हरभजनने लेहमनला मैदानावरच विचारलं, तू प्रेग्नंट आहेस का..? 

क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की संपूर्ण क्रिकेट जगतावर ऑस्ट्रेलियन संघाचं अधिराज्य होतं. ऑस्ट्रेलियन जितकं आक्रमक क्रिकेट खेळायचे तितकेच आक्रमक ते मैदानावर पण असायचे. 

प्रतिस्पर्धी संघ आपल्यावर थोडा जरी हावी होतोय, असं दिसलं की हे गडी आपलं शेवटचं अस्त्र स्लेजिंगच्या रुपात बाहेर काढायचे. समोरच्या संघाला स्लेज करून परेशान करायचं आणि त्या संघातील खेळाडूंचं मानसिक खच्चीकरण करायचं हा त्यांच्या रणनीतीचा भाग. भारतीय संघाने पण ऑस्ट्रेलियाचं स्लेजिंग मोठ्या प्रमाणात सहन केलेलं. सचिन-द्रविड-लक्ष्मण-कुंबळे ही त्या अर्थाने भारतीय क्रिकेटमधली सभ्य माणसं. ती काही या ऑस्ट्रेलियन स्लेजिंगकडे फारसं लक्ष द्यायची नाहीत.

पण भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून ‘दादा’ सौरव गांगुलीने सूत्र हाती घेतली आणि त्याने स्लेजिंगच्या ‘अरे’ ला ‘कारे’ नेच उत्तर द्यायचा गुरुमंत्र भारतीय संघाला दिला. 

गांगुलीचा हा गुरुमंत्र ज्यांनी सगळ्यात जास्त पाळला त्यातलं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे ‘पंजाब दा पुत्तर’ हरभजन सिंग. हरभजन खरं तर तसाही गरम डोक्याचा. नंतर तर त्याला कॅप्टनकडूनच सूट मिळाली. त्यामुळे मैदानावर जेव्हा कधी ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू स्लेजिंग करायचे, त्याला हरभजन उत्तर द्यायचाच. 

असाच भारत एकदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. भारताची बॅटिंग सुरु होती. टॉप ऑर्डर केव्हाच पॅव्हेलियनमध्ये परतली होती, पण हरभजन टिकून खेळत होता. भारताची टॉप ऑर्डर कोसळल्यावर टेल परेशान करतेय हे काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सहन होतं नव्हतं. 

हरभजनला डिवचण्यासाठी डेरेन लेहमनने स्लेज करायला सुरुवात केली होती. हरभजनने सुरुवातीला एक-दोन वेळा तर दुर्लक्ष केलं, पण लेहमन काही थांबायला तयारच नव्हता. त्याचं हरभजनला डिवचण सुरूच होतं. 

लेहमनने ज्यावेळी लिमिट्स क्रॉस केल्या त्यावेळी हरभजनने त्याला विचारलं,

“तू प्रेग्नंट आहेस का…?”

आपल्याला आठवत असेल तर डेरेन लेहमन हा जाड्या खेळाडू होता. त्याचं पोट पुढे आलेलं होतं. हाच धागा पकडून हरभजनने त्याला हा प्रश्न विचारलं होतं. 

आधी तर लेहमन हसला पण नंतर हरभजनने त्याला पुन्हा विचारलं,

“ कितवा महिना सुरु आहे..?

त्यानंतर मात्र लेहमन चिडला. ही गोष्ट त्याने जाऊन शेन वॉर्नला सांगितली. त्यानंतर वॉर्न देखील हसायला लागला. 

हरभजन असा अनेक वेळा अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भिडला होता. त्यामुळे त्यांना कळून चुकलं होतं की याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. एक वेळ अशी आली की ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याला स्लेज करणच सोडून दिलं. 

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.