ग्राऊंडच्या आत असो किंवा बाहेर, पंड्या बंधूंचा टाईम खराब सुरु आहे

प्रत्येक ग्रुपमध्ये एक ‘स्टेटस किंग’ कार्यकर्ता असतोयच. म्हणजे जगातलं सगळं दर्दी मटेरियल त्याच्याकडं असतंय, त्याची व्हाट्सअप गॅलरी पाहिली की दणक्यात मोटिव्हेशन मिळत असतंय. आमच्या गॅंगमध्येही असा एक कार्यकर्ताय, त्याच्या जिंदगीत काहीही झालं तरी ते स्टेटस ठेवत असतंय. आता परवाच त्याचं स्टेटस होतं,

वक्त ने सबके हिस्से में दुःख बाँटे है; इस लिए घडी में फुल नहीं काटें है…

आता तुम्ही वाचून केलं असंल, तसं सेम तोंड आम्ही पण केलं. पण कसं असतंय आपल्याला जे क्रिन्ज वाटतंय, तेच एखाद्यासाठी लय भारी ठरू शकतं. वरचा स्टेटस आपल्यासाठी बोर असंल, पण हार्दिक आणि कृणाल पंड्यासाठी मात्र ते घरात फ्रेम करून लावावं असं वाक्य ए.

कारण पण तसंच आहे भिडू. छोटा पंड्या असेल किंवा मोठ्या पंड्या.. दोघांनाही परदेशातून घड्याळ आणताना कस्टम्सवाल्यांनी पकडलं. आता कागदपत्रं आणि पावत्या देऊन प्रकरण मिटलं पण नाव खराब व्हायचं ते झालंच. त्यामुळं घड्याळ्यातले काटे दोघांनाही बोचलेच.

आयपीएलमध्ये हार्दिक हाणामारी करेल असं वाटलं होतं, पण गडी फेल गेला. वर्ल्डकपमध्ये पण कोहली आणि शास्त्रीनं त्यांच्यावर विश्वास दाखवला पण पंड्याचा धमाका काय पाहायला मिळाला नाही. दुसरीकडं कृणाल पंड्या परफॉर्मन्समुळं कमी आणि आपल्याच टीमच्या प्लेअर्सवर केलेल्या चिडचिडीमुळं जास्त लक्षात राहिला. थोडक्यात ग्राऊंडवर दोघांच्या नशिबानं काय साथ दिलेली नाही.

त्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सिरीजसाठी पण दोघांना कल्टी देण्यात आली आहे. हे सगळं बघून वाटलेलं हार्दिक जरा निवांत राहील, इंज्युरीवर काम करंल, पोरासोबत खेळंल. कृणाल मेडिटेशन करून राग शांत करंल. पण सगळ्या गोष्टी काय सरळ होत नसतात.

संयुक्त अरब अमिरातीतून हार्दिक परत आला आणि सोबत एक बातमीही आली. ‘भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्याकडून ५ कोटी किंमत असलेली दोन मनगटी घड्याळं मुंबई कस्टम्स विभागानं जप्त केली आहेत. त्याच्याकडे घड्याळ्यांच्या खरेदीबद्दल पावती नसल्याची शक्यता आहे.’ आता पंड्या कितीही भारी प्लेअर असला, तरी करण जोहरच्या कार्यक्रमात पिलेल्या कॉफीचं भूत लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही. त्या कार्यक्रमातल्या बडबडीमुळं भाऊ आधीच बॅन झालेला आता त्यात हे नवं प्रकरण.

पंड्याला घड्याळाचा शौक आहे, त्याच्याकडं लय महागवाली घड्याळं आहेत, या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत. पण भिडू पाच कोटींची घड्याळं तेही बिलाशिवाय म्हणल्यावर हँग व्हायची वेळ आली की.

पण हार्दिकनं स्पष्टीकरण दिलंय…

‘मी १५ नोव्हेंबरच्या सकाळी दुबईहून परत आलो, तेव्हा माझी बॅग घेऊन स्वतः मुंबई विमानतळावरच्या कस्टम्स काऊंटरवर गेलो. मी दुबईवरुन आणलेल्या सगळ्या वस्तू त्यांना दाखवल्या आणि कस्टम ड्युटी भरली. याबाबत सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत आणि या सगळ्याबद्दल मला खरं ते सांगायचं आहे.’

‘मी दुबईतून खरेदी केलेल्या गोष्टींची स्वतःहून माहिती दिली आणि सीमाशुल्क भरण्याची तयारीही दाखवली. कस्टम्स विभागानं मागितलेली आवश्यक कागदपत्रं मी दिली आहेत. कस्टम्स विभाग सध्या सीमाशुल्क मोजत असून, मी ते भरण्यास तयार आहे. बातम्यांमध्ये सांगण्यात येतंय त्याप्रमाणं घड्याळाची किंमत ५ कोटी नसून दीड कोटी आहे.’

‘मी कायदा मानणारा नागरिक आहे आणि मी सगळ्या सरकारी एजन्सीजचा सन्मान करतो. मुंबई कस्टम्स विभागाला मी आतापर्यंत पूर्ण सहकार्य केलं आहे आणि यापुढंही करत राहील. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही.’ असं हार्दिकनं ट्विट करत सांगितलं आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्याची महागडी घड्याळं जवळ बाळगल्याप्रकरणी ईडीनं चौकशी केली होती. नंतर त्याचा तपासही कस्टम्स विभागाकडं सोपवण्यात आलाय.

त्यामुळं आता या दोन्ही भावांना घड्याळांचे काटे बोचणार का? आणि या सगळ्याचा त्यांच्या टीम इंडियामधल्या कमबॅक वर परिणाम होणार का हे तपासातूनच पुढं येईल.

पण एक आहे भिडू, जर हा हार्दिक पंड्या घावलं, तर भारतीय क्रिकेट वस्ताद ऑलराऊंडरला मुकणार हे नक्की…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.