आज जगातील पहिल्या “भिडू” चा बड्डे : हॅप्पी बर्थडे जग्गू दादा

जग्गू ए जग्गू.. 

आपल्या अच्युत पोद्दार काकांनी मस्त केला होता हा रोल. अगदी आपलेच बाबा कुठूनही हाक मारत येतायत असे. आणि पडद्यावर सुद्धा अपूनच. आपला रोल करत होता आपला भिडू.

आपला वाळकेश्र्वरचा तीन बत्तीवाला भिडू जग्गू उर्फ जॅकी उर्फ जयकिशन श्रॉफ.

पक्का मुंबईकर. सकाळी उठून टमरेल घेऊन लायनीत उभं रहायचं. पाणी भरायला लायनीत उभं रहायचं. बस साठी लायनीत. रेशन च्या लायनीत.

अख्खा जन्म लायनीत गेला असता भिडूचा. पण बाबा हात बघायचे. त्यांनी पोराचं भविष्य वर्तवल होतं. पोरगा मोठं कायतरी करणार. बाबा काकुभाई काही साधेसुधे कुडमुडे ज्योतिषी नव्हते. धीरूभाई यांना ही सल्ला द्यायचे. त्यांचं भविष्य खरं ठरलं पण त्या आधी जग्गुला मॉम मुंबईने खूप काही शिकवलं.

काकुभाई आणि रिताबेन (ही चिनी वंशाची आश्रित मुलगी आणि काकुभाई कोवळ्या वयात भेटले आणि त्यांनी तीन बत्तीच्या चाळीत संसार थाटला.) यांना दोन मुलं. मोठा हेमंत, धाकटा जयकिशन.

हेमंत जात्याच धाडसी. मोठं होता होता त्याकाळच्या मुंबईच्या शिरस्त्याप्रमाणे तो तीन बत्तीचा दादा झाला. इथे दादा आणि भाई मधला फरक समजून घ्या, सत्तरीच्या दशकात मुंबईत दादालोक होते. ते सगळेच वाम मार्गाचे नव्हते. बरेचसे चांगले आणि सशक्त तरुण आपोआप बस्ती का मसीहा बनायचे. तसा हेमंत श्रॉफ ही बनला.

मात्र धाकटा जग्गू भित्रा. सर्वत्र आईच्या पदराला धरून फिरायचा. अगदी स्वयंपाक घरातही. (दादा एक उत्तम स्वयंपाकी आहे याचं श्रेय तो लहानपणी आईच्या हाताखाली केलेल्या इंटर्नशिपला देतो.) मात्र एका दुर्दैवी घटनेत हेमंत एका मित्राला समुद्रात बुडत असता, वाचवायला गेला आणि स्वतः पाण्यात नाहीसा झाला. छोट्या जग्गुच्या डोळ्यांनी पाहिलेला हा प्रकार तो कधीही विसरला नाही.

भावाचा मृत्यू त्याला मुळापासून हलवून गेला. आणि वाळकेश्र्वर ने एक नवा जग्गू पाहीला. हेमंतची जागा घेणारा. मित्रांसाठी, चाळीसाठी, एरियातल्या गुंडांना नडणारा, फोडणारा, फुटणारा. पण भाई नाही, दादाच. जग्गू दादा!!

शिक्षणात काही खास रस नव्हता पण जग्गू दिसायला होता अफाट देखणा, उंच, रुबाबदार. शाळे मूळं त्याला एकच गोष्ट मिळाली ती म्हणजे त्याच नावं, जॅकी. अकरावी मध्येच शिक्षण सोडून दिल. जग्गू रस्त्यावर टपोरीगिरी करण्यात दिवस घालवू लागला. तेव्हा त्याला नोकरी पैसा महत्वाचा वाटायचा नाही. तो नेहमी म्हणायचा,

“आपुन की मां ने आपुनको किसीके हात के नीचे काम करने के लिये नही पैदा किया.”

बाबा काकुभाई सारखं जग्गूलाही कोवळ्या वयात त्याची प्रेमिका भेटली होती. आयेशा दत्त. मलबार हिलची श्रीमंत पोरगी. ती आयुष्यात आल्यावर त्याच्या लक्षात आलं भिडू पैसा कमाना भी इंपोर्टंट है.

