स्वातंत्र्याच्या क्षणी नेहरुंच्या हाती राष्ट्रध्वज सोपवणारी महिला कोण होती ?

गांधीजींचे पर्सनल डॉक्टर जीवराज मेहता माहितीच आहेत. ज्यांच्या खात्यात बापूंच्या अ‍ॅपेंडिसाइटिसचे ऑपरेशनही त्यांच्याच खात्यात नोंदवले गेले आहे.

१९१५ मध्ये तेथून परत आले आणि त्यांनी मुंबई येथे डॉक्टर व्यवसाय सुरु केला. डॉक्टर असताना त्यांनी मुंबईत नानावटीसह अनेक रुग्णालये स्थापन केली. ते सलग तीन वेळा ‘ऑल इंडिया मेडिकल कांग्रेस’चे अध्यक्ष होते.

याशिवाय त्यांची ओळख वेगळ्या प्रकारे द्यायची झाली तर, ते हंसा मेहता यांचे पती होते. यापेक्षाही चांगली ओळख अजून काय असू शकते? आणि हंस मेहता यांची मुख्य ओळख म्हणजे संविधान समितीमधील समाविष्ट असलेल्या १५ महिलांपैकी त्या एक होत्या. त्यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यात मदत केली जी अजूनही सरकार व देश पाळत आहे. 

स्वातंत्र्यसेनानी आणि महिला हक्कांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हंसा मेहता बडोद्याचे दिवाण मनुभाई मेहता यांच्या कन्या होत्या. जीवराज मेहता यांचा बडोद्यात मुक्काम करताना दोघांचे प्रेम झाले. त्या काळात घरातील मंडळींच्या इच्छेविरूद्ध जाऊन त्यांनी आंतरजातीय लग्न केले. हंसा यांनी आपली ओळख यशस्वी पतीपासून वेगळी ठेवली होती. याव्यतिरिक्त, त्या १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जारी केलेल्या ‘युनिवर्सल ह्यूमन राईट चार्टर’ च्या मसुदा समितीच्या त्या सदस्य होत्या. महिलांच्या हक्कांसाठी लढणार्‍या लढाऊ नेत्या म्हणून त्यांची वेगळी ओळख होती.

त्यांची वैचारिक पातळी त्यांच्या एका कृतीवरून दिसून येते ते म्हणजे….. 

मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणा पत्राच्या सुरुवातीला हंसा मेहता यांनी पुरुष आणि स्त्रियांसाठी समान हक्क समाविष्ट करण्यास संयुक्त राष्ट्रांना भाग पाडले होते.  हा काळ तेंव्हाच होता जेंव्हा बहुतेक स्त्रिया त्यांच्या घराच्या चार भिंतीत बंदिस्त असायच्या. महिलांच्या समानतेच्या आणि संधीच्या हक्कांचा मुद्दा तर लांबच होता. तर १९४७-४८ च्या दरम्यान त्यांनी ”सर्व पुरुष स्वतंत्र आणि समान जन्मलेले असतात “हा अनुच्छेद बदलून, ‘सर्व मानव स्वतंत्र व समान जन्मले आहेत .. ‘असा केला होता. 

लहानपणापासूनच हंसा अभ्यासू होत्या.  महाविद्यालयानंतर त्या इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पत्रकारितेचा अभ्यास केला.  अशातच त्यांना एका कार्यक्रमासाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली.  त्यांना भारतीय महिलांना पूर्ण शिष्यवृत्ती देण्यास इच्छुक असलेल्या अमेरिकन महाविद्यालयांशी बोलायचं होतं. अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे महिला महाविद्यालये आहेत तशीच भारतात देखील महिला महाविद्यालयाच्या स्थापना करायची असेल तर त्यासाठी त्यांना तसं मार्गदर्शन हवे होते,  अमेरिकन शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आणि त्यांची प्रणाली समजून घ्यायची होती.

