हमीदच्या गोष्टी : भाऊ पाध्ये

हमीद निरीश्वरवादी होता. तो ज्या आपत्तीशी झगडला, तशा आपत्तीत निरीश्वरवादी राहणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यात तो धर्माने मुसलमान. आमच्या वयाच्या लोकांना फालतू सांसारिक आपत्तींना तोंड देता-देता सिद्धिविनायकाला आणि शिर्डीला शरण जाताना मी पाहिले आहे.

डॉ. लोहियांच्या मृत्यूनंतर अत्यंत साधेपणाने आणि कसलेही धार्मिक विधी न करता हमीदचे दहन झाले. हमीदच्या सर्व सत्यशोधक चळवळींपेक्षा त्याचे निर्वाणच मला स्पर्शून गेले.

 

‘आज मी फक्त महात्मा गांधींच्या गोष्टी सांगणार आहे.’ डॉक्टर लोहिया यांनी एकदा असे सांगूनच महात्मा गांधींवर भाषण दिले होते. मीदेखील आज हमीदच्या गोष्टी सांगणार आहे, त्यापलीकडे त्याचे माझ्याकडे काही राहिले नाही.

मी अलीकडे त्याला भेटलो नव्हतो. तो कधीही मान पुढे करून डोकावत, मला शोधत आला नाही आणि त्यामुळे एखाद्या हॉटेलात बसून गप्पाटप्पा झाल्या नाहीत. तो गोष्ट अत्यंत रसाळपणे सांगायचा. अरेबियन नाईट्‌स ते हमीद दलवाई- सारेच मुसलमान वर्णन करण्यात मोठे रसाळ. ऐकत राहावी.

दळवी यांचे दलवाई कसे बनले किंवा कुणा तरी मुसलमानाने आपल्या दुष्मनाला आपल्या मुसलमानी घराच्या भूलभुलैय्यामध्ये दावत देऊन त्याचा काटा कसा काढला वगैरे.

दै. मराठाची नोकरी सोडून तो मुसलमानांना अक्कल शिकवण्याच्या पाठीमागे हात धुऊन लागला होता. त्याचा थांगपत्ता कुठे असेल, ते काय सांगावे? दै. मराठात असताना त्याच्या सहकाऱ्यांना मी विचारायचो, ‘हमीद सध्या कुठे आहे?’ ते विनोदाने म्हणत, ‘तो आता पाटण्याला असेल जे. पी.शी वाद घालत. मग आला की सांगेल, मी जे.पींना एक सवाल टाकला. जे. पी. त्यावर नॉन-प्लस्ड ना!’ मला एकदा तो असाच रेल्वेच्या डब्यात एकटा बसलेला आढळला. मी त्याच्याजवळ बसलो. मी त्याला डिवचण्यासाठी म्हणालो, ‘‘काय हे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे लफडे सुरू केले आहेस?’’ तो म्हणाला, ‘‘तुला काही मिळत नाही वाटतं हातात! तू काढ शोधून!’’

हां, मी काही दिवस सिनेमा-व्यवसाय शोधून काढला. हां!

आमच्या दोघांच्या लेखी काही तरी शोधून काढणे, हा एक आवश्यक भाग होता. कारण एकदा आम्ही एकाच प्रवाहात होतो. समाजवाद्यांच्या, साहित्याच्या आणि बेकारीच्या त्या प्रवाहात आम्ही गटांगळ्या खात नेहमीच  एकत्र येत असू. हमीद दलवाई या नावाविषयी मला कुतूहल वाटले ते त्याच्या सत्यकथेमध्ये (पंचवीस वर्षांपूर्वी) छापून आलेल्या ‘बेकार माणसाच्या गोष्टी’मुळे. मी कामगार चळवळीमधून बाहेर पडून आता बेकारच होतो. बेकारीचे चटके बसल्यामुळे हमीदची ती कथा मला एकदम भिडली होती.

एक दिवस माझी बायको शोषण्णा युनियनच्या कचेरीवर हमीदला घेऊन आली.

हमीद त्या वेळी फारच कोवळा, भाबडा, साधा समाजवादी कार्यकर्ता होता. असा कार्यकर्ता म्हटला म्हणजे, तो शोषण्णाला चिकटायचाच. आमच्या युनियनच्या नीरस मंडळींत लिहिण्याची धडपड करणारा आणि थोडेफार वाचलेला मीच. हमीदचीही सत्यकथेतली गोष्ट मी वाचली होती. त्यामुळे त्याची आणि माझी दोस्ती जमली. साहित्यक्षेत्रात हमीद हा मला सीनिअर होता. फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर म्हणून तो तीनही भूमिका पार पाडू लागला.

