महाराष्ट्रातल्या मुसलमानांची मातृभाषा मराठीच असायला हवी असं हमीद दलवाई म्हणायचे

जेंव्हा जेंव्हा दोन मोठे व्यक्ती भेटतात, त्यांच्यात चर्चा -गप्पा गोष्टी होतात. अन त्यातून बरंच काही ज्ञान देऊन जातात. असेच दोन मोठे व्यक्ती म्हणजे हमीद दलवाई आणि नरहर कुरुंदकर. त्यांच्यात छान मैत्री होती. एका अशाच भेटीत त्यांच्या चर्चेचा विषय होता मुसलमानांच्या मातृभाषेचा.

कथाकार, कादंबरीकार म्हणून हमीद दलवाई नुकतेच समोर येत होते. मराठीचे एक नवोदित मुस्लिम लेखक म्हणून मराठी लेखकवर्ग त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असे. दलवाई समाजवादी पक्षात होते. पण त्यांचे मित्र सर्वच पक्षात होते. पण कुठेना कुठे दलवाईंच्या मनात न्यूनगंड होता. 

कारण त्यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते आणि ते प्राध्यापकही नव्हते. त्यांचा राजकीय दर्जा नेत्याएवढा नव्हता तर कार्यकर्त्याचा होता. आणि सामाजिक दर्जेबाबत बोलायचं तर एका दैनिकातील वार्ताहराचे होता. कुणाला त्यांची मते पटवून द्यायची झाली तर त्यांना वाटत असायचं कि, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत काही दोष असतील का ? दुसरी एक अडचण म्हणजे त्यांचे इंग्रजी वाचन बेताचे होते. इस्लामचा इतिहास, धर्मशास्त्र याविषयी त्यांनी फारसे वाचलेले नव्हते. उर्दू त्यांना येतच नसे. इतरांचे आपल्याला म्हणणे पटत नाही आणि आपले म्हणणे समोरच्यांना पटवून देऊ शकत नाही अशा अवस्थेतच दलवाईंच्या काही काळ गेला.

मग मात्र अखेर ते आपले म्हणणे बरोबर आहे या भूमिकेवर ठाम झाले…आणि सुरु झाला प्रवास परखड विचारांचा..त्यांच्या परखड लेखणीचा.

अशातच हमीद दलवाई आणि नरहर कुरुंदकर यांची भेट झाली. त्यांच्यात मुसलमानांच्या मराठी मातृभाषेबाबत चर्चा झाली.

त्या काळात दलवाई महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी आहे, असे आग्रहाने म्हणत असत. त्यांना स्वतःला मराठी चांगली यायची. त्यांच्या मराठीला एक प्रवाही पण आक्रमक अशा शैलीचा घाट होता. कोणत्याही मुद्द्यावर बोलताना ते इकडचा तिकडचा फाफटपसारा टाळायचे आणि नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवायचे…याच भेटीत कुरुंदकर यांनी दलवाईंना विचारले,

 “दलवाई, मातृभाषा या कल्पनेचा तुम्ही काही विचार केलेला आहे काय? भारतीय राष्ट्रवाद ज्या स्वरूपात वाढावा अशी आपल्या स्वातंत्र्यलढ्याची आणि संविधानाची भूमिका आहे त्याचा तरी काही तुम्ही विचार केलेला आहे काय? की केवळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी तुमचे भावनात्मक नाते जुळलेले आहे म्हणून तुम्ही मुसलमानांची मातृभाषा मराठी अशी भूमिका घेत आहात?” 

या प्रश्नाबरोबर कुरुंदकरांनी दलवाईंना अशी एक टोमणा मारला कि, तुम्ही राजकीय मंडळी सत्य समजून घेण्याच्याऐवजी जे तुम्हाला सोईचे वाटते त्याला सत्य समजण्याची चूक करीत असता.

