तब्बू आज ५२ वर्षांची झालीये, अन ह्या वयात सुद्धा तिचं लग्न न करता राहणं मला चोरटं सुख देतं.

नागराज मंजुळे चं एक वाक्य वाचनात आलं होतं. ‘भारतीय प्रेक्षक प्रत्यक्ष आयुष्याला जेवढा सिरियसली घेत नाही तेवढं सिनेमाला घेतो.’

वरवर पाहता अतिशयोक्ती वाटणारं हे विधान आपल्याकडच्या फिल्म चाहत्यांची कैफियत फार मार्मिकपणे मांडतं. ‘साला हिंदुस्तानमें जब तक सनीमा है तब तक लोग चूतिया बनते रहेंगे’ ह्या रामधीर सिंग च्या अजरामर डायलॉग पेक्षा खूप गहिरे. कारण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात प्रत्येक सामान्य माणसाचं आयुष्य एखाद्या सिनेमाने, एखाद्या व्यक्तिरेखेने, आवडत्या हिरो हिरोईन च्या प्रभावाने व्यापून टाकलेलं असतं.

पण काही लोकांसाठी सिनेमा हा निव्वळ टाइमपास किंवा मनोरंजनाचं साधन नसतं. स्वतःच्या आयुष्यात कधीही पूर्ण न होऊ शकणाऱ्या स्वप्नांना तात्पुरती वाट द्यायचं आऊटलेट असतं. आयुष्य जेवढंच खरं तितकाच सिनेमा सुद्धा हे त्यांना पक्के माहीत असतं. ऐकताना विचित्र वाटत असलं तरी, ‘होय. मी आहे त्या प्रकारातला!’ आणि मला याबाबत कुठलाही गंड नाही की संकोच नाही.

तब्बू बद्दल मला पजेसिव्ह व्हायला आवडतं. तब्बू आज 52 वर्षांची झालीये, अन ह्या वयात सुद्धा तिचं लग्न न करता राहणं मला चोरटं सुख देतं. ती जोवर सिंगल राहणार तोवर ही ‘सेन्स ऑफ पजेशन’ ची भावना मी स्वतःपुरती कायम कुरवाळत राहणार. आणि म सिनेमात सुद्धा तिच्या वाटेला आलेल्या दुःखाची नैतिक जबाबदारी मला घ्यायला आवडतं. ‘जीत’ मध्ये सनी देओल ने झिरकाडून सुद्धा एकतर्फी मनात घुटमळत राहणारी तब्बू बघितली की वाटतं  त्या क्षणी पडद्यात घुसून शेकडो करिष्मा कपूर तिच्यावरून ओवाळून टाकाव्यात.

‘चांदणी बार’ मध्ये तिला कामाला लावणाऱ्या मामाच्या टपल्या झोडाव्या वाटतात. अगदी खरं सांगायचं तर ‘साथिया’ मध्ये तिच्या चुकीमुळे कार चा एक्सीडेंट होऊन राणी मुखर्जी गंभीर जखमी होते. तब्बू एका सिन मध्ये शाहरुख कडे झालेल्या चुकीची माफी मागून रडायला लागते. तिचं रडणं ओरडून सांगावं वाटतं की ‘जाऊ दे ना राणी, तिचा जीव तुझ्या अश्रूंपेक्षा जास्त मोलाचा आहे का!’

माझ्या परफेक्ट बायको असणाऱ्या डेफिनेशन मध्ये एकेकाळी ‘विरासत’ ची ‘गेहना’ तब्बू होती. काही वर्षांनंतर ‘हम साथ साथ है’ पाहून असं वाटायला लागलेलं की bc बायको असावी तर अशी. ‘तलवार’ सिनेमा ज्या आरुषी हत्याकांडवर आधारित आहे, त्या सिनेमात प्रत्यक्ष गुन्हेगार कुणीही असो, तब्बू निर्दोष सुटली पाहिजे असं फार आतून वाटायचं. ‘जय हो’ मध्ये तब्बू सलमान च्या बहिणीच्या भूमिकेत आहे. तिच्यावर गुंड हात उचलायला बघतात तेव्हा ऐन वेळी सलमान पोचतो अन सगळ्या गुंडांची आयभैन एक करतो. सलमान चे असंख्य टुकार सिनेमे आणि त्याला अभिनय येत नाही ह्या सगळ्याना मी तेवढया सिन साठी माफ करू शकतो. आपल्या तब्बू ला वाचवलं आहे bc. विषय ए का!

तब्बू. नकळत्या वयात नको त्या भावना चाळवल्या जाण्याआधी हृदयात नाही तर शरीरात घर करून बसलेली हिरोईन. आमच्या घरात फादर ला आवडते म्हणून ‘हम आपके है कौन’ मधलं गोल उघडया गळ्याचं पाठमोऱ्या माधुरी चं पोस्टर भिंतीवर चिटकवलेलं होतं. आईने खुन्नस म्हणून त्याच शेजारी ‘बोल राधा बोल’ च्या जुही चं पोस्टर चिटकवलं. मी त्यांच्यावर खार खाऊन भेळ च्या गाड्याला आतून लागलेलं असतं तसं पोस्टकार्ड साईज विजयपथच्या तब्बू चं पोस्टर आणलं अन शाळेच्या दप्तरात ठेऊन एकट्याने पप्पी घ्यायला सुरुवात झाली ती तेव्हाच.

अभिनय, बुद्धी यासोबतच घनघोर शरीराचं आकर्षण असावं अशी ‘तब्बू’ ही एकमेव स्त्री होती.