दोस्तोव्हस्की नामक कुणा रशियन कादंबरीकाराचा ग्रंथोबा तो काखेत घेऊन यायचा. त्यामधील काही मजकूर तो माझ्यासमोर ठेवायचा, ‘वाच- असं लिहिता आलं पाहिजे!’ त्यामुळे मी दोस्तोव्हस्कीच्या पाठीमागे लागलो. साहित्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याला फारच उत्साह. त्या वेळी साहित्याच्या चर्चा अशा चालत- ‘बा. सी. मर्ढेकरांनी कवितेला नवे वळण दिले.,’ ‘गंगाधर गाडगीळांनी मराठी कथा गोष्टीच्या फॉर्ममधून सोडवली’.

असल्या चर्चांना हमीद मला फरफटत घेऊन जायचा. त्याने रूपारेल कॉलेजमध्ये एक चर्चा मंडळही स्थापन केलं होतं. शिवाय प्रा. शांता शेळके यांचे दादरचे घर, अभिरुचीकार चित्रे यांचे घर, इकडेही तो मला घेऊन जायचा. कधी तरी या चर्चेमध्ये ‘हमीद दलवाईने मराठी साहित्यात मुसलमान जीवन आणले’ असे बोलले जावे आणि आपले कान तृप्त व्हावेत, असे त्याला मनापासून कुठे तरी वाटत असावे. त्या वेळी लेखकमंडळी असेच लिहीत.

श्री.ना.पेंडसे कोकणावर किंवा व्यंकटेश माडगूळकर माणदेशी माणसांवर. माझ्या पहिल्या दोन्ही कादंबऱ्या कामगार चळवळीवर होत्या. मला हमीद म्हणाला, ‘‘तूदेखील चळवळ हाच विषय घेतला आहेस काय?’’ मी त्याला म्हणालो, ‘‘मी कामगार चळवळीला कायमचा रामराम ठोकलाय!’’

तो काळ असा होता की, राजकारण आणि साहित्य हातात हात घालून जात नसे. हमीद आणि मी अशी चार- दोनच तरुण माणसे राजकारणातही रमत असू आणि लिहीतही असू. हमीदला माझ्या लिखाणात खूप इंटरेस्ट असे आणि मलाही त्याच्या लिखाणात खूप इंटरेस्ट असे, याचे कारण हेच असावे. हमीद माझ्या कथा घेऊन सत्यकथेत जायचा आणि परत घेऊन यायचा. त्यावर संपादक राम पटवर्धन यांनी लिहिलेला शेरा, त्याच्या टिपिकल खटक्या-खटक्याने हसण्याबरोबरच वाचून दाखवायचा, ‘‘घ्या – तुमचा अनुभव गोळीबंद नाही.’’

त्या वेळी विजय तेंडुलकर ‘वसुधा’ मासिकाचे संपादन करायचे. एक दिवस मला त्यांच्याकडे घेऊन गेला. माझ्या लिखाणाविषयी विजयरावांनी त्या वेळी सहानुभूतीने चौकशी केली. याचे कारण, माझ्या लेखनगुणासाठी हमीद जामीन राहिला होता ना!

लेखक म्हणून आयुष्यात कमाई करण्यासाठी असा आमचा दोघांचा स्ट्रगल चालला होता. एरवी आमची उमेदवारी चालली होती, तरी आमच्या उड्या फार मोठ्या होत्या. आपल्या हातून काही तरी युगप्रवर्तक लिखाण झाले नाही तर काही खरे नाही, असे आम्हाला मनोमन वाटायचे. दोस्तोव्हस्की तर आमच्या माथ्यावरच बसला होता. नाकेला, उंच, फाटक्या देहाचा, गोरा, दाढी वाढवलेला, तोंडात सतत ‘सिमला’ सिगारेटचे थोटूक चोखत असलेला हमीद म्हणजे मला दोस्तोव्हस्कीच वाटे. दोस्तोव्हस्की म्हणजे एक तुफान जीवन जगलेला लेखक.

त्याचे अनुभव किती मोठे असतील!

हमीदने एक दिवस मला एक किस्सा सांगितला.

लहानपणी गावातल्या नदीमध्ये भर पुरात त्याने होडके हाकारले नि मग पुराने त्याला असे काही वाहून नेले की, आपण जिवंत राहतो की मरतो याची त्याला भ्रांत पडली. ‘‘अनुभव हा असा असतो-’’ मला तो म्हणाला. असे अंतर्बाह्य तुफान जगण्यासाठी आणि जीवघेण्या अनुभवासाठी काहीही करायचे. पण वाटून काय उपयोग? बेकारी हात धुऊन पाठीमागे लागली होती आमच्या. बेकारीने आमच्या जीवनातला बराचसा मौल्यवान वेळ आणि संधीही वाया गेली. एक दिवस मी निराश झालो असता हमीद मला म्हणाला, ‘‘प्यासा सिनेमा बघ- तुझा लेखकाचा इगो त्यामुळे सुखावला जाईल.’’