त्यावर दलवाई यांनी तडक उत्तर दिले, “कुरुंदकर, तुम्ही काही आदरणीय ज्येष्ठांपैकी नव्हेत. आपण दोघे समवयस्क. तेव्हा तुम्ही काहीतरी बोलावे आणि ते मी मुकाट्याने ऐकून घ्यावे, अशी तुमचीही अपेक्षा असणार नाही. तुम्ही तुमचे थोडे तपशिलाने समजावून सांगा म्हणजे मी त्याचा विचार करतो. पण महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी आहे, हा माझा निर्णय राजकीय सोईखातर दिलेला नाही. त्यामागे माझा काही विचार आहे. तुमची तयारी असेल तर हा विचार मी तुम्हाला सांगतो”, 

………मित्राच्या नात्याने दोघांच्याही मनमोकळ्या चर्चेला सुरुवात झाली. 

कुरुंदकर दलवाईंना म्हणाले, “आपण जर महाराष्ट्र घेतला तर या महाराष्ट्रात कानडी, तेलगू, गुजराती बोलणारे अनेक लोक आहेत. ही मंडळी महाराष्ट्रात आहेत म्हणून त्यांनी आपापली मातृभाषा सोडावी असे तुम्ही म्हणणार आहात काय?  सर्व भारताचे राष्ट्रीयत्व एक आहे आणि कुणीही माणूस भारतात कुठेही गेला तरी त्याला तिथे जाण्याचा, राहण्याचा हक्क आहे असे आपण मानतो. म्हणून मी माझी मराठी भाषा, तिच्याविषयी वाटणारा अभिमान व ममत्व घेऊन मद्रासला राहू शकतो. मद्रासमध्ये जरी मी असलो तरी माझी मातृभाषा मराठीच राहणार. ती तमिळ होणार नाही. म्हणून महाराष्ट्रातील सर्वांची मातृभाषा मराठीच आहे ही भूमिका मला पटतही नाही; ती मला न्याय्यही वाटत नाही.”

दलवाईंची तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत होती…कुरुंदकरांच्या प्रश्नावर त्यांनी अगदी शांतपणे समजावणीच्या सुरत उत्तर दिले…

 “कुरुंदकर, तुम्ही चूक करीत आहात. मी महाराष्ट्रातील, महाराष्ट्रात राहणाऱ्या एकूण एक सर्वांची भाषा मराठी आहे असे म्हटलेले नाही. मी फक्त महाराष्ट्रातील मुसलमानांची भाषा मराठी आहे असे म्हटले आहे”. 

ते पुढे म्हणतात कि, “गुजराती मातृभाषा सांगणारा माणूस आपण गुजरातेतून महाराष्ट्रात आलो असे मानतो. म्हणून गुजराती मातृभाषा सांगूनही तो भारतीय. भारतातच राहत असतो आणि भारतात त्याच्या भाषेचा प्रांत असतो. मुसलमानांनी काय मानावे? आपण महाराष्ट्रात कोणत्या प्रांतातून आलो म्हणून समजावे? एक तर त्यांनी असे मानले पाहिजे की आपण इराण, अफगाणिस्तान, अरबस्तान, तुर्कस्तान येथून भारतात आलो म्हणजे त्यांनी स्वतःला भारतीयेतर व विदेशी नागरिक मानले पाहिजे. नाहीतर मुसलमानांनी असे म्हटले पाहिजे की आम्ही मूळचे इथलेच आहोत, याच प्रांतातले आहोत म्हणून हीच आमची मातृभाषा आहे. कुणी मुसलमान जर मी कानडी आहे, मुळात मी तेलगू आहे. म्हणून माझी मातृभाषा तेलगू अगर कानडी आहे असे म्हणत असेल तर ते मी करण्यास तयार आहे.

पण मी मुसलमान आहे म्हणून माझी मातृभाषा उर्दू आहे हे समीकरण मान्य कसे करायचे?”

दलवाईंची ही तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता हा कुरंदकरांना धक्काच होता.  कारण  मुस्लिम समाजात जन्माला आलेला आणि अतिशय तर्कशुद्धपणे विचार करण्यास तयार असलेला मुस्लिम कार्यकर्ता त्यांना प्रथमच पाहायला मिळत होता.  त्यामुळे त्यांच्या तर्कशुद्ध, प्रांजळ व प्रामाणिक भूमिकेवर कुरुंदकर एकदम प्रभावित झाले. दोघांनी चर्चा थांबवली.  

आणि हीच चर्चा दोघांच्या मनोमीलनाची आणि मैत्रीची सुरुवात ठरली. 

