटस्फोट घ्यायलाच हवा ही विकृती नंतरच्या काळात सुरू झाली जी आजतागायत सुरू आहे. जर त्या पत्नीला दुसरा विवाह करायचा नसेल आणि मधल्या काळात तिच्या पहिल्या पतीला पश्चाताप झाला आणि त्यानं विवाहाची मागणी केली तर काय या प्रश्नाचा विचार यात केलेला नाही.

कुराण हे फार व्यावहारीक विचार करतं हे आपण लक्षात घ्यायला हवं. पण कुराणचा अर्थ ठरवणारे मौलवी यांनीच या हलालाचं विकृतीकरण करण्यात मोठा सहभाग घेतला हे उघड आहे कारण त्यात त्यांना आर्थिक कमाई होत होती. यांतच मग त्या स्त्रीचं लैंगिक शोषणही सुरू झालं. मध्य पूर्वेतील काही इस्लामी देशांमध्ये अशा माध्यमांतून छुपा वेश्याव्यवसायच सुरू झालेला आहे.

पाहिजे तसे अर्थ लावून शेवटी काय तर स्त्रियांना हवं तस वापरून घेण्याची मानसिकताच या धर्मांध पुरुषांमध्ये आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.