एका आज्जीबाईच्या हुशारीमुळे हरिहरगड मुघलांच्या तावडीतून सुटला होता.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या डोंगररांगेत अंजनेरी, ब्रह्मगिरी, हर्षगड, ब्रह्मा, बसगड, रांजणगिरी, भास्करगड असे अनेक गड-किल्ले वसलेले आहेत. यातला हर्षगड उर्फ हरिहर गड ट्रेकर मंडळींचा अत्यंत आवडता गड. त्याला कारण ही तसच आहे. ते म्हणजे गडावर जाण्यासाठी उभ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. या पायऱ्या चढताना धडकी भरून चांगलीच दमछाक होते.

हरिहर गड दूरवरून एखाद्या पंख पसरवून झेप घेण्यास उत्सुक असलेल्या प्रचंड पक्ष्यासारखा दिसतो आणि आपण गड माथ्यावर पोहचलो की त्या पक्ष्याच्या पाठीवर बसून खालचं निसर्ग सौंदर्य न्याहाळत आहोत असं वाटतं.

महाराष्ट्रात साधारणतः ३५० किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याची काही न काही कथा आहे. जी त्याला एक वेगळी ओळख देते. त्यात काही सत्य तर काही दंतकथा आहेत. तर अशीच एक कथा हरिहर गडाविषयी देखील प्रचलित आहे.

गडावर मराठ्यांची सत्ता असतानाचीच ही कथा आहे. वर्ष कोणते होते त्याचा कुठं कसलाही उल्लेख आढळत नाही. गडावर जेमतेम ५०-७५ शिबंदी आणि इतर काही लोकं होते. अशात अचानक एक दिवस मोगलांनी गडाला वेढा घातला.

गड जास्त दुर्गम भागात नसल्याने आणि गडाचा आकार लहान व सुटा असल्याने वेढा घालणे सोपे गेले. गडावरील मावळ्यानी वेढा फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही आणि काही सैनिकांना जीवही गमवावा लागला होता. आधीच गडावरील माणसांची संख्या कमी त्यात काही मृत्युमुखी पडले.

त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. अशातच मोगल सुल्तान हल्ला करणार असल्याची बातमी गडावर येऊन धडकली. आता गडावर चिंतेचं वातावरण पसरलं होतं. गडावरील अन्नधान्य संपत आलं होतं. मुघलांची मगरमिठी गडाभोवती असल्याने रसद पोहचण मुश्किल झालं होतं.  काय करावं ? हल्ला झाल्यास कसा परतवून लावावा ? कोणाला काहीच सुचत नव्हतं.

तेव्हा गडावर एक आज्जीबाई होती. लहान मुलांच्या गोष्टीतल्यासारखीच एकदम चाणाक्ष अन चतुर. गडावरच्या माणसांची जेवणे झाली की त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या गडावरून खाली फेकून दिल्या जायच्या. गडावर हल्ला होण्याची बातमी आली त्या दिवशी सुद्धा सगळ्यांच जेवण झाल्यानंतर एक सांगकाम्या उष्ट्या पत्रावळ्या गोळा करून खाली फेकण्यास निघाला होता.

तेवढ्यात आज्जीचं लक्ष त्याच्याकडं गेलं तस तिने त्याला रोखलं. त्याला त्या उष्ट्या पत्रावळ्या खाली ठेवायला सांगितल्या आणि त्या मोजू लागली. त्या जेमतेम २५-३० होत्या. त्या जर तशाच खाली फेकल्या तर मोगल सैन्याला गडावर फार माणसं नसल्याचं कळेल आणि ते तात्काळ हल्ला करतील. म्हणून आज्जीने आणखीन २००-२५० पत्रावळ्या आणायला सांगितल्या. आधीच्या पत्रावळ्या त्यात मिसळवून त्या खरकट्या केल्या आणि फेकायला गडाच्याया कडावर गेली. आज्जी काय करतेय कुणाच्याच काही लक्षात येईना.

कडांवर उभे शिपाई आ वासून बघत होते. आज्जी काय करतेय ते कळायच्या आधीच त्यांच्या कानावर तिचा आवाज पडला. आज्जी म्हणाली,

“तोफा उडवा, बंदुकीचे बार काढा, दारूकाम करा, नगारे वाजवा.”

शिपायांनी हो नाही, हो नाही करता आज्जीची आज्ञा पाळून कामाला लागले. नगारेताशांनी दऱ्याखोऱ्या दुमदुमून गेल्या. कडकडणाऱ्या तोफांनी डोंगर हादरले. भर दुपारी चंद्रज्योतींनी गड उजळला.

दुसरीकडे आज्जी हळूहळू पत्रावळ्या खाली लोटत होती. जणूकाही पंगतीच्या पंगती उठत आहेत. अशातच मोगलांच्या वेढ्यात दोन बातम्या गेल्या की, मराठ्यांचे ताजेतवाने सैन्य कुठल्यातरी गुप्त मार्गाने गडावर पोहचले असून त्यांची संख्या जास्त असावी. त्याला पुरावा म्हणजे गडाच्या पायथ्याशी पडलेल्या उष्ट्या पत्रावळ्यांचा ढीगच्या ढीग. त्यामुळे मोगलांच्या वेढ्यात खळबळ उडाली होती.

आधीच ते महिनाभराच्या वेढ्याने कंटाळले होते. त्यातच गडावर मराठ्यांची नवी कुमक पोहचल्याची बातमी धडकली होती. महिनाभर वेढा घालून जीर्ण झालेलं सैन्य ताजातवान्या मराठा सैन्यांशी लढवणं म्हणजे मृत्यूला कवटाळन्या समान होतं. त्यामुळे मोगल सरदाराने वेढा उचलून काढता पाय घेण्यातच हुशारकी समजली. मोगल वेढा उचलून निघाले कळताच गडावर एकच हास्यकल्लोळ झाला. गडावरील माणसं आज्जीच्या युक्तीने भारावून जाऊन तिची वाह वाह करू लागले. आपला जीव वाचल्याने सगळ्यांनाच हर्ष झाला. त्यावरूनच गडाचं नाव हर्षगड पडल्याचं म्हटल जातं.

आता ही गोष्ट किती खरी किती खोटी आपल्याला माहित नाही. पण गडावरचे जुनेजाणते लोक ही गोष्ट सांगतात एवढ मात्र खरं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.