आल्या आल्या सलग तीन सिनेमे सुपरहिट होवूनही अमिषाची पाटी कोरीच राहिली.

मुंबई मध्ये एका उद्योगपतीच्या मुलाचं लग्न सुरू होतं. मोठमोठ्या सेलीब्रेटीनां निमंत्रण होतं. नवऱ्या मुलाचं घोड्यावरून आगमन झालं. जोरात आतिषबाजी सुरू झाली. जेष्ठ अभिनेता दिग्दर्शक राकेश रोशन ती बारात बघत उभे होते. तिथे नाचणारी एक मुलगी सगळ्यांच लक्ष वेधून घेत होती. राकेश रोशननी शेजारी उभ्या असलेल्या दोस्ताला विचारलं,

” अमित ये तेरी ही लडकी है ना?”

हा अमित पटेल म्हणजे राकेश रोशन चा शाळे पासूनचा जिगरी दोस्त. गुजरात मधले काँग्रेसचे मोठे नेता रजनी पटेल यांचा मुलगा आणि स्वतः यशस्वी उद्योगपती. अमित पटेल म्हणाला,

” हो ही माझीच मुलगी अमिषा.”

राकेश रोशनला तिचा कॉन्फिडन्स खूप आवडला होता. तिचा तो ग्रेस, तिची स्माईल बघून त्यांनी अमित ला सांगितले,

“मै इसे मेरे अगली फिल्म मैं लॉन्च करुंगा. मेरे बेटे रितिक के साथ!!”

अमित पटेल एकदम उखडलाच. त्याला आपल्या पोरीने सिनेमात काम करणे पसंत नव्हते. अमिषा नुकतीच बारावी पास झाली होती, कॉलेज मध्ये खूप हुशार होती. तिला फॉरेन मधल्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला पाठवायची स्वप्नं तो बघत होता आणि शिवाय त्याने ह्रिथिक ला पाहिलं होतं. हे हडकुळ लाजर बुजर तोतर बोलणार पोरगं हिरो म्हणून शोभेल अस जराही वाटत नव्हतं. अमित पटेलने राकेश रोशनला तोंडावर नकार दिला.

पाच वर्षानंतर…..

अमेरिकेच्या टफ युनिव्हर्सिटीमधून इकॉनॉमिक्सची डिग्री चांगल्या मार्काने पास झालेली अमिषा पटेल मॉर्गन स्टॅनली सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या नोकरीला लाथ मारून भारतात परत आली होती. वडिलांना त्यांच्या इच्छेनुसार बिझनेस मध्ये मदत करत होती. त्याच्या बदल्यात कधी कधी नाटकात काम करणे, छोट्या मोठ्या जाहिरातीत काम करणे याची परवानगी तिने बाबा कडून मिळवली होती.

एकदा डायरेक्ट तिला राकेश रोशनचा फोन आला. त्यांच्या ऑफिसवर लंच साठी भेट म्हणून निमंत्रण होतं. ती दुसऱ्या दिवशी तिथे गेली. राकेश रोशननी तिला परत पाच वर्षापूर्वीची ऑफर दिली.अमिषाला आश्चर्य वाटलं. ह्रतिकच्या फिल्मचं शूटिंग तर सुरू झालंय अस तिने ऐकलं होतं मग अचानक काय झालं?

या पाच वर्षात पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं होतं. खुद्द सलमान खानच्या जिम ट्रेनिंग खाली बॉडी बिल्डिंग केलेला ह्रतिक आता खरोखर हिरो वाटत होता. त्याच्या सोबत राज कपूरची नात आणि करिश्मा कपूरची छोटी बहीण करीना कपूर ला साइन केलं होतं. काही दिवस शुटिंगही झालं पण अचानक कळालं की करीना या सिनेमामध्ये काम करणार नाही. अजून पहिला सिनेमा रिलीज देखील झाला नाही आणि तिने सेटवर हिरोईन गिरी सुरू केली म्हणून राकेश रोशननी तिला बाहेर काढल्याच्या चर्चा गॉसिप कॉर्नर वर सुरू होत्या. तर काहीजण म्हणत होते करिनाच सिनेमातून बाहेर झाली. काही दिवसातच बातमी आली, करिना अमिताभ बच्चन यांच्या मुलासोबत जेपी दत्ता यांच्या सिनेमात काम करत आहे.