हमीद आणि माझे त्या वेळचे संबंध म्हणजे ‘रोमन हॉलिडे’मधल्या राजवाड्यातून काहीही न घेता पळालेली राजकन्या आणि जुगारात कमाई घालवून बसलेला पत्रकार यांच्यामधील ‘फिफ्टी-फिफ्टी’ भागीदारासारखे. हमीदला पैशाची गरज नेहमीच असायची आणि त्या वेळेला त्याच्या पद्धतीने डिप्लोमॅटिकली पैशाचा विषय काढण्यासाठी तयारी करून तो यायचा. अत्यंत गांभीर्याने तो पैशांची मागणी करायचा.

पैसे परत देण्याबद्दल अत्यंत आशादायक चित्र रेखाटायचा. तोपर्यंत मी एक शब्दही बोलत नसे. खिशातील पैशांचा अंदाज घेऊन, आणखी दोन दिवस चालतील एवढे पैसे ठेवून त्याला किती देता येतील, न देता आल्यास आमचा कॉमन मित्र विठ्ठल वाळिंबे किंवा दुसऱ्या कुणाच्या गळ्यात त्याला बांधता येईल का- वगैरे वगैरे ठरवायचो. परिस्थितीच इतकी बेकार झाली होती की, दिलदारपणानेही लाजून तोंड लपवावे.

एकदा हमीदने धंदा करायचे ठरवले. त्या वेळी त्याने माझ्याकडे चक्क 250 रुपयांची मागणी केली.

त्या वेळी माझा पगारही 250 रुपये नव्हता. मी मोठा हुशार. हमीदला दुखवायचे नाही आणि आपल्या खिशाला चाट नको, म्हणून त्याला विठ्ठल वाळिंबे या आमच्या भाबड्या मित्राच्या गळ्यात बांधले. बिचारा विठ्ठल फसला. पैसे देऊन बसला, पण ते मुदतीच्या आत येण्याची शक्यता दिसेना. तो चिडून हमीदला अद्वातद्वा बोलू लागला. हमीद अगदी खालच्या आवाजात त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागला. मी सेफ होतो. अर्थात, पैसे देण्या-घेण्यामुळे आमचे संबंध बिघडले नाहीत. हमीद आमच्याकडे येत राहिला.

हमीदने एकदा बॉक्सेसचा धंदा सुरू केला, नंतर ट्रकचा. दोन्ही धंदे बुडाले. त्याच्या ट्रकच्या धंद्याचा किस्सा विजय तेंडुलकर वर्णन करून सांगत, तो ऐकण्यासारखा आहे. पैशांवरून संबंध तुटतात म्हणतात, पण हमीदचे संबंध कधीच तुटले नाहीत. पैसे घेऊन व देऊनही तो भेटायला येतच असे.

हमीद कसा यायचा? तुम्ही कधी हॉलीवुडहून येणारी ‘ट्रिनिटी’ ही विनोदी स्टंट चित्रपटाची मालिका पाहिली आहे? ‘वॉच आऊट- वुई आर मॅड’ वगैरे! त्यातला तो तरुण पोरगा टेरेन्स हिल पडद्यावर दिसला की, काही तरी आता गडबड-धमाल होणारच असे वाटते – तसे हमीद आला की, वातावरण व्हायचे. त्याच्या ‘कोपरी’मध्ये काही तरी ‘मिश्चिफ’ असायचीच!

त्याने आपल्या एखाद्या मित्राचे प्रेम प्रकरण पाहिले असेल, आपल्याविषयी कुणी तरी काही तरी बोलल्याचे ऐकले असेल… किंवा दुसऱ्या कुणाविषयी त्याला काही तरी गॉसिप सांगायचे असेल… त्या सर्वांना तो वाट करून द्यायचा!

‘‘अरे, तुझा तो मित्र एका जून आणि थोराड पोरीबरोबर  फिरताना पाहिला!’’ हमीदने असा बाँबगोळा टाकला की, आमचे मित्रमंडळ हादरलेच पाहिजे. एकदा त्याच्या ऑफिसातल्या एका पोरीवर माझी लाईन होती. मी म्हणालो, ‘‘हमीद, आपले जुळवून दे ना!’’ तो म्हणाला, ‘‘ती कुठे आणि तू कुठे!- तुला ती शोषण्णाच ठीक आहे!’’ हमीदने मला बऱ्याच दीक्षा दिल्या. काही सांगण्यासारख्या, काही न सांगण्यासारख्या.

फटकळपणा हा प्रथम मी हमीदकडून शिकलो.

