कार्यकर्ते आग्रह करत राहिले अन ७५ वर्षांपूर्वी पुण्यात सर्वात भव्य गणेशमूर्ती साकारली गेली..

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पुणे शहराला एक वेगळं महत्त्व आहे. भारतात अशी फार थोडी शहर आहेत की जेथे सामाजिक,औद्योगिक,शैक्षणिक आणि राजकीय अशी ऐतिहासिक दृष्टीने उल्लेखनीय काम चालू आहेत आणि चालू राहतील. त्यात पुणे शहराचे नाव हे वरच्या यादीत घेतले जाते. त्यातल्या त्यात पुण्याने दिलेला सार्वजनिक गणेशोत्सव ही महाराष्ट्रासाठी देणगी आहे. याच गणेशोत्सवाने किती राजकीय-सामाजिक कार्यकर्ते जन्माला घातले.

गणपती बाप्पा आणि कार्यकर्ते हे समीकरण समजण्यापलीकडचे आहे. अश्याच हौशी कार्यकर्त्यांच्या एका मंडळाची कहाणी बघुया..

सर्व साधाणपणे पुर्वी पुण्याचे दोन भाग पाडले गेलेले होते. एक पुर्व भाग आणि दुसरा पश्चिम भाग. पूर्व भागात नाना,भवानी, घोरपेडे वैगरे पेठा तर पश्चिम भागात नारायण,सदाशिव वैगरे पेठा मोडत. पूर्व भागापेक्षा पश्चिम भागात विविध देवतांची मंदिरे मोठ्या प्रमाणात होती व आजही आहेत. पुर्व भागात बघायला गेले तर तशी मंदिर मोजकीच

ह्याच पुर्व भागात घोरपडे पेठेत एक हनुमानाचे मंदिर व व्यायामशाळा होती. याच व्यायामशाळेतल्या सभासदांनी पेठेतले सर्व नागरिक एकत्र यावे व सामाजिक बांधिलकी जपली जावी, यासाठी १९४५ साली गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. व्यायामशाळेमुळे गणपती मंडळाचे नाव ‘हनुमान व्यायाम मंडळ’ असे ठेवण्यात आले. मंडळाची गणपती बाप्पाची मूर्ती सुबक व सुंदर असावी यासाठी त्या काळचे प्रसिद्ध मूर्तिकार एन.एन.वाघ यांच्याकडे ही मुर्ती बनविण्याचे काम सोपविण्यात आले.

एन.एन.वाघ यांनीसुद्धा ही जबाबदारी विनामूल्य स्वीकारत मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले. शाडुमाती, कागदाचा लगदा आणि दुर्वा या मिश्रणापासून मुर्ती आकारास येण्यास सुरुवात झाली. 

प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला बाप्पा हा भव्यदिव्य असावा. तसच ह्या मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा झाले. जेव्हा एन.एन.वाघ यांनी ही मुर्ती बनवायला घेतली तेव्हा मंडळाचा एक-एक कार्यकर्ता यायचा आणि एन.एन.वाघ यांना म्हणायचा की,

“वाघ साहेब अजुन थोडी मोठी,अजुन थोडी मोठी” 

अश्याने असं व्हायचं की, कधी बाप्पाचे हात मोठे व्हायचे तर कधी बाप्पाचे पाय मोठे व्हायचे. अजुन थोडी मोठी करत करत फायनली साडे दहा फूट रुंद व साडे नऊ फूट उंच अशी बाप्पाची पुण्यातील पहिली सर्वात मोठी शाडू मातीची मुर्ती तयार झाली. ही मुर्ती तयार होण्यात जेवढा मूर्तिकार एन.एन.वाघ यांचा हात होता तेवढाच हात कार्यकर्त्यांचा सुद्धा होता. त्याकाळी पुण्यात एवढी भव्यदिव्य मुर्ती कुठेही न्हवती. पण पुर्व भागात असल्यामुळे हे मंडळ त्याकाळी दुर्लक्षित राहिले व आजही कित्येक पुणेकरांना आपल्या पुर्व भागात एवढी भव्यदिव्य मुर्ती आहे हे माहीत नाही.

ह्या मूर्तीचे डोळे इतके रेखीव आहेत की बघणारा त्यामध्ये पूर्णतः हरवुन जातो. मुर्तीची बैठक ही पूर्णपणे वेगळी आहे. मुर्तीच्या मुकुटावर असणारे मोर तसेच काळेभोर कुरळे केस विशिष्ठ पद्घतीने तयार केलेले आहेत. एन.एन. वाघ यांच्यानंतर अनेक मुर्तीकारांने अशी मुर्ती बनवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हि मुर्ती बनवता आली नाही.

 “ह्या मूर्तीची भव्यता इतकी आहे की सव्वा महिन्याचे बाळ गणपतीच्या हातावर मावते.”

तसेच ह्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंडळाचे स्वतःचे कबडी, क्रिकेट व फुटबॉल चे संघ होते. 

अजुन एक सांगण्यासारखे ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हां ह्या मंडळाची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोड मार्गे निघायची तेव्हा तिथला संपुर्ण व्यापारी वर्ग ह्या मंडळाच्या गणपती बाप्पाला हार घालण्यास रस्त्यावर थांबायचा. शेवटच्या दिवशी संपुर्ण गणेश मुर्ती फुलांच्या हारांमध्ये हरवुन जायची. त्यामुळे या गणपतीला हारांचा राजा असे सुद्धा संबोधले जाते.

२००८ साली गणपती मंडळाचा लक्ष्मी रोडचा मार्ग बदलुन टिळक रोड झाला पण आजही शेवटच्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मुर्ती पुर्णपणे फुलांच्या हारांमध्ये हरवुन जाते.

  • कपिल जाधव

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.