कारण काहीही असो आमिषाला तो सिनेमा मिळाला.

तिने राकेश रोशनला होकार कळवला. पण न विचारता सिनेमा साइन केला म्हणून घरी वडिलांशी तीच मोठं भांडण झालं. एवढंच काय तिचा अमेरिकेतल्या कॉलेजमध्ये असल्या पासूनचा तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून गेला. मानसिक दृष्ट्या अतिशय खडतर काळात ही खंबीरपणे ती कहो ना प्यार है च्या सेटवर आली.

अमिषा आणि ह्रतिक लहानपणापासून एकमेकाला ओळखत होते. सेटवर एकदम घरगुती वातावरण होतं. हसतखेळत शूटिंग पूर्ण झालं. अमिषाची आईने देखील ह्रतिकच्या आईचा छोटासा रोल केला.

14 जानेवारी 2000 रोजी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर कहो ना प्यार है रिलीज झाला.

पहिल्या सिनपासून ह्रतिकची जादू पडद्यावर दिसत होती. पब्लिक त्याचा एक पल का जीना वाला डान्स, त्याची ऍक्शन बघून खुळी झाली होती. सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमाच्या वादळात आमिर खानचा मेला आणि शाहरुख खानचा फिर भी दिल है हिंदुस्तानी हे सिनेमे वाहून गेले.

मिडीयाने डिक्लेर केलं,

“ह्रतिकच्या रुपात भारताला नवीन मिलेनियमचा नवीन सुपरस्टार मिळाला.”

चवताळलेल्या शाहरुख खानची आणि ह्रतिकची भांडणे टीव्ही अडवर्टाइजमेंट पर्यंत पोहचली आणि यात ह्रतिकने शाहरुखला मात दिली असंच जाहीर करण्यात आलं. इकडे करीना अभिषेक बच्चनचा रिफ्युजी सुपरफ्लॉप झाला. लोकं म्हणत होती बर झालं, आता तरी करीना कपूर शहाणी होईल.

 पण तिने जाहीर मुलाखती मध्ये म्हटलं,

“तो सिनेमा सोडल्याच मला जराही दुःख नाही. राकेश रोशन फक्त ह्रतिककडे लक्ष देत होते. आजही सिनेमा बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल अमिषाच्या काही सिन मध्ये डोळ्याखाली वर्तुळे, पिंपल्स साफ दिसतात पण राकेशजीनि तिच्याकडे पाहिलही नाही. मी इथे हिरोईन बनण्यासाठी आली आहे साईड ऐक्ट्रेस नाही.”

,

हे सगळं घडत होतं तो पर्यंत अमिषा कुठे होती?

करीना म्हणत होती त्याप्रमाणे कहो ना प्यार है चं थोडंसही क्रेडिट तिच्या वाटेला आलं नाही. ह्रतिक बरोबर त्याचे पपा राकेश रोशन,काका संगीतकार राजेश रोशन ,गायक लकी अली यांचं देखील कौतुक झालं पण अमिषा कडे सगळ्यांच दुर्लक्ष झालं. विशेष म्हणजे याचं तिला वाईटही वाटलं नाही. तो पूर्ण पिक्चर ह्रतिकचा होता हे तिलाही मान्य होत. पण या सिनेमाच्या यशामुळे तिला बरेच फिल्म्स ची ऑफर मिळाली होती. तीचा पुढचा रिलीज होता तेलगू मधला बद्री, या सिनेमाने तिकडे ब्लॉकबस्टर कामगिरी केली.

यानंतर आला सन्नी पाजी बरोबरचा गदर !

