शेव सारख्या पदार्थातून वर्षाला ७ हजार कोटी कमावणारा ब्रॅण्ड म्हणजे हल्दिराम

जगातील कोणतीही फेमस कंपनी एका रात्रीत नक्कीच उभी राहिलेली नसते, त्यात २ -३ पिढयांच्या कष्टाचं आणि घामाचं मोल सामावलेलं असतं. त्यांनी आपला कामाचा दर्जा राखत आणि लोकांचा विश्वास जिंकत वाटचाल चालू ठेवलेली असते.

अशीच काहीशी गोष्ट आहे जगप्रसिद्ध मिठाई आणि नमकीनचा ब्रँड असलेल्या हल्दीरामची.

एका छोट्याश्या दुकानापासून सुरुवात झालेला हा ब्रँड आज HUL, नेस्ले, डॉमिनोज आणि मॅकडॉनल्ड या विदेशी कंपन्यांच्या तोडीस तोड बनला आहे.

आज यशाच्या शिखरावर असलेल्या हल्दीरामची गोष्ट सुरु होते १९३७ साली राजस्थानच्या बिकानेरमधून. गंगाबिशन अग्रवाल यांनी बिकानेरच्या भुजिया बझारमध्ये एक छोटंसं नाश्त्याचं दुकान सुरु केलं. खरंतर तिथं आधीच त्यांच्या वडिलांनी भुजिया शेवची सुरुवात केली होती. पण त्यांचं म्हणावं तेवढं नाव नव्हतं. चवीत वेगळेपण नव्हतं

गंगाबिशन यांनी इथं आणखी काही पदार्थ सुरु करत दुकानाला हल्दिराम हे आपलं टोपण नाव आणि नवीन ओळख दिली. त्यांनी इथल्या भुजियामध्ये काही नवीन प्रयोग करत मुग/मसूर अशा कडधान्यांचा फ्लेवर देत बेसनचा वापर केला. ही आयडिया गंगाबिशन यांना त्यांच्या काकी कडून सुचली होती. प्रयोग अगदी यशस्वी झाला.

त्यामुळे गंगाबिशन यांना या शेवेला लोकांनी आता ब्रॅन्डनं ओळखलं पाहिजे असं वाटू लागलं. त्यासाठी त्यांनी बिकानेरचे महाराजा दुंगरसिंग यांच्या नावावरुन ‘दुंगर शेव’ असं नामकरणं केलं. काही दिवसातच या नावामुळे आणि हाताच्या चवीमुळं ते बिकानेर आणि आजूबाजूच्या भागात भजियावाले म्हणून फेमस झाले.

तोंडात साखर आणि अपार मेहनत या भांडवलावर ते हळू हळू दर आठवड्याला २०० किलो भुजिया शेव विकू लागले. यात किलोचा दर २ पैसे ते २५ पैसे असा होता. धंदा प्रचंड वाढला.

देशाच्या विविध भागातून बिकानेर फिरायला आलेले पर्यटक गंगाबिशन यांच्या इथं भुजियाच्या निमित्ताने आवर्जून थांबू लागले. यात महाराष्ट्र (त्यावेळचा मुंबई प्रांत), कोलकाता, दिल्ली अशा ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश होता. हे पर्यटक परत आपल्या राज्यात गेल्यावर गंगाबिशन यांना अगदी पत्र लिहून त्यांची मिठाई मागवून घेत असतं.

बिझनेस माईंडेड माणसाचं कसं असतं, कुठंही गेलं तरी बिझनेसच.

गंगाबिशन देखील एकदा कोलकत्याला एका लग्नासाठी गेले असताना त्यांनी तिथं हल्दिरामचं दुकान सुरु करण्याची आयडिया सांगितली. आणि अशा पद्धतीनं भुजिया बिझनेस बिकानेरच्या बाहेर गेला, तो थेट दुसऱ्या टोकाला असलेल्या कोलकत्यामध्ये. इथल्या रसगुल्ल्यामुळे हल्दिराम पुऱ्या कोलकत्यामध्ये फेमस झालं.

