अयोध्या, कुतुबमिनार ते ज्ञानवापी हिंदू पक्षासाठी लढणाऱ्या वकिलांची जोडी सगळीकडे सारखीच आहे…

मध्यंतरी सगळ्या देशात चर्चेचा मुद्दा ठरला होता तो, ज्ञानवापी मशिद आणि काशी विश्वेश्वर मंदिराचा. या मंदिराचा आणि मशिदीचा इतिहास काय आहे ? मूळ बांधणी कशाची आहे ? यावरुन चर्चा तर झाल्याच, पण प्रकरण कोर्टातही गेलं. ज्ञानवापी मशिदीच्या आवारात असलेल्या हिंदू देवतांची पूजा करायची परवानगी ५ हिंदू महिलांनी मागितली, कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली.

कोर्टानं मशिदीचं व्हिडीओ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. हे सर्वेक्षण पार पडल्यानंतर हिंदू पक्षानं मशिदीच्या वझुखान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा केला, तर मुस्लिम पक्षानं हे शिवलिंग नसून कारंजं असल्याचा दावा केला.

त्यानंतर कोर्टानं ही जागा सील करण्याचे आदेश दिले. मे महिन्यात या संबंधीच्या हालचालींना वेग आला होता. सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केलं.

वाराणसी जिल्हा कोर्टाचे मुख्य न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेष यांनी १२ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत हिंदू पक्षाचे युक्तिवाद ग्राह्य धरले, तर मुस्लिम पक्षाचे युक्तिवाद फेटाळले आहेत. सोबतच १९९१ च्या ‘प्लेसेस ऑफ वरशिप ऍक्ट’मध्ये हे प्रकरण येत नाही, असंही कोर्टानं सांगितलं.

आता २२ सप्टेंबरला प्रकरणाची वाराणसी जिल्हा कोर्टात सुनावणी होणार आहे.

न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेष यांच्यासमोर जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरु होती, तेव्हा कोर्टात फक्त ६२ लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी होती. यात ज्ञानवापीच्या आवारात पूजा करण्यासाठी परवानगी मागणारी याचिका करणाऱ्या मुख्य याचिकाकर्त्या राखी सिंग अनुपस्थित होत्या, मात्र दोन जणांच्या उपस्थितीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं, ते म्हणजे हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील हरीशंकर जैन आणि विष्णू शंकर जैन ही बाप-लेकाची जोडी.

फक्त ज्ञानवापीचंच प्रकरण नाही, तर अयोध्या, कुतुबमिनार, ताजमहाल आणि अशाच प्रार्थनास्थळांच्या वादांच्या प्रकरणात तुम्हाला हरी शंकर जैन आणि विष्णू शंकर जैन ही नावं हमखास दिसतात. कारण मंदिरं उध्वस्त करुन तिथं मशीद बांधण्यात आली आहे, असा दावा करणाऱ्या देशातल्या सहा प्रकरणांमध्ये हिंदू पक्षाची बाजू हेच दोन वकील मांडत आहेत.

हरी शंकर जैन यांचा इतिहास काय सांगतो…

तारीख १७ मे, सुप्रीम कोर्टात ज्ञानवापीवर सुनावणी होणार होती. भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि सीएस वैद्यनाथन, रणजित कुमार हे ज्येष्ठ वकील कोर्टात हिंदू पक्षाच्या बाजूनं उभे होते, पण तरीही सुनावणी पुढं ढकलण्यात आली. 

कारण काय ? 

तर विष्णू शंकर जैन यांनी सांगितलं की, ‘माझे सहकारी आणि वडील हरिशंकर जैन यांची प्रकृती बरी नाही, त्यामुळं ते कोर्टात उपस्थित राहू शकले नाहीत. कोर्टानं सुनावणी पुढे ढकलावी.’ कोर्टात इतके मोठमोठे वकील उभे असताना, हरिशंकर जैन उपस्थित नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढं ढकलली होती. यावरुनच त्यांच्या अनुभवाचा अंदाज येतो.

हरिशंकर जैन पहिल्यांदा चर्चेत आले ते बाबरी-राम जन्मभूमी या वादामुळे. “१९९३ मध्ये हरिशंकर जैन कोर्टात गेले आणि त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून आमची देवता भुकेली आहे. मशिदीचे दरवाजे उघडून हिंदूंना पूजेची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. तेव्हा न्यायाधीशांनी मशिदीचे दरवाजे उघडण्यास परवानगी दिली आणि या प्रकरणाची दिशाच बदलली. यानंतर हरिशंकर जैन हे रामजन्मभूमीच्या टीमचेच सदस्य झाले,” असं विधान रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कमिटीचे महासचिव संपत राय यांनी केलं होतं.

