मनगट तुटूनही एका हातानं बॅटिंग करत हनुमा विहारी टीमसाठी लढलाय…

सध्या जसं इंटरनॅशनल क्रिकेट सुरु आहे, अगदी तशीच रणजी ट्रॉफीही. त्यात रणजी ट्रॉफी पोहोचलीये, क्वार्टर फायनल्समध्ये. क्वार्टर फायनलची मॅच सुरु आहे आंध्र प्रदेश विरुद्ध मध्य प्रदेश. या मॅचमध्ये आंध्रचा कॅप्टन हनुमा विहारीचं मनगट फ्रॅक्चर झालं आणि  त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं.

पण आंध्रची अवस्था झाली, ९ आऊट ३५३. एक विकेट राहिली होती आणि हनुमा विहारी आपल्या टीमसाठी पुन्हा बॅटिंगला आला. उजव्या हातानं खेळता येईना, म्हणून त्यानं डाव्या हातानं बॅटिंग केली. फक्त एका हातानं तो खेळत राहिला आणि विशेष म्हणजे चांगले शॉट्सही खेळले.

पण त्यापेक्षा खतरनाक विषय झाला तो सेकंड इनिंग्समध्ये, आंध्रचा स्कोअर झाला ९ आऊट ७६. पुन्हा शेवटची विकेट राहिली आणि पुन्हा हनुमा विहारी बॅटिंगला उतरला. एका हातात बॅट घेऊन लेफ्टी बॅटिंग केली आणि ३ बाउंड्रीजही मारल्या. शेवटच्या विकेटसाठी त्यानं १७ रन्सची पार्टनरशिप केली, ज्यात त्याचा वाटा होता १५ रन्सचा.  तो भले आऊट झाला, मॅचचा रिजल्ट काय लागेल माहीत नाही, पण विहारी जीव लाऊन लढला.

पण विहारीनं टीमसाठी लढण्याची ही पहिलीच वेळ नाहीये….

आपण जाऊयात ११ जानेवारी २०२१ या दिवशीच्या सिडनी ग्राऊंडवर. त्या मालिकेत भारत पहिल्या कसोटीत लय घाण हरला आणि दुसरी कसोटी मारून सिडनीत आला.

आता आघाडी मिळवण्याची लढाई होती. चौथ्या इनिंगमध्ये भारताला ४०७ धावांचा डोंगर गाठायचा होता. रिषभ पंतनं धुव्वा करत ९७ धावा हाणल्या, प्रतिद्रविड पुजाराही ७७ करून आऊट झाला. हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीला आता मॅच जिंकून द्यायची होती.

रन पळताना विहारीची हॅमस्ट्रिंग ओढली गेली आणि मैदानावर फिजीओंनी धाव घेतली. ‘बाबा तू काय पळून रन काढू नकोस’ असं विहारीला सांगून फिजीओ मित्रमंडळ परतलं. अश्विनची पाठ जाम, याचा पाय थंड आणि जिंकायला १३५ धावा. या जोडीनं मैदान सोडायचं नाही हे नक्की केलं आणि मॅच ड्रॉ करण्याचा चंग बांधला.

आता ऑस्ट्रेलिया काय गल्लीतले बॉलर्स घेऊन खेळत नव्हती. पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड या तिघांचा हळू बॉल पण १३५ च्या पुढेच असतो. त्यात पाचव्या दिवशीच्या पिचवर नॅथन लायनचे बॉल हातभर वळायला लागले. विहारी आणि अश्विननं एक डील केलं. लायनचा स्पिन अश्विन खेळणार आणि फास्ट बॉलर्सला विहारी अंगावर घेणार.

भागामागुनी भाग संपले म्हणत ओव्हर्स संपत गेल्या, तरी हे दोघं टिकून राहिले. टी-टाईममध्ये विहारीनं इंजेक्शन घेतलं. त्याचा पाय दुखायचा थांबला आणि थेट बधीरच झाला. तरी दोघांनी किल्ला लढवला. तेही तब्बल २५९ बॉल्स म्हणजेच जवळपास ४३ ओव्हर्स. विहारी १६१ चेंडूत २३ धावा करून, तर अश्विन अण्णा १२८ चेंडूत ३९ धावा करून नाबाद राहिले. भारतानं सामना ड्रॉ केला, ही गोष्ट जिंकण्यापेक्षाही कमी नव्हती.

विहारी लंगडत लंगडत पॅव्हेलियनच्या पायऱ्या चढत होता आणि सगळं ग्राऊंड त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होतं.

आता थोडं विहारीबद्दल बोलू, या भिडूचा जन्म झाला आंध्र प्रदेशमध्ये. ज्युनिअर लेवलपासून दमदार बॅटिंग करत कार्यकर्त्यानं भारताच्या अंडर-१९ संघात स्थान मिळवलं. त्यांच्या टीमनं २०१२ मध्ये अंडर-१९ वर्ल्डकप खिशातही घातला. त्याच वर्षी त्याला आयपीएल कॉन्ट्रॅक्टही मिळालं. विहारी काय पंत, पोलार्ड, पंड्यासारखा हिटर नाही. तो पडला टिपिकल टेस्ट मॅच प्लेअर. साहजिकच त्याचा आयपीएलमध्ये फार मोठा करिष्मा दिसला नाही.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मात्र धावांची रास लावणं त्यानं सुरूच ठेवलं. जिथं ४०-४५ ची सरासरी असणं भारी मानलं जातं, तिथं विहारी ६० च्या सरासरीनं खेळत होता. आठ वर्षं डोमेस्टिक क्रिकेट गाजवल्यावर सप्टेंबर २०१८ मध्ये त्यानं भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं.

आतापर्यंत १६ कसोटी सामन्यांत त्यानं ८३९ धावा केल्यात. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

कधीकधी आकडेवारी मैदानावरची परिस्थिती सांगू शकत नाही. विहारीनं फक्त सिडनीवरच नाही, तर अनेक सामन्यांत भारतासाठी क्रीझवर नांगर टाकण्याचं काम केलंय.

भारताच्या मुख्य संघाकडून खेळण्यासोबतच त्यानं कौंटी क्रिकेटमध्येही छाप पाडलीये. बॅटिंग सोबतच पार्ट-टाईम स्पिन टाकणारा विहारी आगामी कसोटी मालिकांमध्ये भारतासाठी उपयुक्त ठरेल यात काही विषय नाही. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये मात्र विहारीला जागा तेवढी मिळालेली नाही.

हे हि वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.