पुढे जवळपास १९७० पर्यंत गंगाबिशन यांच्या दुसऱ्या पिढीने त्यांचा हा उद्योग वाढवला नाही. मात्र गंगाबिशन यांनी जी ओळख हल्दीरामला दिली होती ती मात्र त्यांनी तेवढ्याच कष्टानं जपली आणि वाढवली देखील.

त्यानंतर गंगाबिशन यांचा नातु मनोहरलाल आणि शिवकिशन यांनी १९७० साली नागपूरमध्ये आणि १९८२ साली दिल्लीमध्ये उद्योग विस्तारला. हल्दिराम अल्पावधीतच इथल्या लोकांच्या देखील पसंतीला उतरलं. दिल्लीतल्या चांदणी चौक इथं असलेलं स्टोअर लोकांची गर्दी खेचू लागलं. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उत्पादन केंद्र चालू करण्यात आली.

कालांतराने काळाची पावलं ओळखतं केवळ भुजिया आणि मिठाईवर अवलंबून न राहता हल्दिरामने रेस्टॉरंट क्षेत्रात प्रवेश केला. आज कंपनीच्या सांगण्याप्रमाणे ३० कोटी ८० लाख लिटर दुध, ८० लाख किलो बटर ६२ लाख किलो बटाटा आणि ६० लाख किलो शुद्ध तुप प्रत्येक वर्षी रेस्टॉरंटस् मध्ये वापरलं जातं.

आज कंपनीची एकूण ३० प्रकारची नमकीन आहेत. तसचं आता ८० टक्के भर हा पाकीट बंद उत्पादन विक्रीवर आहे. पण या सगळ्यात फेमस मात्र अजूनही आलू भुजियाच आहे.

हल्दिराम आता भारतातील फेमस ब्रॅन्ड तर झालाच आहे. पण प्रमुख निर्यातदार देखील आहे. कंपनी जगभरातील ५० देशांमध्ये आपली उत्पादनं निर्यात करते.

कंपनी रिसर्च प्लॅटफॉर्म टॉफलरच्या डाट्यानुसार, हल्दिराम स्नॅक्स ॲन्ड एथनिक फुड्सचा उत्तर भारतातील महसूल २ हजार १३६ कोटी रुपये राहिला आहे. तर पश्चिम आणि दक्षिण या भागातील मिळून १ हजार ६१३ कोटी रुपये आहे. तर पुर्वेकडील भागातील भागात मात्र अजून म्हणावं तेवढं विस्तारता आलेलं नाही. इथला वार्षिक महसूल केवळ २९८ कोटी रुपये आहे.

असा एकूण मिळून हल्दिराम स्नॅक्स ॲन्ड एथनिक फुड्सचा एकूण वार्षिक महसूल २०१९- २० च्या आकडेवारीनुसार ७ हजार कोटी रुपयांचा घरात आहे.

जेव्हा गंगाबिशन सुरुवातील भुजियावर प्रयोग करत होते तेव्हा त्यांना स्वप्नात देखील वाटलं नसावं की आपण भविष्यात कबाब वगैरे अशा गोष्टी पण विकू. पण आता हे प्रत्यक्षात घडत आहे. अलिकडेच हल्दिरामने प्रसिद्ध फ्रेंच बेकरी कॅफे ‘Brioche Dorée’ यांच्या सोबत पार्टनरशिप करार केला आहे. इथं केवळ शकाहारी पदार्थ सर्व्ह केले जाणार आहेत.

या सगळ्या दरम्यान मात्र २०१५ मध्ये कंपनीला एक मोठा झटका बसला होता तो अमेरिकेमध्ये. अमेरिकी फूड रेग्युलेटर यूएएफडीएने हल्दीरामच्या पॅकेट बंद उत्पादनांमध्ये कीटनाशक आणि नुकसान करणारे बॅक्टेरिया असल्याच सांगत हल्दिराम उत्पादनांवर बॅन लावला. पण भारत आणि इतर देशात मात्र याचा फरक पडला नाही. या देशांमध्ये हल्दिरामची घौडदोड आजही चालू आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.