गेल्या वीस पिढ्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे घराणे आपल्या पराक्रमाने देशाची सेवा करत आहेत.

काही दिवसापूर्वी रिटायर्ड मेजर गौरव आर्या यांनी ट्विटर वर एक फोटो शेअर केला होता. आता गौरव आर्या यांना कोण ओळखत नाही. एक टीव्हीवरील सुपरिचित चेहरा. नेहमी कुठल्यातरी राजकीय डिबेटमध्ये भाग घेणाऱ्या गौरव आर्यानां सगळा देश ओळखतो. १९९३ ते १९९९ त्यांनी लष्कराची सेवा केली आणि प्रकृतीच्या कारणाने निवृत्ती घेतली व सध्या एक मोटिवेशनल स्पीकर, विचारवंत म्हणून प्रसिद्ध झालेत.

ते सगळ ठीक पण जीन्स टीशर्ट मध्ये उभ्या असलेल्या आर्यांच्या शेजारी कडक युनिफोर्ममध्ये उभी असलेलीव्यक्ती कोण असा प्रश्न अनेकांना पडला.

ते होते मराठा लाईट इन्फन्ट्रीचे ब्रिगेडियर संग्राम मोहिते. मराठा साम्राज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज.   

एक नाही दोन नाही गेल्या गेल्या वीस पिढ्या पराक्रमाचा वारसा मोहिते घराणे आपल्या खांद्यावर जपलेला आहे.

मराठा साम्राज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते. मूळगाव सातारा जिल्ह्यातील तळबीड. अनेक पिढ्यापासून त्यांच्याकडे गावची पाटीलकी चालत आलेली. हंबीररावांच्या पणजोबांना निजामशाहने बाजी ही पदवी दिली होती.

हंबीररावांचे वडील संभाजीराव हे शहाजीराजेंच्या लष्करात होते. त्यांच्या सोबतीने अनेक लढाया गाजवल्या. याच संभाजीरावांनी आपली लेक सोयराबाई हिचा छत्रपती शिवाजी महाराजांशी विवाह लावून देऊन भोसले घराण्याशी नात घट्ट केलं.

हंबीररावांचे खरे नाव होते हंसाजी मोहिते. ते फक्त शिवरायांचे नातेवाईक नव्हते तर त्यांच्या सैन्यात एक मोठे सरदार देखील होते. त्यांनीच नेसरीला स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर बहलोलखानाशी सामना करताना धारातीर्थी पडले याचा बदला घेतला होता.

यामुळे खुश होऊन महाराजांनी त्यांना हंबीरराव ही पदवी दिली आणि प्रतापराव गुजरांच्या मृत्यू मुळे खाली झालेल्या सेनापतीपदी त्यांची नेमणूक केली.

महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते बनले.

हंबीरराव मोहितेवर महाराजांचा पूर्ण विश्वास होता. त्यांनी पराक्रमाने हा विश्वास कमावला होता.

शिवरायांचे ते मेहुणे होते शिवाय त्यांनी धाकट्या राजाराम महाराजांना आपली लेक दिली होती. पुढे इतिहासात अजरामर झालेल्या याच त्या ताराबाई राणी साहेब. शिवरायांच्या मृत्यू पश्चात हंबीररावांच्या बहिणीची म्हणजेच सोयराबाई राणीसाहेबांची राजाराम महाराजांना गादीवर बसवायची इच्छा होती.

पण हंबीररावानी शिवरायांच्या गादीशी इमान राखलं आणि आपल्या जावयाच्या ऐवजी थोरल्या संभाजीराजेना त्यांच्या हक्काच छत्रपतीपद मिळवून दिलं.

यानंतरच्या कालखंडात जशी थोरल्या महराजांना साथ दिलीखुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ.

या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतु हंबीररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले. त्यांची समाधी तळबीड येथे उभारण्यात आली आहे.

 जेव्हा संभाजी महाराज, राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाला वाटलं की मराठ्यांना सहज संपवता येईल तेव्हा याच हंबीरराव मोहितेचं रक्त असलेल्या ताराराणी बाईसाहेबांनी आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्याचा झेंडा ऊंच धरला. दिल्लीचा बादशाह औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या धुळीस मिळवलं.

मोहिते घराण्याने तलवारीशी आपलं नातं कधी सोडलं नाही.

सुभेदार रामचंद्रराव मोहिते हे भारतीय लष्करात जॉईन होणारे मोहिते घराण्यातील पहिले व्यक्ती. तो ब्रिटीशांचा काळ होता. त्यांचे पुत्र अमृतराव आर्मीमध्ये कर्नल बनले. या अमृतरावांना तीन पुत्र.

थोरले कॅप्टन हंबीरराव मोहिते यांनी दुसऱ्या महायुद्धात पराक्रम गाजवला. त्यांची इटलीमध्ये पोस्टिंग झाली होती. हंबीरराव मोहितेंचे इतर दोन्ही बंधू शिवाजीराव व शहाजीराव मोहिते हे दोघेही कर्नल पदापर्यंत पोहचले होते.

याच कर्नल शिवाजीराव मोहितेंचे सुपुत्र म्हणजे ब्रिगेडियर संग्राम मोहिते.

ईशान्य भारतमध्ये महत्वाच्या जागी त्यांची पोस्टिंग होती. ब्रिगेडियर संग्राम यांनी मोहिते घराण्याचा पराक्रमाचा वारसा समर्थपणे जपला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक पिढ्यांप्रमाणे ते देखील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये आहेत.

दुर्दैवाने आज आपल्या पैकी अनेकांना त्यांचं नाव ठाऊक नसत. याच कारण म्हणजे सेनापतीच रक्त अंगात दौडत असलेली ही माणस बोलण्यापेक्षा, स्वतःची प्रसिद्धी सांगत बसण्यापेक्षा रणांगणात पराक्रम करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांची तलवार बोलते.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. महेश देसाई says

    तो बाजूला फोटो लावलाय तो हंबीरराव मोहितेंचा लावा…
    तुम्ही लावलेला फोटो संताजी घोरपडे यांचा आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.