कोहलीला एकमेव आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा भिडू, टीम इंडियामध्ये पक्कं स्थान मिळवू शकला नाही

विराट कोहली. भारताच्या सर्वात यशस्वी कॅप्टन्सपैकी एक. त्याच्या नेतृत्वात भारतानं अनेक विक्रम रचले, अशक्य वाटणारे विजय मिळवले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये जाऊन भारत जिंकून आला. मात्र विराटच्या मुकुटात एक हिरा अजूनही बसला नाही, तो म्हणजे विजेतेपदाचा. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत सातत्यानं सेमीफायनल, फायनलला हरत राहिला आणि विजेतेपदाचं स्वप्न भारतापासून दूरच राहिलं.

 पण कुठल्याही कोहली फॅनला याबद्दल टोकलं, तर त्याचं उत्तर असतं कोहलीच्या नेतृत्वात भारतानं अंडर-१९ चा वर्ल्डकप जिंकलाय की. २००८ मध्ये मलेशियामध्ये झालेला वर्ल्डकप भारतानं मारला होता. या विजयात मोलाचा वाटा होता, तो झारखंडच्या एका पोराचा, तो म्हणजे सौरभ तिवारी.

खांद्यापर्यंत येणारे सोनेरी केस, थोडीशी हाडकुळी तब्येत आणि बॅटिंगला आल्यावर हाणामारी करायची सवय. त्यात पोरगं झारखंडचं, त्यामुळे सगळ्यात आधी आठवण यायची ती महेंद्रसिंह धोनीची. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये त्यानं मिडल ऑर्डरला येऊन चांगली बॅटिंग केली. पुढं तो भारताकडूनही खेळला आणि आयपीएलमध्येही त्याचा डंका सातत्यानं वाजतोय.

डावखुऱ्या तिवारीनं वयाच्या अकराव्या वर्षीच स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २००६-०७ मध्ये त्यानं झारखंडच्या रणजी टीममध्ये स्थान मिळवलं. त्याची कामगिरी पाहून त्याला मलेशियामध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवलं. तिथं मिडल ऑर्डरमध्ये खेळताना त्यानं लय भारी बॅटिंग केली.

आता त्या वर्ल्डकपकडे आयपीएलची मालक लोकं दुर्बीण लावून बघत होतीच. सौरभला मुंबई इंडियन्सनं आपल्या ताफ्यात घेतलं. पहिल्या सिझनमध्ये त्याला फार चमकदार कामगिरी करता आली नाही, त्याची हवा झाली ती २०१० च्या सिझनमध्ये. प्रत्येक खेळाडूच्या काळात एखादं भारी वर्ष असतंच.

सौरभच्या आयुष्यात ते वर्ष होतं २०१०

मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्यानं आयपीएलमध्ये ४०० पेक्षा जास्त रन्स केले आणि विशेष म्हणजे १८ सिक्स हाणले. फक्त आयपीएलच नाही, तर रणजी स्पर्धेतही भावानं राडा घातला. झारखंडकडून खेळताना त्यानं तीन शतकं मारली आणि नॅशनल सिलेक्टर्सचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आशिया कपसाठी त्याला टीम इंडियात संधी मिळाली, मात्र त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ते ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात.

पहिल्याच मॅचमध्ये लोअर ऑर्डरमध्ये येऊन त्यानं नॉटआऊट १२ रन्स केले. त्यानंतर, न्यूझीलंड दौऱ्यामध्ये त्याला पुन्हा संधी मिळाली आणि त्यानं नॉटआऊट ३७ रन्स करत संघाला विजय मिळवून दिला. पुढच्या मॅचमध्ये सौरभ संघात होता, मात्र त्याला बॅटिंग मिळाली नाही.

एक मात्र झालं, दोन्ही मॅचेसमध्ये सौरभला कुणी आऊट करु शकलं नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गडी नॉटआऊटच राहिला.

आयपीएलमध्ये सौरभ मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मात्र त्याचं वाढलेलं वजन, सुटलेलं पोट यामुळं त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. त्याला संघात घेतलं की सोशल मीडियावर कार्यकर्ते हसतात खरे, पण जेव्हा जेव्हा टीम संकटात सापडते तेव्हा तेव्हा सौरभच संघाला वाचवतो आणि टीममधलं स्थान कायम ठेवतो. आयपीएलमध्ये जमलं पण भारतीय संघातली स्पर्धा आणि काहीसं राजकारण बघता, सिनिअर टीममधलं स्थान काही तो टिकवू शकला नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.