पण जग्गुच्या करीयरचं काही सुरळीत होत नव्हतं. कधी शेफ कधी फ्लाईट पर्सर. त्या काळात शिक्षणाशिवाय चांगला जॉब मिळत नसे. आणि जॉब्स म्हणजे बँक किंवा सरकारी नोकरी. जग्गू दादागिरी कडे वळला नाही. बाबांच्या भाकितावर विश्वास होता. आणि एक दिवस बसस्टोप वर बसची वाट बघत असताना त्याला अचानक मॉडेलिंग करायची संधी मिळाली. मुंबईमध्ये सूट घातलेल्या जग्गुचे होर्डिंग उभे राहिले. त्याच्याच जिवावर देव सहाबच्या स्वामी दादा मध्ये फुटकळ रोल.

तिथेही देव सारख्या धुरंधर माणसाच्या नजरेत हा देखणा तरुण आलाच. आणि मग जग्गुला मिळाला सुभाष घईचा “हिरो”. जग्गुच नामकरण झालं. ज्या नावाने त्याला शाळेचे मित्र हाक मारायचे, जॅकी. जॅकी श्रॉफ.

त्यावेळी गरम धरम चा गोरा गोमटा पोरगा सनी, धडपड्या गुणी अनिल यांच्याकडे इंडस्ट्री खूप आशेनं बघत होती. त्यांना हा नवा हिरो चटकन आवडला. त्याच्या तोकड्या अभिनयाकडे, देव साहेबांची नक्कल मारण्याकडे त्यांनीही दुर्लक्ष केलं आणि प्रेक्षकांनीही. हिरो नंतर शिवा का इंसाफ, तेरी मेहेरबानीया असे हिट्स त्याला मिळाले पण तेरी मेहेरबानीयाचं यश त्यातल्या कुत्र्याला ब्राऊनी ला गेलं. स्वतः जॅकी सुद्धा कबुल करतो तो हिट ब्राऊनी की मेहेरबानीया होता.

त्याच्या स्वभावामुळे त्याला चित्रपट मिळत राहिले. काही चालले. काही आपटले. पण जग्गू आता तीन बत्तीच्या चाळीतून निघाला होता. घरची अमीर पोरगी आयेशा आपल्या बरोबर लग्न करून चाळीत आली. ते खूप लागत होत त्याला. म्हणून चित्रपट स्वीकारताना फारसा विचार त्याने कधीच केला नाही. कधीच.

महेश भट्ट यांनी त्याला काश मध्ये साईन केलं. जग्गुच्या भाषेत मावशीची गां*. कारण इथे अभिनय करायचा होता. सेट वर अनेकदा निराश होऊन जग्गू किंचाळला आहे. “भट्ट साब नही होता बस.” पण तो महेश भट्ट. त्याने जग्गू कडून बऱ्यापैकी अभिनय करवून घेतला. काश फार चालला नाही कारण फारच melancholic होता.

पण लोकांना एक कळलं. Jackie is here to stay.

जॅकीने बरेचसे मल्टीस्टारर केले. त्यात तो शोभायचाही. त्रिदेव, वर्दी, कर्मा, उत्तर दक्षिण खूप अनेक. त्याची आणि अनिल कपूरची जोडी ही बच्चन शशी कपूर सारखी गाजली. ‘परिंदा’ चा किस्सा सर्वश्रुत आहे. अनिलने सांगितलं म्हणून जॅकी स्क्रिप्ट न ऐकताच तयार झाला.

अनिल हळूच म्हणाला. “जग्गू, रोल मेरे बडे भाई का है.” जॅकी शिवी हासडत म्हणाला, “करीयर खत्म कर देगा तू मेरी.”

विनोद चोप्रा स्क्रिप्ट ऐकवताना हा माणूस झोपला होता. अगदी तसाच जेव्हा हिरो च्या प्रिमियरला त्याच्या चाळीत वितरक मंडळी आली होती. परिंदा साठी त्याला १९९० चं सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं.

अभिनेता म्हणून जॅकी हळूहळू खुलत गेला. ठेचकाळत शिकत गेला. स्वतः ला शोधत गेला. स्टाईल आयकॉन तर होताच पण हृदयस्पर्शी भाव व्यक्त करू लागला होता. राम लखन, परिंदा मधला त्याचा मोठा भाऊ नेहमी आदर्श वाटावा असा राहिला आहे. अर्थात लेखक दिग्दर्शक यांचं क्रेडिट आहेच पण वाळकेश्र्वर च्या जग्गू दादाच्या व्यक्तिमत्त्वातच तो उबदारपणा आहे.