“मैं निकला गड्डी लेके” गानारा सनी देओल पाकिस्तानला जाऊन हँडपम्प उखडतो तेव्हा थिएटर शिट्ट्यानी भरजन गेलं. देशाच्या कानाकोपरयात हा सिनेमा सुपरहिट झाला. आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडूनफोडून टाकले. अमिषाच्या निरागस अभिनयाचं कौतुक झालं, तिला फिल्मफेअर सुद्धा मिळालं. पण हा सिनेमासुद्धा सनी देओलचा सिनेमा म्हणून ओळखला गेला.

Screenshot 2019 06 09 at 7.40.49 PM

सलग तीन सुपरहिट सिनेमे देणाऱ्या अमिषाची पाटी परत कोरडीच राहिली.

तिथून पुढे मात्र तिचा पडता काळ सुरू झाला, नवख्या जिमी शेरगिल सोबतचा ये जिंदगी का सफर फ्लॉप झाला, ह्रतिकसोबतचा आप मुझे अच्छे लगणे लगे मध्ये त्या दोघांची जादू दिसली नाही, या फ्लॉपच क्रेडिट मात्र तिला मिळालं. सलमान बरोबरचा ये है जलवा सुद्धा पडला.

अमिषा पटेलच्या वैयक्तिक आयुष्यात देखील खूप खळबळ सुरू होती. एकेकाळी मुलाखती मध्ये “मी अजूनही वडिलांकडून खर्चाला 500 रुपये देखील मागून घेते” अस अभिमानाने सांगणाऱ्या इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट अमिषा पटेलचा  हळूहळू आईवडीलांसोबतचा पैश्यावरूनचा वाद चव्हाट्यावर आला. तिच्या कमाईचा सगळा पैसा अमित पटेल यांनी आपल्या धंद्यासाठी वापरून खर्च करून टाकला होता. हा वाद कोर्टात गेला, आमिषाचा नवा बॉयफ्रेंड विक्रम भट्ट याच सुद्धा नाव आलं. सिनेमात येणार म्हणून तयारी करत असलेल्या तिच्या भावाची अष्मीत पटेलची रिया सेन सोबतची सेक्स क्लिप देशभर व्हायरल झाली.

मोठ्या बॅनर नी अमिषा पटेलच्या नावावर फ्लॉप म्हणून फुली मारली. क्या यही प्यार है, हमराज असे तुरळक हिट मिळाले पण खूप फायदा झाला नाही. आमिर खानचा महत्वाकांक्षी मंगल पांडे मध्ये ती दिसली पण पण तोही सिनेमा फ्लॉप झाला. अमिषाच करियरची नौका पार तळाला पोहचली.

पण कहो ना प्यार है सोडण्याची चूक करणारी स्टारकीड करीना मात्र बरीच पुढे गेली होती. ह्रितिक बरोबरची भांडणं मिटवून कभी खुशी कभी गम सारखा सुपरहिट सिनेमा तिने पटकवला. हिंदी सिनेमाच्या आघाडीच्या अभिनेत्री मध्ये ती ओळखली गेली, सैफ बरोबर लग्न करून सेटल देखील झाली. तिचा मुलगा तैमुर जन्मल्यापासून स्टार आहे.

पण अमिषाचा स्ट्रगल अजूनही संपला नाही. भुलभुलैया, रेस 2 या सेकंड इनिंगमधल्या हिट सिनेमाचा देखील तिला फायदा झाला नाही.

कधी इन्स्टाग्रामवरच्या फोटो तर कधी पत्रकारांसोबत भांडण तर कधी राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी काळा पैसा घेण्याच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये सापडणे अशा चुकीच्या कारणांनी ती चर्चेत आहे.

आज ती 42 वर्षांची झाली. तिला आज कोणीही विचारत नाही अशी स्थिती आहे. पण तेव्हा कहो ना प्यार है च्या प्रेमात पडलेली आणि गदरच्या डायलॉग ला शिट्ट्या मारणाऱ्या पिढीच्या गोड आठवणीत तिचंही नाव असेल हे नक्की.

  • भूषण टारे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.