मी आजवर पाहिलेली दुसरी सर्वात सुंदर स्त्री. ‘तब्बू’ चा जेव्हा जेव्हा विचार करतो, मी स्वतःला ‘ये साली जिंदगी’ चा इरफान समजायला लागतो. त्याच्या नशिबात कधीही न येऊ शकणाऱ्या आयटम मुळे हिरो चे आधीच पाववडे लागलेले असतात. सगळं मागे सोडून चाललेला असतो अन हिरोईन चा कॉल येतो, ‘डार्लिंग, मैं बहुत बडी प्रॉब्लम में फस गयी हुं।’ शून्य सेकंदात इरफान च्या गाडीचे ब्रेक लागतात अन लगेच गाडी यु टर्न घेऊन तिच्याकडे वळतो. त्याच्या आतून आवाज येतो, ‘मैं अपने बाप की कसम खा के कह सकता हूं कि मैं जाना नहीं चाहता था। पर क्या पता, मानो एक हवा का झोंका आया, गाड़ी खुदबखुद चलने लगी, मेरे हाथ स्टियरिंग को मोड़ने लगे, क्या बताऊँ… माँ की आँख!’ तब्बू माझ्यासाठी तसला हवा का झोंका आहे. लागू दे काय *वडे लागायचे ते. जीव का घेत नाही.

माझा फेव्हरेट सनी देओल फक्त एकाच पिक्चर मध्ये चुत्या वाटतो. जीत. ‘दिल का करे साहेब’ म्हणत आवाहन करणाऱ्या तब्बू ला सोडून करिष्मा च्या मागे लागला होता तेव्हा.

माझ्या आवडत्या अजय देवगण चा खूप राग येतो, जेव्हा ‘दृष्यम’च्या टकाटक घट्ट पोलीस युनिफॉर्म मध्ये असलेल्या तब्बू ला शेवटी रडवतो. कुठून जन्माला येतात अशी दगड काळजाची माणसं. मला आठवतंय, ‘माँ तुझे सलाम’ मध्ये ‘ओय रांझणा’ गाण्यात तब्बू वाकते तिथे मी आऊट व्हायचो. तेवढ्या सिन करता नंतर 3 वेळा पिक्चर पाहिलेला. ‘मकबूल’ मध्ये आहे तशी ‘निम्मी’ मिळाली तर शंभर अब्बाजी चे खून करायला तयार होतो मी. तयार आहे!

अंधाधून पाहिला. तिचं जानलेवा सौंदर्य पाहून थक्क झालो. मुळात सिनेमात प्रत्येक फ्रेम मध्ये इतकं ठासून सगळ्या गोष्टींचं इंस्टोलेशन केलय की पडद्यावरून थोडं जरी लक्ष विचलित झालं तरी खूप काही महत्वाचं मिस होऊ शकतं. तब्बू ला बघावं की बाकी ठिकाणी लक्ष द्यावं ही सर्वात मोठी कसरत आहे. तिचा अभिनय वैगरे नंतर. एवढी खतरनाक, भयंकर, जहर सुंदर दिसते की आपल्याकडे आहे नाही ते सगळं विकून तिच्यासाठी दारिद्र्य पत्करावं.

तब्बू च्या डोळ्यात आपल्याबद्दल शून्य प्रेम दिसतं. ही एकदम आतल्या गाठीची बाई आहे, अन हिच्यामागे लागणं म्हणजे उध्वस्त होण्यासारखं आहे हे माहीत असून सुद्धा सगळं स्टेक वर लावावं वाटतं. रात्री मुव्ही बघितला अन गच्च भरलेली जीवघेणी नजर पाहून खल्लास झालो. सकाळी मित्राला बोललो, ‘आपल्याकडे केळं काही नाहीये तरीपण bc शेती-वाडा-जमीन-जुमला विकून टाकावा वाटतोय हिच्यासाठी. एवढं देऊन पण नाही फळणार हे माहीत असताना सुद्धा.’ मित्र बोलला, ‘राधिका आपटे आणि तब्बू एका फ्रेममध्ये असतात तेव्हा आपटेची दया येते!’

अगदी अगदी! असल्या टोकाच्या दोन स्त्रियांना एकाच फ्रेम मध्ये ठेऊन राघवन ने लै मोठ्ठ इथे न सांगता येण्यासारखं तत्वज्ञान मांडलं आहे. तब्बू बद्दल माझ्या नशिबात असं झुरणं किती दिवस असेल याचा विचार करणं मी सोडून दिलय. वयाच्या ५२ व्या वर्षी ती माझ्यासाठीच सिंगल आहे हा माझ्यापुरता मी समज करून घेतलाय. कुणी नावं का ठेवेना. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ते अजिबात खोटं नाही!

  • जितेंद्र घाटगे.

हे ही वाचा. 

1 Comment
  1. अविनाश says

    साला लई खतरनाक लेखक हायेस राव तू.. तुझ माझ टाइमिंग मात्र येक दम जुळल मनायचे.. मंजी अपुन बी सनी भई, इरफान मिया आन तब्बू बाय चे न फिरणारे फॅन मंजी ते सीलिंग वाले नाय बर. एकदम मंजी टेबल फैन.. समोर बसून नुस्ते एकटक बघत बसणारे..

    लई भारी लिवलया.. असाच लिव.. अशी दादासाहेब फाळके चरणी प्रार्थना

Leave A Reply

Your email address will not be published.