जरी कुरुंदकर दलवाईंसोबत झालेल्या चर्चेत समाधानी होते, त्यांना दलवाईंचं कौतुकच होतं पण त्यांनी दलवाईंच्या भूमिकेत एक कच्चा दुवा असल्याचं आपल्या लेखात सांगितलं.

दोघेही जेव्हा जेव्हा भेटत असायचे तेंव्हा तेंव्हा त्या वेळी त्यांच्या गप्पा किती काळ चालतील, याला काही नेम नसायचा. हमीद दलवाई व्याख्यानाचे निमित्त करून बऱ्याचदा नांदेडला कुरंदकरांना भेटायला येत आणि तिथेच मुक्काम करत. दोघांच्या गप्पांमध्ये रात्र संपायची…कुरुंदकरांच्या पत्नी त्यांना अधून मधून चहा-पाणी करत असायच्या. त्यांनाही कल्पना असायची एकदा का यांच्या गप्पांना सुरुवात झाली तर झोपेचा काय योग काही येत नसतोय. 

बरं मग कुरुंदकरांनी आपल्या लेखात लिहिल्या प्रमाणे दलवाईंच्या मातृभाषेबाबत विचार करण्याच्या पद्धतीत एक कच्चा दुवा होता पण कोणता ?

कुरुंदकरांच्या सांगण्यानुसार, धर्म आणि भाषा यांचा संबंध अविभाज्य नाही. हिंदूंची धर्मभाषा संस्कृत आहे. म्हणून सर्व हिंदूंची मातृभाषा संस्कृत नसते. त्याचप्रमाणे ज्या प्रदेशात मुसलमान राहतील त्या प्रदेशातील भाषा त्यांची मातृभाषा असेलच असे नाही. ज्या समूहात तुम्ही राहता त्या समूहात परंपरेने चालत आलेली भाषा घरात सर्वांच्याच बोलण्याची भाषा असते. 

मुसलमानांच्या समाजात जशी उर्दू भाषा तसेच इतरही भाषा आहेत. जसं कि, कोकणी मुसलमान घरी मराठी बोलतात. त्यांनी स्वतःची मातृभाषा मराठी मानली तर त्यात आक्षेप कोणताच नाही. बंगाली मुसलमान आपली मातृभाषा बांगला, केरळ व तमिळनाडूमध्ये मुसलमान आपली मातृभाषा मल्याळम् व तमिळ मानतात. पण काही मुसलमान जर आपली मातृभाषा उर्दू समजत असतील तर त्यालाही आक्षेप असण्याचे काही कारण नाही.

दोघं मित्रांच्यात पहिलं म्हणजे हमीद दलवाईंना उर्दू येत नसे अन दुसरं म्हणजे कुरुंदकरांचे शिक्षण उर्दूतून झालं.  कदाचित याचमुळे कुरुंदकरांना उर्दूविषयी जसे ममत्व वाटत होते तसे दलवाईंना वाटत नव्हते. असं स्वतः ते लिहितात.

पण कुरुंदकर दलवाईंच्या एका मताचे मात्र ठामपणे समर्थन करतात ते म्हणजे,  मुसलमानांची मातृभाषा उर्दूच असली पाहिजे, हा आग्रह बरोबर नाही. 

भारतीय मुसलमानांना इतर सर्वांच्या बरोबरीने प्रांतभाषा आणि राष्ट्रभाषा यांवर प्रभुत्व मिळवले पाहिजे, नाहीतर त्यांचा उद्धार होणार नाही. हे करीत असताना मुसलमानांना त्यांची जी कोणती मातृभाषा वाटते ती त्यांनी अभिमानाने टिकवावी. मात्र, ती टिकवताना हे हि लक्षात घेतलं पाहिजे कि, भाषा आणि धर्माचा संबंध नसतो. मातृभाषेच्या आधारे आपण आपले प्रेम सांगावे, पण चरितार्थाचा अधिकार मातृभाषेमुळे निर्माण होत नसतो. म्हणून मराठी, हिंदी न शिकता नोकऱ्या मागणे चूक आहे. 

हेच धर्माला कालबाह्य ठरवून, परंपरेला आव्हान देणारे दलवाईंचे विचार आजही लागू होतात हे मात्र नक्की..

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.