तो चार-चौघांत सरळ विचारायचा- ‘‘बाईकडे जातोस की नाही? तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे!’’ त्या काळात समाजवादी पक्षाचे दोन तुकडे झाले आणि आम्ही लोहिया समाजवादी झालो. बाटग्याला आपल्या आधीच्या धर्माचा जसा राग असतो, त्याप्रमाणे आम्ही प्र.सो.पा.चा तिटकारा करायचो आणि आमच्या कळपात एखादा प्र.सो.पा.वाला आला की, मी त्याला उचलून हमीदपुढे टाकायचो.

एखाद्या खाटकाप्रमाणे त्याच्यावर शाब्दिक सुरी फिरवून हमीदने त्याची बोटी-बोटी करून नाही टाकली, तर नावच नको. हमीदभाईने मनात एका कादंबरीची जुळवणी केली. तिचे नाव होते ‘पछाडलेली!’ खरा पछाडलेला असायचा हमीदच! नाना धंद्यांत मार खाऊन, नाना-पैशाच्या भानगडी करून आणि बेकारीमध्ये व तब्येतीच्या तक्रारींमध्ये पोळूनही तो आपल्या संकल्पित कादंबरीप्रमाणे (‘पछाडल्या’प्रमाणे) वागायचा. त्याची आक्रमक वृत्ती कुठल्याही अडी-अडचणीमुळे कणभरही कमी झाली नव्हती.

हा लेखक लिहायचा कमी. प्रसंगी अखंडित तात्त्विक वादावरून कुणाशीही भांडाभांडी काढावी, त्याला निरुत्तर करावे, याशिवाय त्याला सुखाची झोप लागत नसावी.

हमीदभाईचा एक सीरिअस प्रश्न होता.

एक दिवस त्याने माझ्याजवळ वाच्यता केली- लग्न! हमीदसारखा फटकळ माणूस हा प्रश्न सीरिअसली घेईल, असे मला कधी वाटले नव्हते. ऑफिसमधल्या कार्बन पेपर्सचे काळे डाग खादीच्या कपड्यांवर उमटले आहेत, बोकडासारखी दाढी वाढवली आहे, तोंडात सिमलाचे सिगारेटचे थोटूक आहे- असा हमीदचा बकाल अवतार.

शोषण्णाला तितक्याच धश्चोटपणे सांगायचा, ‘‘अगं, तू कशाला माझी बहीण म्हणवतेस? तुझ्या एकाही मैत्रिणीची माझ्याशी ओळख करून देत नाहीस.’’ शोषण्णा तरी काय करणार? हा असामी कितीही चांगला लेखक असला तरी, त्याचे फटकळ तोंड उघडले की, शोषण्णाची कुठली मैत्रीण त्याला घाबरली नसती? पण एक दिवस त्याचा लग्न हा प्रश्न खरोखरीच सीरिअस असल्याची मला जाणीव झाली. हा एक चांगला लेखक, राष्ट्रीय व समाजवादी वृत्तीचा मुसलमान- याने कधी सुखाचा संसार करायचा ठरवला; तर आपल्या भाभीशी चार शब्द बोलायचे सोडा, तिचे नखही दृष्टीस पडणार नाही- कारण ती असणार बुरख्यात.

शिकलेली असणार, ‘अलिफ बे’ इतपावत. आपल्याला आपल्या तोडीची तरी- किमान मॅट्रिकपर्यंत शिकलेली, ‘पडदा’ वगैरे न पाळणारी आणि मित्रांचे आदरातिथ्य वगैरे व्यवस्थित पार पाडेल अशी बायको मिळणे दुरापास्त आहे, याची चिंता त्याला जाळायची.

एक दिवस अचानक तो ‘आर्किमिडिज’प्रमाणे ‘युरेका – युरेका’ म्हणतच माझ्याकडे आला.

त्याने माझ्या कानावर बातमी घातली ती अशी- खादी बोर्डात एक मेहरुन्निसा नावाची मुलगी आहे. ज्या अर्थी खादी बोर्डात लागली आहे, त्याअर्थी ती किमान मॅट्रिक असणारच- वगैरे. ‘पुढे प्रगती?’ होईल, म्हणाला. पण आपल्यासाठी खुदाने मुलगी निर्माण केली आहे, हे काय कमी आहे? त्यानंतर एक दिवस तो फोर्टात मिस्त्री भवनमध्ये जिथे खादी बोर्ड होते, त्याच्या टेरेसवर तिच्याशी दोन-तीन तास प्रेमालाप करून आला. त्याने आपण बाजी मारल्याचा किस्सा सांगितला.

त्या वेळी मी हा फटकळ आणि बेछूट असामी एका तरुण मुलीशी प्रेमालाप कसा करत असेल, हे चित्र डोळ्यांसमोर उभं करत होतो. काही केल्या ते चित्र डोळ्यांसमोर उभे राहिना. एकूण हमीद लग्न करत होता.

