विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्या बाजूनं ऐकायला येत नाही..

विधानसभा असो किंवा लोकसभा, सभापतींना शाळेच्या हेडमास्तर प्रमाणे कारभार चालवावा लागतो. सगळे आमदार खासदार दंगेखोर विद्यार्थ्यांप्रमाणे गोंधळ घालत असतात आणि सभापतींना कायम छडी उगारावी लागत असते.

पण बऱ्याचदा सभापती हे सत्ताधाऱ्यांना फेवर करतात असे आरोप होत असतात. म्हणजे काय तर सत्ताधारी पक्ष हे सभापतींचे लाडके विद्यार्थी तर सतत विरोधाची बाके वाजवणारे विरोधी पक्ष नावडते विद्यार्थी. असेच आरोप महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या बाबतीत देखील केला होता.

महाराष्ट्राच्या विधानसभेत डोक्यावर गांधी टोपी घालणारे फारच थोडे नेते शिल्लक आहेत. यातच समावेश होतो हरिभाऊ बागडे यांचा.

शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या भाजपचा बहुजन चेहरा. पक्षाला तळागाळात पोहचवण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. २०१४ साली जेव्हा राज्यात भाजप सत्तेत आली तेव्हा जेष्ठत्वामुळे विधानसभाध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळाला.

जवळपास १५ वर्षांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी भूमिकेत आले होते. सत्तेची सवय असलेल्या या पक्षाच्या नेत्यांचे आणि सभापतींचे वारंवार खटके उडायचे. विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाहून निर्णय घेतात असे म्हटले जाऊ लागले. यातूनच एकदा राष्ट्रवादी पक्षाचे गट नेते जयंत पाटील यांनी हरीभाऊ बागडे यांच्यावर टीका केली की,

विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्या बाजूनं ऐकायला येत नाही.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात विरोधी पक्ष हे विधानसभा अध्यक्षांच्या डाव्या बाजूला बसत असतात. यावरूनच जयंत पाटील यांनी टोला लगावला होता. हरीभाऊ यांचा कार्यकाल जेव्हा संपला तेव्हा याच अर्थाची टीका त्यांनी केली व या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला सर्व समान दिसलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हरिभाऊ बागडे  जेव्हा आपली सूत्रे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सोपवतहोते तेव्हा त्यांनी या टीकेला उत्तर दिलं. ते म्हणाले,

“मी विरोधकांचे ऐकले नाही, हा आरोप खोटा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी ३-३ तासांची चर्चा ८ तास चालवली. परंतु, मला एका कानाने ऐकू येत नाही, हे अनेकांना माहिती नाही.

ते माझं आजचं व्यंग नाही. तसेच ते लहानपणाचं पण नाही. मी पहिल्यांदा ही गोष्ट सभागृहात सांगतो. विधानसभा अध्यक्षांनी डावीकडे पाहायचे की उजवीकडे पाहायचे, असा उल्लेख वारंवार आला. पण हे आजचे नाही. ते आणीबाणीच्या काळातील आहे. मला त्याचा अनुभव आहे”

बागडे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना खरंच एका कानाने ऐकू येत नव्हते आणि यामागे आणीबाणीचे कारण होते.

झालं असं होतं की त्याकाळी जनसंघ मध्ये असलेल्या हरीभाऊंना सत्याग्रह काढण्याचे काम असायचे. दर आठवड्याला गावोगावी फिरून हि सत्याग्रहाची फेरी काढली जायची.

डिसेंबर महिन्याचे थंडीचे दिवस होते. तारुण्याचा जोश अन्यायी सरकारला उलथवून टाकण्याची उर्मी यामुळे हरिभाऊंच्या मध्ये एक वेगळाच उत्साह शिरला होता. रात्रीचा दिवस करत ते लोकांच्यात आणीबाणी विषयी जनजागृती करत फिरत होते. याचाच एकदा परिणाम झाला.

अशाच एका सत्याग्रहाच्या वेळी ते थंडीमुळे चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यांच्या कानाच्या नसा बधिर झाल्या. त्यावेळी ते दवाखाण्याला गेलेच नाहीत. दोन तीन दिवस घरात राहून विश्रांती घेतली आणि पुन्हा उन्हातान्हात सत्याग्रहासाठी निघाले. याच दिवसात त्यांना कानाचे व्यंग जडले.

आपल्या शारीरिक व्यंगावर विरोधकांनी बोट ठेवल्यामुळे चिडलेल्या बागडेंनी टीकेला जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले

” मला कानाने कमी ऐकू येते हे माझ्या जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे. काही लोकांना माहिती नसेल. आणीबाणीच्या प्रसंगाला आता ४५ वर्ष झाले. पण याच इंदिरा गांधींच्या आणीबाणी मुळे मला हि देणं मिळाली व  मला त्याचा रास्त अभिमान आहे. “

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.