दारूच्या नशेत बॅटिंग करून हर्शेल गिब्जने ऑस्ट्रेलियन बॉलर्सची पिसं काढली होती…
क्रिकेट हा रेकॉर्डचा खेळ समजला जातो. अनेक रेकॉर्ड बनले जातात अनेक रेकॉर्ड तुटतात. पण काही काही रेकॉर्ड असे असतात जे क्रिकेट फॅन्स कधीच विसरू शकत नाही. जगभरात क्रिकेट पाहिलं जातं, खेळलं जातं. परदेशातले अनेक खेळाडू आपले फेव्हरेट असतात, ओघाने आयपीएलचा परिणामसुद्धा म्हणावा लागेल. असाच एक गाजलेला विषय जाणून घेऊ.
हर्षेल गिब्जला साऊथ आफ्रिकेचा सेहवाग म्हटलं जायचं
बॅटिंगला आल्यावर तो विरोधी संघाच्या बॉलिंगची तोडफोड करूनच जायचा. हर्षेल गिब्जचा कॉन्फिडन्स इतका जबरी होता की त्याने ऑस्ट्रेलियन संघाला सुद्धा चॅलेंज केलं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये दारूच्या नशेत गिब्जने एक इतिहास रचला होता त्याबद्दलचा आजचा किस्सा….
१२ मार्च २००६ या दिवशी क्रिकेट इतिहासातील सगळ्यात खतरनाक मॅच झालेली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका. ज्यावेळी ही मॅच सुरू झाली तेव्हा कोणालाही अंदाज नव्हता की या मॅचमध्ये अशक्यप्राय गोष्टी घडणार आहेत. ज्या ज्या लोकांनी या मॅचची तिकीटं काढली होती त्या लोकांना पैसा वसुल मॅच म्हणजे काय असतं याचा अनुभव आला होता.
पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने बॅटिंग करत आफ्रिकन बॉलिंगची भयंकर धुलाई केली. टॉप बॅटींग ऑर्डरमध्ये ऍडम गिलख्रिस्ट ५५, सायमन कॅटीच ७९, मायकल हसी ८१, रिकी पॉंटिंग १६४. ऑस्ट्रेलियाने ४३४ धावांचा डोंगर उभारला. इथंच अर्धे लोकं समजून गेले होते की मॅच आता ऑस्ट्रेलिया जिंकणार. इथं ऑस्ट्रेलियाने विक्रम केला की पहिल्यांदा संघाने ४०० धावांचा पल्ला पार केला.
पण हा फक्त ट्रेलर होता, आफ्रिकन संघ आधीच इतका स्कोर बघून कोमात गेला होता. आफ्रिकन खेळाडूंना आधीच कळलं होतं की इतके रन आपण काय चेस करू शकत नाही, त्यामुळे सगळे शांत होते. पण जॅक कॅलीस आणि कोच मिकी आर्थर यांनी हे टार्गेट चेस होऊ शकतं असा दिलासा दिला.
जेव्हा हर्षेल गिब्ज बॅटींगला आला तेव्हा तो वेगळ्याच धुंदीत होता. त्या मॅचला गिब्जने ऑस्ट्रेलियन बोलर्सची पिसे काढली. म्हणजे याआधी इतकी धुलाई ऑस्ट्रेलियन बॉलिंगची कोणीच केली नव्हती. गिब्जने १११ बॉल मध्ये १७५ रन ठोकले.
गिब्जने ही खेळी दारूच्या नशेत केली होती. हे गुपित मायकल हसीने त्याच्या आत्मकथेत लिहिलेलं आहे. ज्यावेळी खेळाडू जेवण करायला गेले तेव्हा माफक प्रमाणात दारू पिण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे खाऊन पिऊन सगळे खेळाडू निघाले मात्र हर्षेल गिब्ज मस्त पैकी कोपऱ्यात बसून दारू पीत बसला होता.
काही वेळाने मायकल हसीने त्याला पाहिलं पण त्याने विचार केला की इतका दारू पितोय म्हणल्यावर बॅटींग मध्ये हा काही विशेष करणार नाही. पण त्या नशेतच गिब्ज बॅटिंगला आला आणि सगळ्या ऑस्ट्रेलियन बॉलिंगचा बाजार उठवून गेला.
मॅचच्या अगोदर कॅप्टन ग्रॅमी स्मिथ गिब्जवर नाराज होता कारण इतकी दारू तो पिलेला होता की टीम गोलच्या वेळी सुद्धा तो शुद्धीत नव्हता. पण ऑस्ट्रेलियाच्या ४३४ धावांचा पाठलाग करून गिब्जने आणि आफ्रिकन टीमने ४३८ धावा करून सामना जिंकला होता. मॅच जिंकल्यानंतर स्मिथने स्वतः बियरची बॉटल गिब्जला भेट दिली.
दारूच्या नशेत माणूस काय काय करू शकतो याचं मोठं उदाहरण म्हणजे हर्षेल गिब्ज ज्याने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठवला होता.
हे हि वाच भिडू :
- पोलिसांना घाबरून हर्शेल गिब्स भारतात खेळायलाच यायचा नाही…
- दोन दशकं उलटून गेली अजूनही सुनील जोशीचं रेकॉर्ड तोडणं कुठल्याही बॉलरला जमलेलं नाही.
- क्लूजनरने सेमीफायनलला माती खाल्ली आणि आफ्रिकेचे चोकर हे नाव फायनल झाले.
- रूममेटने रिसेप्शनिस्टला डेटसाठी विचारल्याने, जगातल्या सर्वोत्तम लेगस्पिनरची कारकीर्द संपली होती.