हमीदचे लग्न म्हणजे ते साधेसुधे अन्‌ मिळमिळीत कसे होईल?

काही तरी त्याला झणझणीतपणा हवाच होता. मेहरुन्निसाच्या सग्यासोयऱ्यांनी हमीदला नापास केले होते. आता हमीद एलेमेंटस्‌मध्ये आला. काही तरी विरोध होतो आहे, कोणी तरी आपल्यासमोर लढण्यासाठी उभा राहिलाय हे पाहिलं की, हमीदमधील लढवय्याचे सगळे गुण उफाळून यायचे. त्या वेळी हमीदची सासुरवाडी दादर (सेंट्रल रेल्वे) स्टेशनजवळच्या त्या बकाल वस्तीत होती.

मी नायगावला स्प्रिंग मिलमध्ये कामाला. हमीदला माझ्याकडे यायचं म्हणजे, सासुरवाडी समोरून यावं लागत असे. हमीदचा मी मित्र असल्यामुळे त्या वस्तीसमोरून जाताना माझ्याही कण्यातून एक थंडगार शिरशिरी जात असे. एक दिवस एका असामीने हमीदची गर्दन गप्‌कन धरली. झाले- त्याच्याशी झटापट करून हमीद निसटला आणि माझ्याकडे आला. त्याची तोळामासा प्रकृती त्या दिवशी संतापाने पेटली होती. जीभ चाबकाप्रमाणे सपासप चालली होती.

मेहरुन्निसा धीराची. तिने हमीदला वरले होते, म्हणजे वरले होते. लग्नाचा दिवस ठरला. त्या वेळी आपले दुष्मन आपल्या वाटेमध्ये काय काय अडचणी आणतील, या शंकांनी हमीद घेरलेला असे. अखेर मेहरुन्निसा घरातून बाहेर पडली, शादी नीटपणे झाली. हमीद आणि मेहरुन्निसा मुंबईच्या एका उंच शिखरावर अँटॉप हिलवर पोहोचले. ते एक मुसलमान होस्टेल असावे. एक दिवस हमीद मला पाहुणचारासाठी घेऊन गेला. हमीद नेहमीच अशा भलत्याच वैराण ठिकाणी राहायचा.

प्रथम जोगेश्वरी स्टेशनपासून ओशिवरा येथे भन्नाट रस्त्यावर एकच एक दलवायांची बंगली होती. तिथे तो राहायचा. आता अँटॉप हिलवर ह्या नवपरिणत युगुलाचा तो संसार पाहण्यासाठी मला अक्षरश: तंगड्या तोडाव्या लागल्या. पण वर गेल्यावर बरं वाटलं. मला मुसलमानांच्या संस्कृतीचे एक आकर्षण नेहमीच वाटले. ते म्हणजे, त्यांच्या देवाच्या घरात भरपूर मोकळी जागा ठेवतात. मला आता ते घर संपूर्ण आठवत नाही, पण खूप मोकळे वाटत होते.

माझ्या स्वागतासाठी चहा व भजी होती आणि मी त्यांना कसलेच प्रेझेंट घेऊन गेलो नव्हतो. आपल्या सुखी संसाराविषयी सांगण्याऐवजी त्या दोघांनी दुष्मनाच्या हालचाली इतक्या ऐकवल्या की, त्या रीत्या जागेच्या भिंतींना कान तर नाहीत ना, असे मला भय वाटू लागले.

अखेर हमीदची आणि सग्यासोयऱ्यांची गोडी झाली असावी. हमीद आणि मेहरुन्निसाबाई They lived happily everafter असे जीवन जगू लागली होती. धर्मेच म्हणजे सत्यशोधक समाजाच्या कार्यात व अर्थेच- कारण मेहरुन्निसाही नोकरी करत होती. दोघांनी परस्परांना चांगलीच साथ दिली.

हमीदने काढलेला पहिला मुस्लिम स्त्रियांचा मूक मोर्चा आठवतो.

एक हमीद आणि पाच मुस्लिम बायका मागे. प्रत्येकाच्या हातात एक एक घोषणा- फलक. एकूण असा मोर्चा काढायला, नव्हे तर, त्यात सहभागी व्हायलाही हिंमत असावी लागते. मेहरुन्निसाबाई त्यांत एक होत्या. मी हमीदची बायको असतो, तर त्या मोर्चात मुळीच गेलो नसतो.

