थरूर, दिग्विजय सिंह, मार्केडेय काटजू आणि आत्ता हरीष साळवे लोकं म्हणतायत ही तर, म्हातारचळ

आपल्या देशात अचानक सगळ्या डंगऱ्या लोकांना सोन्याचं दिवस आल्याती. घरात नातवंडांच्या फोनमध्ये किडं करणाऱ्या म्हाताऱ्याचं लहान पोरांपेक्षा जास्त कौतुक होवू लागलय. भारतीय जनजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असामान्य कर्तृत्व गाजवून म्हातार-कोतारी अचानक टॉपला जाऊ लागल्यात.

अनेक बुजुर्ग नेतेमंडळी आपण तरुण नेतृत्व म्हणून खपवून घेतली का नाय..?

९० वर्षांचा माणूस बॅग विकतो, निवडून येतो, पिच्चर काढतो सगळं सहन केलं, एकाने तर ९० बरस की बाली उमरमध्ये आपण समलिंगी असल्याचं घोषित करून धुराळा उडवला होता.

एकूण युवा पिढीचं होतं-नव्हतं फुटेज जेष्ठ नागरिकांनी खाऊन टाकलय.

इथवर पण पोरांनी सहन करून घेतलं. पण जिच्यासाठी जागून जागून एवढ्याशा स्क्रीनवर झूम करू-करू बिग बॉस बघिटली ती जसलीन मथारू हिनंसुद्धा अनुप जलोटा ह्या ६७ वर्षांच्या गायकाशी लगीन केलं तेव्हा पोरांचा संयम तुटला. दिग्विजय सिंह आणि थरूर साहेबांभोवती जमणारा घोळका आपल्याला आठ महिने जिम घासूनही जमत नाही या डिप्रेशनमध्ये कित्येकांनी आता टिप्स शोधाय सुरुवात केलीय.

इवूनजावून फक्त फेसबुक राहिलेलं. तिथं तरी नवीन पोरी बोलतील तर तिथही कॉम्पिटिशन आलय. ७४ वर्षांचे मार्कंडेय काटजू समस्त फेसबुकवरील जेष्ठ नागरिकांना बळ तर दिलयच पण तरुणांचा आख्ख मार्केट डाऊन करुन टाकलय.

पोरींच्या इनबॉक्सात गूळ पडून रातभर जागण्यावर तडाखा धरलेल्या सिंगल्या पोरांचा मार्कंडेय सायबांनी बाजार उठवला.

बरं ही म्हातारी काय साधी माणसं नाहीत, UPSC करायसाठी ज्यांची नावं तात्यांच्या ठोकळ्यात वाचली तीच माणसं आपल्या लव्ह-लाईफच्या जीवावर उठलेली बघून कित्येकांच्या पोटात शूळ उठलाय.

प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचे चेयरमन राहिलेले मार्कंडेय काटजू आपल्या फेसबुकच्या टाईमलाईनवर पोरींना सॉन्ग डेडिकेट करत सुटले आहेत. त्याच्याशिवाय आपल्या टाइमलाईनवर येणाऱ्या पोरींसाठी स्थळं बघण्याचाही उद्योग त्यांनी सुरु केलाय.

आणि त्याच्यात आता अजून बातमी आलीय की फॉरेन सर्व्हिस वाल्यांचे आयडॉल राहिलेले हरीश साळवे वयाच्या पासष्ठाव्या वर्षी पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

फेसबुकच्या उपाध्यक्षाची केस लढलेले साळवे साहेब आपल्या ३८ वर्षांच्या दीर्घ संसारातून सुट्टी घेत आहेत. जजच्या बॉडी लॅंग्वेजचा अभ्यास करून आपल्या अशिलाला न्याय मिळवून देणे हि त्यांची खासियत राहिली आहे. ते एकदा बॉम्बे हायकोर्टात केस लढत असतात तर १५ मिनिटांत लगेच इंग्लंडमध्ये क्वीन्स कौन्सिलला सल्ले देत असतात.

एवढ्या धांदलीच्या आयुष्यात त्यांनी अफाट यश मिळवले आहे आणि या यशावर तोरण लागलं आहे त्याच्या नव्या लगीनघाईचं. दोन वर्षापूर्वी त्यांचा बाप्तिस्मा झाला होता (ख्रिश्चन लोकांची मुंज) आणि तेव्हापासून ते नियमित चर्चला जात असतेत.

त्याच लंडन चर्चमध्ये ते २८ तारखेला नव्या बंधनात अडकणार आहेत.

लोकडाऊनमध्ये सगळं जग पेंगुळलं असताना साळवे साहेब मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट देऊन बाहेर पडले. त्यांची कन्यारत्ने साक्षी आणि सानिया ३७ अन् ३३ वर्षांच्या आहेत.

“कधीकधी माणसाला आयुष्यात पुढं बघून निर्णय घ्यावं लागत्यात. आमच्यात समेट घडणं शक्य नव्हतं त्याच्यामुळं आम्ही वायले झालो”

असं ते म्हणले खरे!

आणि हे होतं न होतं तेच क्वीन्स कौन्सिलमधल्या आपल्या सहकारी कॅरोलिन ब्रॉसर्ड यांच्याशी गाठ बांधणार आहेत.

“आमची वळख एका कला प्रदर्शनात झाली हुती. ह्या वर्षात आधीच माझी मोक्कार धांदल झालेली. पोरी माझ्यापासून लांब होत्या, त्यात घटस्फोट. त्याच्यात मला कॅरोलिन बाई ह्यांचा आधार मिळाला.”

असं ते म्हणले. कॅरोलिन बाई ह्या तिकडंच राहिलेल्या वाढलेल्या ५६ वर्षांच्या कलाकार आहेत. त्यांचंही आधी एकदा शुभमंगल झालं असून १८ वर्षाची पोरगीसुद्धा त्यांना आहे.

‘आमच्या दोघात चांगलं जुळतं’

साळवे साहेब पत्रकारांना भावुक होऊन सांगतात. तिला आणि मला नाटक आणि शास्त्रीय संगीतात चांगली रुची आहे. आम्ही आपलं साधंच लगीन करायचं ठरवलं आहे. शिवाय लग्नाला जास्त माणसं पण येणार नाहीत, जेमतेम १५ लोकांना जेवायला बोलवलंय. बेत सांगता सांगता साळवे साहेब अचानक खुलले आणि म्हणले, शिवाय आम्ही फादर-बिदर अशा कुणालाच नाय घेतलं ते बरंच झालं…

आठवलं म्हणून बरं, त्यांच्या कन्या साक्षी साळवे ह्या नामांकित लेखिका आहेत. त्यांच्या पुस्तकाचं उद्घाटन बच्चन सायबांनी केलं होतं आणि पुस्तकाचं नाव माहित्येका कायय,

The Big Indian Wedding

वोडाफोन, रिलायंस, मुकेश अंबानी, रतन टाटा अशा सगळ्यांच्या केस साळवे सायबांनी लढल्यात. आत्ता तुम्ही म्हातारचळ म्हणा नाहीतर अजून काही पण अभीं तो मैं जवान हू म्हणत सगळ्या सिंगल पोरांसमोर या माणसांनी तगड कॉम्पिटिशन उभा केलय हे मात्र नक्की. वेगळ्या मैदानातली हि केससुद्धा ते जिंकून नेतील अशी आम्हांला खात्री आहे…!

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.