ज्यामुळं दंगा सुरु झालाय त्या हरिद्वारच्या त्या धर्म संसदेत नेमकं घडलं तरी काय ?

सध्या सोशल मीडियावर २-३ व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत. व्हिडिओत कट्टर हिंदुत्ववादी नेते इस्लाम धर्मियांना भडकावणारी वक्तव्य करताना पाहायला मिळतायेत. एवढंच नाही तर वेळ आल्यावर आपण कुठलंही हत्यारं घ्यायला तयार आहोत असंही ही  मंडळी म्हणतायेत.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर देशभरातून मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पण आता इंटरनॅशनल मीडियाने सुद्धा त्यात उडी घेतलीये. 

म्हणजे झालं काय, गेल्या १७ ते १९ डिसेंबर दरम्यान हरिद्वारमध्ये धर्म संसदेच आयोजन करण्यात आलं होत. ब्रह्मलिन स्वामी ब्रह्मानंद सरस्वती आणि बैकुंठ लाल शर्मा यांच्या स्मरणार्थ ही तीन दिवसीय धर्मसंसद सुरु होती. तसं दरवर्षी हे धर्म संसद होते, ज्यासाठी ७ ते ८ महिने आधीच तयारी करावी लागते.

या धर्मसंसदेत भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि गाझियाबादचे साधू नरसिंहानंद सरस्वती, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि दक्षिणवादी संघटना हिंदू रक्षा सेनेचे स्वामी प्रबोधानंद, निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर माता अन्नपूर्णा यांच्यासोबत  धर्म संसदेचे संयोजक पंडित अधीर कौशिक यांच्यासह हजाराहून अधिक महामंडलेश्वर, महंत, ऋषी-मुनी जमले होते. यामध्ये जुना, निरंजनी, महानिर्वाणीसह हरिद्वारच्या सर्व प्रमुख आखाड्यांचा सहभाग होता.

या  दरम्यान धर्मसंसदेत हिंदुत्वाबाबत साधू-संतांच्या वादग्रस्त भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ज्यात ते आपल्या धर्माच्या रक्षणाच्या नावाखाली इस्लाम धर्मियांना टार्गेट करतायेत. धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणं, मुस्लिम पंतप्रधान होऊ न देणं आणि मुस्लिम लोकसंख्या वाढू न देणे, हातात शस्त्रे घेणं अशा गोष्टी सांगताना दिसतायेत.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर बराच काळ कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. एवढंच नाही तर केंद्र सरकार सुद्धा या प्रकरणावर मूग गिळून गप्प होत. पण गुरुवारी राज्याचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी एसएसपी हरिद्वार यांना या प्रकरणावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांतर्गत आयपीसीच्या कलम १५३ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर ब्लॉक करायला सुद्धा सांगितले आहे. पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेत, वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र नारायण त्यागी आणि कोतवालीतील इतरांविरुद्ध कलम १५३A आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या धर्म संसदेच्या ठरावाची घोषणा करताना महामंडलेश्वर यती नरसिंहानंद गिरी महाराज सांगतात,

“आता प्रत्येक हिंदूचे ध्येय सनातन वैदिक राष्ट्राची स्थापना हेच असले पाहिजे. आज ख्रिश्चनांचे जवळपास १०० देश आहेत. मुस्लिमांचे ५७, बौद्धांचेही ८ देश आहेत. फक्त नऊ लाख ज्यूंचा स्वतःचा इस्रायल देश आहे. हे शंभर कोटी हिंदूंचे दुर्दैव आहे की त्यांना आपला देश म्हणायला एक इंचही जागा नाही. आता हिंदूंना आपल्या राष्ट्रासाठी आपले संपूर्ण आयुष्य द्यावे लागेल.

प्रबोधानंद गिरी म्हणतात कि,

“हिंदूंवरील हल्ले वाढत आहेत आणि हरिद्वारमध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे. हिंदूंवर कोणताही हल्ला झाला तर आम्ही स्वसंरक्षणासाठी शस्त्र उचलू शकतो.”

हरिद्वारमधील धर्मसंसदेचे स्थानिक संयोजक आणि परशुराम आखाड्याचे अध्यक्ष पंडित अधीर कौशिक सांगतात, “गेल्या सात वर्षांपासून अशा प्रकारच्या धर्मसंसदेचे आयोजन केले जात आहे. याआधी दिल्ली, गाझियाबाद येथेही अशी धर्मसंसद आयोजित करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश हिंदु राष्ट्राच्या निर्मितीची तयारी करा. त्यासाठी शस्त्र उचलण्याची गरज पडली तर तेही उचलतील.

अधीर कौशिक पुढे सांगतात कि,

 “धर्म संसदेत असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे की, चुकीच्या धोरणांमुळे अडकलेल्या हिंदू तरुणांच्या कुटुंबीयांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. आम्हाला ‘हम दो, हमारे दो’ असं सांगितलं जातं. आणि त्यांला १२-२०-४० पर्यंत मुले होतात. लोकसंख्या नियंत्रण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे.”

दरम्यान, या कट्टर हिंदू नेत्यांच्या वक्तव्यावर मोदी सरकराने अजूनही कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सोशल मीडियावर या नेत्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. धार्मिक संसदेत देशाच्या इतर मुद्यावर चर्चा करण्याऐवजी  मूठभर लोक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय.

इंटरनॅशनल मीडियामध्ये सुद्धा या प्रकारावर टीका केली जात आहे. ब्रिटनच्या खासदार नाज शाह यांनी ट्विट करत लिहिले की,

“हे १९४१ ची नाझी जर्मनी नाही. हा २०२१ चा भारत आहे. मुस्लिमांना मारण्याचे आवाहन केले जात आहे.  ज्यांना हे अतिरेकी गट म्हणताहेत त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की हिटलरनेही अशीच सुरुवात केली. या प्रकरणात जागतिक निषेध कुठे आहे?”

यासोबतच न्यू जर्सी येथील रुकर्स युनिव्हर्सिटीतील दक्षिण आशियाई इतिहासाचे प्राध्यापक ऑड्रे ट्रुशके यांनीही यासंबंधीची बातमी ट्विट करून म्हंटल कि,

“एखाद्या समाजाला नरसंहार थांबवायचा आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित कार्यक्रम बंद करून अटक केली जाते. मोदींच्या भारतात भाजपचे नेते अशा कार्यक्रमात सहभागी होतात आणि अटक सुद्धा होत नाही.”

एवढंच नाही, तर साऊथ एशिया असोशिएशन, तुर्कीचे सरकारी प्रसारक, इंडियन अमेरिकन मुस्लिम काउन्सिलने सुद्धा या घटनेचा निषेध केलाय. त्यामुळे हे प्रकरण चिघळणार एवढं मात्र नक्की. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.