‘डोंबाऱ्याचा खेळ’ ही माझी पहिली कादंबरी हमीदच्या पहिल्या पुस्तकाच्या आधी आली. एक प्रकारे मी शर्यतीत आघाडीच मिळवली होती. लेखकाचे पहिले पुस्तक त्याच्या वाङ्‌मयीन जीवनातील घटना असते. माझ्यापेक्षा सीनिअर असलेले हमीद, दिलीप चित्रे यांची पुस्तके रेंगाळली आणि त्यामुळे त्यांच्या लिखाणावर लक्षणीय परिणाम झाला, असे माझे मत आहे. माझी स्प्रिंग मिलमधील नोकरीही याच वेळी संपली.

हमीद त्या वेळी मला ना.वि. काकतकर संपादन करत असलेल्या ‘रहस्य-रंजन’ मासिकाच्या फोर्टमधील कचेरीत घेऊन गेला. तिथे माझी अशोक शहाणेशी गाठ पडली. अशोक शहाणे ‘डोंबाऱ्याचा खेळ’ वाचत होता. त्याने पुढील अंकातच माझ्यावर फर्मास परीक्षण लिहून मला आघाडीच्या लेखकांत नेऊन बसवले. त्यामुळे माझी हस्तरेषाच बदलून गेली.

आतापर्यंत मी एक पाय राजकारणात आणि एक पाय लेखनात, अशी वाटचाल करत होतो; पण मी आता राजकारणातून माझा पाय उचलून फक्त लेखनाच्या दगडावर ठेवायचे ठरवले. माझ्या पुस्तकानंतर लगोलग हमीदचा ‘लाट’ हा कथासंग्रह अशोकच्या हातात दिसू लागला. ‘लाट’वर अशोकने लिहिलेल्या परीक्षणाचे हस्तलिखित मला वाचायला मिळाले.

त्याने हमीदचे पुस्तक झोडून काढले. मला त्यामुळे फारच वाईट वाटले. मी अशोकला म्हणालो, ‘‘तुला काय म्हणायचे आहे? हमीद चांगला लिहित नाही का? हमीदचे अनुभव किती समृद्ध आहेत ना!’’

‘‘आहेत ना! मला ठाऊक आहे. त्याच्याजवळ अनुभवांचा खूप साठा आहे. पण त्यापैकी लेखनात काहीच उतरत नाही.’’ अशोकच्या परीक्षणानंतर हमीदची हस्तरेषाही बदलली असावी. त्या परीक्षणामुळे तो नक्कीच दु:खी झाला असावा, पण त्याला इलाज नव्हता. त्या परीक्षणानंतर हमीद लेखनातून आपला पाय उचलून राजकारणात हळूहळू ठेवतो आहे, असा भास झाला.

हमीदचे त्यानंतरचे पुस्तक ‘इंधन’. त्याच्यावर मी ‘नवशक्ती’मध्ये चांगले परीक्षण लिहिले असले, तरी मी हमीदकडून अधिक जोरदार लेखनाची अपेक्षा करत होतो. हमीद जी माणसं पाहत असे – ज्या घटना पाहत असे, ती उघडी दिसतील अशा पद्धतीने त्यांचा आपल्या लिखाणात उपयोग करायचा.

‘इंधन’मधल्या व्यक्तीमुळे चिपळूणमध्ये निदर्शने झाली, ती त्यामुळेच. हमीदच्या ‘इंधन’ला राज्य पारितोषिक मिळाले, त्याच वेळी वासूनाक्याचे वादळही उठले होते. आचार्य अत्रे माझ्यावर जोरात हल्ले करत होते. एक दिवस हमीदचा मला फोन आला. तो म्हणाला, ‘‘मी आणि शिरीष पै, साहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो आहोत. तू अस्वस्थ होऊ नकोस.’’ वगैरे.

हमीदने ‘इंधन’नंतर मराठी साहित्यात काही भर टाकली नाही किंवा मराठी साहित्यात कोकणचा मुसलमान आणला नाही वगैरे- म्हणून काहीच बिघडले नाही- अर्थात, त्याचे; मराठी साहित्याचे नव्हे! मराठी साहित्यात आता प्रादेशिक कादंबऱ्यांची पहाट झोपडपट्टी, वासूनाक्याची दुपार आणि कोसला व बॅ.धोपेश्वरकर यांची संध्याकाळ संपून चक्क भयाण रात्र सुरू झाली होती. या रात्रीमध्ये मलाही चांगली प्रसिद्धी मिळाल्यानंतर फारसा इंटरेस्ट राहिला नव्हता.

आता साहित्याच्या माध्यमापेक्षा चित्रपटाच्या माध्यमांतच काही करता आले तर ते बरे, असे मला वाटू लागले होते. मग उगीच या साहित्याच्या अंधारमय जीवनात ठेचकाळण्यापेक्षा हमीद मुसलमानांमध्ये सुधारणेचे कार्य करू लागला. त्यामुळे त्याचे कर्तृत्वही प्रकाशात आले.

