पहिल्या मॅचच्या वेळी ठरवलेलं, मी देशासाठी शंभर कसोटी खेळल्या शिवाय मागं फिरणार नाही.

साल होतं १९९८. ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आली होती. दौरा सुरु होण्यापूर्वी ते जवळपास तीन सराव सामने खेळणार होते. अनेक नव्या खेळाडूना मार्क टेलर, स्टीव्ह वॉ, शेन वॉर्नसारख्या प्लेअर्स विरुद्ध खेळण्याची संधी मिळणार होती. पहिला सराव सामना मुंबईत झाला. सचिनने त्या मॅच मध्ये डबल सेंच्युरी मारली.

राहुल संघवी हे त्याकाळात डोमेस्टिक क्रिकेट सर्किटमध्ये गाजलेलं नाव होतं. दिल्ली विरुद्ध हिमाचलप्रदेश सामन्यात त्याने फक्त पंधरा रन देऊन ८ विकेट्स काढल्या होत्या. हा एक विश्वविक्रम होता. गेली दोन चार वर्षे रणजीचे सामने त्याने गाजवले होते.

त्यामानाने हरभजन एवढा फेमस नव्हता. सतरा वर्षाचा काटकुळा सरदारजी आपल्या पहिल्या इम्प्रेशनमध्येचं मार खायचा. त्यामानाने संघवी बॉलिंगला आला की बॅटसमन घाबरायचे. तो सामना या दोघांसाठी ही महत्वाचा होता. 

मॅचमध्ये दोघांनीही बरी बॉलिंग टाकली. ऑस्ट्रेलियन फलंदाजानी दोघानाही बरच ठोकल. अखेर सराव सामन्यासाठी टीमची कप्तानी करणाऱ्या राहुल द्रविडला कधी नव्हे ते स्वतः बॉलिंग टाकावी लागली. मायकल स्लेटर ने दोनशे तर नवोदित पोंटिंगने १५० धावा काढल्या. हरभजनने स्लेटरची एकमेव विकेट काढली तर संघवी ला दोन विकेट्स मिळाल्या होत्या. दोघांनीही जवळपास १२० धावा दिल्या होत्या. मॅच ड्रॉ झाली.

त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर हरभजन आणि संघवी गप्पा मारत बसले होते. आता पुढे चान्स मिळेल की नाही याच टेन्शन होतं. संघवी हा हरभजनपेक्षा सिनियर होता. तो म्हणाला,

“यार भज्जी मुझे एक टेस्ट खेलने को मिलेगा तो भी ठीक है. मेरा काम हो गया. मेरा सपना है कम से कम एकबार तो अपने को वो इंडिया की कॅप मिले. जिंदगी भर मै मै अपने यार दोस्तोंको केह पाउंगा मैने अपने देश के लिये टेस्ट क्रिकेट खेला है.”

कायम बडबड करणारा हरभजन गप्प होता. त्याला वाटल हे काय स्वप्न आहे? फक्त एक कसोटी खेळणे एवढं छोटं लक्ष्य ठेवायचं नाही. आपल्याला भारतासाठी कमीतकमी शंभर कसोटी खेळायच्या आहेत.

“दुनिया इधर की उधर हो जाये मगर मुझे देश के लिये १०० टेस्ट खेलने है. “

पुढे जाऊन हरभजनला त्याच सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात त्याने विकेट्स घेतल्या. पुढे जाऊन सौरव गांगुली कॅप्टन झाल्यावर त्याला भरपूर संधी मिळाली. अनिल कुंबळेच्या जोडीदाराची जागा त्याने आपल्या जबरदस्त बॉलिंगमुळे यशस्वीपणे भरून काढली.

विशेषतः ऑस्ट्रेलिया विरुद्ध तर गडी जास्त रंगात यायचा.

२००१चा इडन गार्डनवरचा भारत ऑस्ट्रेलिया सामना व्हीव्हीएस लक्ष्मण-द्रविड पार्टनरशिप, लक्ष्मणने काढलेली डबल सेंच्युरी यासाठी ओळखला जातो. भारताने फॉलोऑननंतर कसा अविश्वसनीय विजय खेचून आणला याची चर्चा होते मात्र याच सामन्यात हरभजन भारतासाठी पहिली टेस्ट हॅटट्रिक घेतली. यात रिकी पोंटिंग, गिलख्रिस्ट, शेन वॉर्न या दिग्गजांचा समावेश होता. पहिल्या इनिंग मध्ये ७ आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ६ अशा एकूण १३ विकेट्स काढल्या. त्याच्या या कामगिरीकडे आजही अनेकांचं दुर्लक्ष होते. तो नसता तर भारत ती कसोटी जिंकूच शकला नसता.

यासामन्याने ऑस्ट्रेलियाची सलग १६ सामने न हरण्याचा रेकॉर्ड मोडला. भारतिय क्रिकेटसाठी हा सामना टर्निंग पॉईंट ठरला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली नव्या टीमला आपणही जगज्जेता होऊ शकतो याचा आत्मविश्वास आला. हरभजन साठी देखील ही मॅच त्याचं आयुष्य बदलणारी ठरली.

त्याने फक्त भारतातच नाही तर परदेशी खेळपट्टीवर देखील आपली फिरकी च्म्क्वली. रिकी पोंटिंग तर त्याचा हमखास बकरा होता. त्यांच्या स्लेजिंगला पुरून उरणाऱ्या हरभजनबरोबर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची भांडणे तर भरपूर गाजली. कधी त्याच्या अक्शनवर शंका घेतली गेली. अनेकदा कॉन्ट्रावर्सी मध्ये अडकुनही भज्जी आपल्या कामगिरीच्या जोरावर खेळतच राहिला. त्याने भारतासाठी १०० कसोटी खेळल्या. यात त्याने चारशेहून जास्त बळी मिळवले.

आणि राहुल संघवी?तो आयुष्यात फक्त १च कसोटी खेळला. 

त्याला दहा वनडेमध्ये चान्स मिळाला पण काही लक्षणीय कामगिरी करायला जमली नाही. पुढे त्याचे नाव स्पर्धेतून मागे पडले. गेल्या काही वर्षापासून मुंबई इंडियन्सच्या कोचिंग टीमचा तो एक भाग आहे.

image
राहुल संघवी आणि हरभजनसिंग

एका मुलाखतीमध्ये हरभजन म्हणतो,

” उस प्लेअरसे मुझमे टॅलेंट कम था मगर मैने उसं टाईम अपना सपना बडा रख्खा. अपनी जान लगा दी उसं सपने के पीछे. अपने जिद के वजह से अपना ये मुकाम पा सका. “

अशा या जिद्दी टर्बेनेटर हरभजनचा आज वाढदिवस.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.