याचदरम्यान इंग्लंडमध्ये त्यांची भेट  सरोजिनी नायडू आणि राजकुमारी अमृत कौर यांची भेट झाली.  या दोन्ही महिला स्वातंत्र्यसैनिक महिलांशी त्यांचा संपर्क वाढू लागला, आणि त्यातच हंस यांच्यात राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. दरम्यान हंसा लंडनहून मुंबईत शिक्षण क्षेत्रात नोकरी करण्यासाठी परतल्या आणि त्या स्वातंत्र्य लढ्यात उतरल्या. सरोजिनी नायडू यांनी हंसा यांची ओळख महात्मा गांधींशी करून दिली. तोपर्यंत स्वातंत्र्यलढ्याला वेग आला होता. गांधीजींच्या सल्ल्यानुसार हंसांनी सत्याग्रह अभियानात ब्रिटिशांविरूद्ध लढा देण्यासाठी स्थापन केलेल्या महिला सेवेच्या संघटनेच्या पहिल्या तुकडीचे नेतृत्व केले होते. नंतर त्यांना अनेकदा अटकही झाली होती. 

भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. कित्येक वर्षाच्या संघर्षांनंतर हे स्वातंत्र मिळालं होत… 

१५ ऑगस्टच्या रात्री बारा वाजता भारत ब्रिटिशांपासून मुक्त झाला, तेंव्हा जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्याबरोबरच्या लोकांमध्ये त्याही उपस्थित होत्या. रात्री बारा वाजता राष्ट्रपतींनी स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले आणि भारतातील महिलांच्या वतीने त्यांनी राष्ट्रध्वज पंडित नेहरू यांना सोपवला आणि त्या म्हणाल्या की, “आम्ही भगवा रंग परिधान केला आहे, आपण संघर्ष केला आहे आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण लढा दिला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण बराच त्याग केला होता,अनेकांनी बलिदान केले आहे, त्याचेच फलित म्हणजे आज आपण आपले उद्दीष्ट साध्य केले आहे.  हा ध्वज फक्त हे चिन्ह नसून हा राष्ट्रीय ध्वज आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, ते तुमच्या हाती देऊन आम्ही पुन्हा एकदा देशसेवेसाठी सज्ज आहोत.” या क्षणाची इतिहासात सोनेरी अक्षरांनी नोंद झाली.

 

अशाप्रकारे स्वातंत्र्याच्या सुवर्णक्षणी नेहरुंच्या हाती राष्ट्रध्वज सोपवणारी व्यक्ती देशातील प्रथम महिला कुलगुरू होती हि कितीतरी मोठी गोष्ट होती..

भारतात परतल्या नंतर त्यांनी महिला शिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांची मुंबई पालिकेच्या शाळा समितीच्या मंडळावर नियुक्ती केली गेली. त्यांची नियुक्ती शिक्षण, आरोग्य विभाग, तांत्रिक विभागावर होत होती. १९३६ मध्ये ब्रिटिश शासित भारतात प्रादेशिक निवडणुका झाल्या. हंसाने मुंबई विधानपरिषदेसाठी निवडणूक लढविली आणि जिंकली सुद्धा. 

त्यांच्या प्रयत्नाने माध्यमिक शालेय शिक्षणावरील ताबा हा विद्यापीठाच्या ऐवजी राज्याच्या ताब्यात आला, आणि  माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा बोर्ड एसएससीईबी ची स्थापना केली गेली. आजही ही व्यवस्था अस्तित्वात आहे. 

त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावतच गेला. १९४६ मध्ये भारतीय महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान झाल्या. त्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या. त्यानंतर १९४९ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात उपकुलगुरू म्हणून रुजू झाल्या होत्या. १९५२ मध्ये त्या भारतीय माध्यमिक शिक्षण आयोगाच्या सदस्य झाल्या. १९४६ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या ‘स्टेट ऑफ विमेन’ च्या ‘सब कमिशन’ मध्ये त्यांनी भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व केले होते. १९५०-५२ मध्ये त्या या कमिशनच्या उपाध्यक्ष बनल्या. तसेच त्या १९५८ पॅरिस मध्ये आयोजित युनिस्को कॉन्फरन्समध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष होत्या. १९३० मध्ये मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष, नॅशनल कौन्सिल ऑफ विमेन्स च्या सचिव व अखिल भारतीय महिला संमेलनाच्या उपाध्यक्ष होत्या.

स्वातंत्र्य लढ्यात आणि शैक्षणिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या हंसा मेहता यांना १९५८ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.