जॅकीचे हिट सिनेमे भरपूर आहेत. कारण चवीपुरतं का होईना हा सगळीकडे आहेच. पण सोलो हिट्स म्हणून त्याचा १९९२ चा ‘अंगार’ आणि १९९३ चा ‘गर्दिश’ नेहमीच खास राहतील.

यातला गर्दिश हा १९८९ च्या किरिडम या मोहनलाल च्या मलयाळम सिनेमाचा रिमेक होता. किरिडम चा दिग्दर्शक सिबी मलायील होता आणि गर्दिश चा प्रियदर्शन. प्रियन त्याच्या चित्रातली प्रत्येक फ्रेम देखणी व्हावी याबद्दल आग्रही. त्यामुळे अंगावर येणाऱ्या किरिडम पेक्षा जग्गूचा गर्दिश मधला शिवा तितकाच दुर्दैवी असून सुसह्य होतो. अशा रोल्स साठी जग्गू ने एक वेगळाच टोन वापरला आहे, दाबल्यासरखा. तो किंचित विनोदी वाटतो पण त्यामागे नक्कीच एक विचार आहे.

गर्दिश हा नव्वदीमधला ‘अर्जुन’ होता. तसाच ‘अंगार’ इथे मात्र जग्गू उर्फ जयकिशन हा रोल अक्षरशः जगलाय. यात नाना, कादर असे उच्चे उच्चे अदाकार होते.

पण जग्गू खडा रहा. हटा नय अपना भिडू.

आधीचा चाळीतला जबाबदार पण निर्भिड तरुण, बादशाह खान ला नडणारा, मग विद्युत वाहिनीचे धक्के घेऊन चिपाड झालेला. अंगार हा नव्वदीच्या मुंबईचं एक अप्रतिम ऐवजिकरण आहे. अगदी शाहरुखच्या मन्नत पासून. मात्र जॅकीला या साठी काही अवॉर्ड मिळालं नाही. गर्दिश साठी तो नोमिनेट झाला इतकंच. त्याचा ‘ग्रहण’ यूट्यूब वर पहा कधी. शशीलाल नायरचाच.

वैयक्तिक पातळीवर आयुष्यात चढ उतार आले त्याच्या. पण आज त्याचा पोरगा सुपरस्टार आहे. तो ही बापासारखाच साधा किंवा बापापेक्षा अधिक. मीडिया शाय.

जग्गू दादाशी बोलणं म्हणजे धमाल बाईट मिळणार हे मिडीयाला डोळे झाकून ठाऊक असतं. अगदी चिडला तरी त्याच्या टिपिकल मुंबईकर शिव्या “एम सी बी सी आंग पे अा रेला क्या बेटा?” वगैरे मीडिया चुंबन देत स्वीकारते. कारण त्यांना या माणसाचं साधं तत्व माहीत आहे. “छोटोंको आशीर्वाद. बराबर वालोंको प्यार. बडोंको नमश्कार” दिलखुलास आणि swag से भरा.

गौतम राजाध्यक्ष म्हणायचे,

“जग्गू इज बॉर्न टू बी अ मॉडेल. त्याला कपड्याचा फॉल ही कसा कुठे पडेल याचा अचूक अंदाज असतो.”

जॅकीची मोठी ताकद आहे ती त्याची जमिनीशी असलेली नाळ. आपली सुरुवात तो कधीही विसरला नाही. त्याच्या वाईट दिवसात, त्याला हात दिलेल्यांना तो विसरला नाही.

“जॅकी हा एक कॉम्प्लिकॅटेड माणूस आहे. तो कधीच सुपरस्टार बनू शकत नाही.”

असं त्याच्या गॉडफादर सुभाष घईने एकदा म्हटलं. तरी घईच्या पडत्या काळातही नाममात्र पैसे घेऊन काम करताना जॅकी कृतज्ञच राहिला. आपला भूतकाळ लक्षात ठेवून. त्या भूतकाळात त्याचे आई बाबा आहेत, तीनबत्तीची चाळ आहे. मित्र आहेत. मुंबईचा वाळकेश्र्वर एरिया आहे, मुंबईचा समुद्रही आहे, आणि हो मोठा भाऊ हेमंत ही.

जॅकीच्या सुपरस्टार मुलाचं टायगर श्रॉफ चं पाळण्यातलं नाव आहे जय “हेमंत” श्रॉफ…

 

  • हे ही वाचा. 
3 Comments
  1. Vrushali Ambardekar says

    Superb article by Gurudutta ji

Leave A Reply

Your email address will not be published.