हरहर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातोय ?

आजकालचा ट्रेंड म्हणजे…एखादा चित्रपट येतो सोबतच काही वादाचे मुद्देही घेऊन येतो. सद्या वादात सापडलेला चित्रपट म्हणजे ‘हर हर महादेव’. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमावर आधारलेला अभिजित देशपांडेंनी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. 

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे यांनी साकारली आहे तर शरद केळकर यांनी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाचं जरी सोशल मीडियावर कौतुक होतंय पण यावरून राजकारण रंगलंय.. 

राजकारण काय रंगलंय ?

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी या सिनेमावर आक्षेप घेतला आहे. मिटकरी यांनी ट्वीट करुन सिनेमात दाखवलेली अनेक दृश्य ही इतिहासाला धरून नसल्याचं सांगितलं.

“VFX तंत्रज्ञानाचा अतिवापर हर हर महादेव सिनेमात जाणवला. सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका (अभिनय छान असला तरीही ) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. राज ठाकरे यांचं निवेदन सिनेमात सर्वात प्रभावी वाटतं. अफजल खानाचा कोथळा काढताना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्त्राव असो किंवा सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही. बाजीप्रभु यांची शब्दफेक आणि जेधे बांदल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही.’ असं अमोल मिटकरी यांनी ट्विट करून मत व्यक्त केलं.

या चित्रपटाच्या वादासोबतच आणखी एक मुद्दा म्हणजे “हर हर महादेव” हा मराठीतली पहिला बहुभाषिक सिनेमा ठरला आहे. 

संपूर्ण भारतात एकूण ४०० चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. मराठीसह पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. म्हणजेच  मराठी,कन्नड,तमिळ,तेलगू आणि हिंदी अशा ५ भाषक प्रेक्षकांपर्यंत शिवरायांच्या इतिहासाबाबत अनऐतिहासिक संदर्भ पोहोचणार असं बोललं जातंय.  

ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी देखील अलीकडेच हर हर महादेव वर आक्षेप घेत सवाल केलाय कि, “राजसाहेब आपण तरी आवाज देण्याआधी हा चित्रपट पाहिला आहे का? 

“ज्या बाजीप्रभु यांनी शिवरायांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिले त्यांच्या तोंडी महाराजांच्या प्रती आक्षेपार्ह वक्तव्य टाकली आहेत. मला एकाचा जीव घ्यायचा आहे त्याच नाव आहे. शिवाजी शहाजी भोसले हे वाक्य बाजीरावांच्या तोंडी आहे आणि अशी मानसिकता असलेल्या माणसांवर विश्वास ठेवून महाराज स्वराज्यची अपेक्षा ठेवून होते असं निर्मात्यांना सांगायचं आहे का?, स्वराज्याशी आमचा काहीच संबंध नाही असे वाक्य या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

“स्वराज्याच्या लढाईत सामील व्हा नाही तर जीव द्या असे महाराज या चित्रपटात सांगताना दिसत आहे म्हणजे महाराजांनी सैन्य जमावली ते जबरदस्तीने असं यांना सांगायचं आहे का ? ५ भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाल्यामुळे पूर्ण भारतात आपण अशी विकृत विधाने पोहोचवून आपण काय साधणार आहोत?” असा थेट सवाल आनंद दवे यांनी यावेळी उपस्थित केला.

सर्वच प्रेक्षक वाचन करत नाहीत, अभ्यास करत नाहीत त्यामुळे या चित्रपटात दाखवलेली दृश्यच खरी मानतात त्यामुळे अनैतिहासिक संदर्भामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे.

पण ऐतिहासिक संदर्भ नेमके कुठे चुकलेत ?

  • बांदलांच्या कारभारात एक पाटील ६० मुलींवर बलात्कार करतो आणि बांदल त्याला पाठीशी घालतात हा संदर्भाला ऐतिहासिक आधार नाही.
  • जेधे आणि बांदल या दोन्ही घराण्याचे वैर होते हे इतिहासात आढळते मात्र, साधीशी बकरी चोरण्यावरून बांदल- जेधे घराणे एकमेकांची मुंडकी मारायचे हा प्रसंग पटत नाही.

याबाबत बोल भिडूने बांदलांचे वंशज करणसिंह बांदल यांनी सांगितले की, “बाजीप्रभू देशपांडे यांचं मूळ आडनाव देशपांडे नाहीये तर देशकुलकर्णी आहे. दुसरं असं कि, जेधे आणि बांदल यांच्यात जी लढाई झाली ती १६३० च्या आसपास. त्या लढाई मध्ये आपटी जवळ(भोर) कृष्णाजी बांदल यांची डोक्यावरची पगडी खाली पडली होती. बाजीप्रभू यांनी ती पगडी तोंडात धरून आणली होती. त्यामुळे कृष्णाजी बांदल यांनी त्यांना घोडा बक्षीस दिला होता”.