मी हिंदू-मुसलमान वाद मानत नव्हतो. त्यामुळे रॉड स्टीगर या गोऱ्या नटाला ज्याप्रमाणे काळ्या सिडने पोशिएने म्हणे वर्णभेदाचे स्वरूप समजावून दिले, त्याचप्रमाणे मला हमीदने या जातीयवादाचे स्वरूप समजावून दिले. आम्ही सेवादलवाले काय किंवा राष्ट्रीय चळवळवाले काय, एखाद्या हिंदूलाच मुसलमानी टोपी चढवून, दाढी चिकटवून आणि लुंगी नेसवून दुसऱ्या हिंदूचा हातात हात धरून ‘हिंदू- मुसलमान भाई भाई’ म्हणून घोषणा देत होतो. त्या बकवास होत्या, हे हमीदमुळे मला समजले.

पुढे ‘नवशक्ती’मध्ये असताना हमीदच्या चळवळींना पाठिंबा देण्याचे आमचे धोरणच होते. हमीद ज्या ‘दै. मराठा’त काम करत होता, त्या मराठापेक्षा नवशक्तीने हमीदचा पाठपुरावा केला. हमीदच्या साऱ्या चळवळींचे रिपोर्टिंग करणे माझ्याकडेच असे. त्याचे पुस्तक आले की, त्याच्यावर परीक्षणे लिहिणेही माझ्यावरच सोपवले जाई.

हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रश्नाला हमीदने एक वेगळा, अधिक तर्कशुद्ध आणि धडाडीचा दृष्टिकोन दिला, यात शंका नाही. मला एकदा तो म्हणाला होता, ‘‘काय तुम्ही डरपोक हिंदू. तुम्ही चाळीस कोटी असून, आठ कोटी मुसलमान तुम्हाला टरकवतात!’’ त्या वेळी मला माझे बालपण आठवले.

लहानपणी आम्हाला ज्याने-त्याने मुसलमानाचा बागुलबुवा दाखवावा. त्यामुळे आम्ही टरकू बनलेले- आता मोठेपणी मग आर. एस्‌. एस्‌. मध्ये जाऊन आणि हिंदू महासभेत जाऊन आमची भीती कशी जाणार? अर्थात, मुस्लिमांच्या प्रश्नाबाबत माझा इंटरेस्ट यथातथाच होता.

हमीद म्हणजे, त्याच्या न लिहिलेल्या कादंबरीच्या नावाप्रमाणे मुसलमानांच्या प्रश्नाने पछाडलेला होता. त्याचे  ते पाकिस्तान दौरे, जयप्रकाशांपासून बाळ ठाकऱ्यांपर्यंत ज्या-त्या पुढाऱ्याला हिंदू-मुस्लिम प्रश्नाबाबत समज देण्याची धडपड, बुजुर्ग नेते एम्‌. हॅरिस यांच्याशी सवाल, जबाब- अशी सारखी धुमश्चक्री चालली होती. त्या वेळी मुंबईमध्ये युवक क्रांती दल ऊर्फ यूक्रांद ही संस्था हमीदच्या कार्याचा पाठपुरावा करायची.

हमीदला युक्रांद आणि युक्रांदला हमीद असे समीकरण झाले होते.

एकदा दादरच्या साने गुरुजी विद्यामंदिरात युक्रांद आणि जनसंघाच्या विद्यार्थी परिषदेचे तद्दन confrontation झाले होते. हमीदचे भाषण ऐकण्याचा त्या वेळी मला प्रथम योग आला होता. मला पूर्वी नेहमी वाटायचं की, हमीद बोलण्यात माझ्यासारखाच आहे. व्याख्याने टाळणारा. पण आता हमीद चांगलाच बोलायला शिकला होता. त्याच्या भाषणाचा रिपोर्ट देताना हमीदने विद्यार्थी परिषदेचा धुव्वा उडवला म्हणून मी लिहिले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते माझ्यामागे लागले होते.

हमीदच्या ह्या भाषणावर दुसरीकडे लिहिताना मी कॉमेंट्‌स केल्या. ‘हमीदचे भाषण म्हणजे, पैगंबरापासून औरंगजेबापर्यंतचा इतिहास ऐकावा लागतो!’ त्यानंतर हमीद मला भेटला तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘आज माझं अमुक तमुक ठिकाणी भाषण आहे; मी पुन्हा पैगंबरापासून औरंगजेबापर्यंतचा इतिहास सांगणार आहे. ये, तुझा इतिहास पक्का होईल.’’ हमीदबरोबर पूर्वीप्रमाणे दिलखुलासपणे बोलायचा माझा हा अखेरचा प्रसंग.