पण कृष्णाजी बांदल आणि बाजीप्रभूंच्या वडिलांमध्ये तब्बल सहा लढाया झाल्यात त्यात बांदलांनी बाजीप्रभूंकन्हया वडिलांना मारलं. त्यानंतर त्यांच्या पत्नीने म्हणजेच बाजीप्रभूंच्या आईने आपले दोन्ही मूळ बांदलांच्या डोक्यावर ठेवले. कृष्णाजी बांदल म्हणायचे व्यक्ती मेला आता वैर संपलं म्हणून त्यांनी याना पदरात घेतलं. त्याच्या काही काळाने दादोजी कोंडदेव यांनी कृष्णाजी बांदलांना विषप्रयोग करून मारलं. हा १६३६ चा काळ होता आणि तेंव्हा शिवाजी महाराज ६ वर्षांचे होते. त्यामुळे कृष्णाजी बांदल आणि शिवाजी महाराजांमध्ये लढाईचा काही संबंधच नाहीये जो या चित्रपटात दाखवला आहे. आता राहिला मुद्दा बांदल आणि जेधेंमधल्या लढाईचा तर बकरी चोरण्याच्या क्षुल्लक कारणांवरून या लढाया नव्हत्या तर, या दोन पिढ्यांपासून ही लढाई होती”, असं करणसिंह बांदल सांगतात.

ते पुढे असंही सांगतात कि, “बाजीप्रभू एवढेही मोठे नव्हते ना त्यांचं छत्रपती आणि बांदल घराण्याएवढं योगदान नव्हतं. बांदल घराण्यातला व्यक्ती लढवताना न दाखवणे आणि एकटे बाजीप्रभूच महत्वाचे दाखवत त्यांचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न यात केला आहे असं मत करणसिंह बांदल यांनी व्यक्त केलं.

थोडक्यात,

  • या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे व छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कोणती लढाई झाल्याचंही इतिहासात आढळत नाही.
  • अफजल खानाच्या वधाच्या वेळी बाजीप्रभू देशपांडे हे घाटनास्थळी उपस्थित असल्याचीही नोंद इतिहासात नाही.
  • अफजल खान डावखुरा होता असं बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना खाजगीत सांगतात यालाही ऐतिहासिक आधार नाही.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध नरसिंहासारखा पोट फाडून केला हा प्रसंग मुळातच प्रॅक्टिकली शक्य नाही. 

सर्वात महत्वाचं म्हणजे भूमिकेत ‘शिवरायांसारखे’ दिसणे…शिवराय वठवणे हा खूप महत्वाचा पैलू आहे…

शिवाजी महाराज कसे दिसायचे याचं फार कुतुहल वाटायचं. आपण महाराजांचा चेहरा ४ थी च्या पुस्तकात बघितला आणि तेंव्हापासून महाराजांची एक पुसटशी प्रतिमा नजरेत कोरली गेली. लहानपणी चंद्रकांत मांढरे यांच्या निमित्ताने पडद्यावर शिवाजी महाराज पाहिले. घरंदाज, रुबाबदार, देखणे चंद्रकांत मांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारली होती. शिवरायांची भूमिका साकारावी चंद्रकांत मांडरेंनीच! असं म्हणलं जायचं.

काळानुरूप मिलिंद गुणाजी,अमोल कोल्हे, महेश मांजरेकर, शंतनू मोघे, शरद केळकर, गश्मिर महाजनी अशा सर्व कलाकारांनी साकारलेले छत्रपती शिवराय प्रेक्षकांना आवडले. महाराजांची धीरगंभीर मुद्रा, परिपक्वता आणि स्मितहास्य खूप छान जमल्याची पोचपावती या सर्वच कलाकारांना मिळालाय. 

शिवाजी महाराजांची आत्तापर्यंतची सर्व दुर्मिळ चित्रे पाहता, शिवाजी महाराज पाच फूट चार इंच उंचीचे होते. त्यांचं नाक बाकदार होतं. भव्य कपाळ होतं. त्यांचे डोळे बाणेदार होते. चेहऱ्याची उभी ठेवण होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाचे वर्णन पाहता, सुबोध भावे यांनी साकारलेली महाराजांची भूमिका अनेकांना पटली नाही. सुबोध भावेंच्या भूमिकेत महाराज थोडे आक्रमक वाटले.

सुबोध भावे एक उत्तम अभिनेता आहे यात वादच नाही. त्यांना महाराजांचा रोल करायचा मोह झाला त्यातही काही वावगे नाही. मात्र सुबोध भावेंना महाराजांच्या भूमिकेत पाहणे प्रेक्षकांना पचतच नाही अशीच सगळीकडे चर्चा आहे. भावेंची चेहरेपट्टी, दाढी, शरीरयष्टी, अभिनय पाहून भावे कोणत्याच बाजूने महाराज वाटत नाही. 

शिवाय असंही म्हणलं जातंय कि, महाराजांच्या आजवरच्या भूमिकेत आणि इतिहासात वाचलेल्या महाराजांच्या भाषेचा लहेजा, बोली हे सुबोध भावेंच्या अभिनयात दिसत नाही.

या चित्रपटात सगळ्या सरदारांची भाषा ही रांगडी मराठी दाखवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मात्र शुद्ध मराठी दाखवली आहे.

याच सर्व अनैतिहासिक संदर्भामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.