त्यानंतर हमीद एका चळवळीचा पूर्ण नेता झाल्याचे दृश्य पाहण्याचा योग आला.

मराठा मंदिर येथे भरलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या परिषदेत. मुस्लिम सत्यशोधक ह्या चळवळीने आता विचारात येण्याइतके मोठे स्वरूप धारण केले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते, अनेक मुसलमान महिला आणि चळवळीच्या अग्रस्थानी हमीद विराजमान झालाय. एक विचारवंत, धडाडीचा मुत्सद्दी आणि आपले सर्वस्व त्या चळवळीमध्ये झोकून देणारा लढवय्या.

अचानक त्याचा जीवनपट माझ्या डोळ्यांसमोरून हलला. लहान मुलाने हातातला रंगीत गॅसचा फुगा हवेत सोडून द्यावा आणि त्याचा अस्मानात क्षणोक्षणी उंच जाणारा प्रवास कुतूहलाने पाहत राहावा, त्याप्रमाणे परिषदेच्या कोपऱ्यामध्ये बसून मी हमीदकडे पाहत होतो. इतक्यात दोन कार्यकर्ते आले आणि त्यांनी मला उचलून पत्रकारांच्या रांगेत नेऊन बसवले.

त्यानंतर माझ्या नि हमीदच्या मुलाखती कमी. हमीदला आमच्यासारखे वेगवेगळ्या विषयांत इंटरेस्ट नाहीत आणि मुस्लिम चळवळीमध्ये त्याने लक्ष घातल्यामुळे तो पछाडल्यासारखाच वागत होता. एकदा मी चक्क त्याच्याबरोबर चर्चगेट ते बांद्रा हा प्रवास केला. या प्रवासामध्ये तो इतका काही आपल्या विचारात गढला होता की, मला तो विसरलाच होता.

दुसरी गोष्ट, माझ्या लक्षात आली होती- ती म्हणजे, तो सतत अस्थिर होता. आपले हात, बोटे व भिवया अशा काही हलवायचा की, मलाही बेचैन वाटू लागले. बांद्रा येताच मी त्याचा निरोप न घेताच उतरलो- त्या वेळी माझ्यावरचे एक दडपण दूर झाल्यासारखे वाटले. मुंबई हे एक दुरावा निर्माण करणारे शहर आहे. एखाद्या क्यूमध्ये अधिकाधिक माणसे घुसू लागली म्हणजे आपण जसे दूर फेकले जातो, तसे मुंबईमध्ये आपण एकमेकांपासून दूर फेकले जातो.

हमीदला मी अलीकडे भेटत नसे. मी अतिशय आळशी, एकलकोंड्या आणि माणूसघाण्या झालो होतो. मुंबईमध्ये मधुमेह आणि हे स्वभावदोष एकदम येतात. मला आठवते- एकदा मी मेहरुन्निसा भाभीला चलाखीने टाळून सटकण्याचा प्रयत्न करत होतो, पण भाभीने मला पकडून चांगलेच शरमिंदा केले होते. हमीदपासून मी दूर गेलो, याच्याबद्दलही मला अशीच शरमिंदगी वाटते…

परवा हमीद गेल्याचे वृत्त आले. तेव्हा एक मित्र, हमीदचे कुठल्या मशिदीमध्ये दफन होणार याची माहिती काढण्यासाठी फोनवर फोन करत होता. अखेर तो ‘झूम’च्या कचेरीमध्ये आला नि मला म्हणाला, ‘‘काही कळत नाही, हमीदला कुठे नेला ते?’’ मी म्हणालो, ‘‘त्याला चंदनवाडीत इलेक्ट्रिक भट्टीत नेण्यात आले आहे. जा तिथे.’’ तो म्हणाला, ‘‘तू चौकशी केलीस का?’’ मी म्हणालो, ‘‘नाही, पण मला ठाऊक आहे.’’

हमीद निरीश्वरवादी होता. तो ज्या आपत्तीशी झगडला, तशा आपत्तीत निरीश्वरवादी राहणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यात तो धर्माने मुसलमान. आमच्या वयाच्या लोकांना फालतू सांसारिक आपत्तींना तोंड देता-देता सिद्धिविनायकाला आणि शिर्डीला शरण जाताना मी पाहिले आहे. डॉ.लोहियांच्या मृत्यूनंतर अत्यंत साधेपणाने आणि कसलेही धार्मिक विधी न करता हमीदचे दहन झाले. हमीदच्या सर्व सत्यशोधक चळवळींपेक्षा त्याचे निर्वाणच मला स्पर्शून गेले.

  • भाऊ पाध्ये 

हा लेख भाऊ पाध्ये यांनी सोबत साप्ताहिकमध्ये दिनांक ७ जून १९७७ रोजी लिहला होता. 

Leave A Reply

Your email address will not be published.