२०१९ मध्ये कोर्टानं रामजन्मभूमी बाबतचा निकाल दिला, त्याआधी हरिशंकर जैन वेगवेगळ्या माध्यमांमध्ये रामजन्मभूमीबाबत हिंदू पक्षाची बाजू मांडताना दिसत होते.

पण फक्त अयोध्या प्रकरणावरच ते थांबले नाहीत. त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव विष्णू शंकर जैन यांनी फक्त २०२१ या एका वर्षात ज्ञानवापी प्रकरणात एकूण सात याचिका दाखल केल्यात. तर ज्ञानवापी सोबतच मथुरेचं शाही ईदगाह प्रकरण, लखनौचं तिलेवाली मशीद प्रकरण, मध्यप्रदेशमधल्या धारचं भोजशाला प्रकरण, आग्र्याचा ताजमहाल आणि दिल्लीचा कुतुबमिनार या सहा प्रकरणात हिंदू पक्षाची बाजू ही बाप-लेकाची जोडीच लढत आहे.

या दोघांचं नेमकं लक्ष्य काय आहे ?

विष्णू शंकर जैन एका ठिकाणी बोलताना म्हणाले होते, “आम्ही अशा प्रकरणाच्या एकूण १०० पेक्षा जास्त केसेस लढत आहोत. आम्हाला कायदेशीर जागृतीमधून हिंदू क्रांती घडवायची आहे. जेव्हा लोकांपर्यंत हे मुद्दे पोहचतील तेव्हा हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याचं लक्ष्य गाठता येईल. जिथं जिथं अशी प्रकरणं असतील, तिथं आम्ही नक्कीच लढू.”

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, गेली २५-३० वर्ष प्रलंबित असलेल्या, जैन पिता-पुत्रानं दाखल केलेल्या वादग्रस्त याचिकांवर कोर्टानं गेल्या वर्षभरात सुनावणी करण्यास सुरुवात केली आहे. यावर विष्णू शंकर जैन यांनी, “आम्ही या मोठ्या लढायांमधल्या छोट्या छोट्या विजयांवरही समाधानी आहोत. यामुळं अनेकांना अशाच लढाया लढण्याचं बळ मिळेल.” अशी प्रतिक्रिया दिली होती.

हरिशंकर जैन यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्माभोवतीच फिरणाऱ्या केसेस आहेत, तर विष्णूशंकर जैनही बहुतांशपणे याच मार्गावर आहेत. 

विष्णू शंकर जैन यांनी आपलं कायद्याचं शिक्षण पुण्याच्या बालाजी कॉलेजमधून पूर्ण केलं होतं. अगदी १९९३ मध्ये रामजन्मभूमी प्रकरणापासून ते आपल्या वडिलांसोबतच कोर्टात केसेससाठी उभे राहत आहेत. त्यामुळेच अयोध्येपासून ते अगदी ज्ञानवापीपर्यंत सत्तरीला पोहोचलेले हरिशंकर जैन आणि चाळीशीला पोहोचलेले विष्णू शंकर जैन यांची नावं कॉमन आहेत.

मग या दोघांचं काही पॉलिटिकल कनेक्शन आहे का ?

१९९९ मध्ये हरिशंकर जैन यांनी अमेठी मतदारसंघातून सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण हरिशंकर जैन यांनी सोनिया गांधी यांच्या निवडून येण्याला आव्हान देणाऱ्या तीन याचिका दाखल केल्या.

 त्यांचा पहिला दावा होता की, सोनिया गांधी या मूळ भारतीय नागरिक नसून इटालियन नागरिक आहेत, त्यामुळे त्यांची निवड वैध असणार नाही. दुसरा दावा होता की, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विवाहाची वैधता संपली आहे, आणि तिसरा दावा होता की, ज्या कलम ५ (१) (सी), सिटीझन शिप ऍक्ट १९५५, नुसार सोनिया गांधी यांनी भारताचं नागरिकत्व मिळवलं त्याची वैधता संपली आहे. 

मात्र कोर्टानं त्यांच्या या तिन्ही याचिका फेटाळून लावल्या.

इतकंच नाही, तर हरिशंकर जैन आणि विष्णू जैन हे सनातन संस्था, भगवा रक्षा वाहिनी,हिंद साम्राज्य पक्ष या संघटनांशी जोडले गेलेले आहेत. विष्णू शंकर जैन हे हिंदू फ्रंट फॉर जस्टीसचे अधिकृत प्रवक्तेही आहेत. सनातन संस्थेनं २०१९ मध्ये हरिशंकर जैन यांचा धर्मयोद्धा म्हणून सत्कार केला होता.

पण या सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, तर अयोध्या ते ज्ञानवापी या भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाच्या ठरणाऱ्या केसेसमध्ये येणारं त्यांचं नाव.

म्हणूनच आगामी काळात जशा या केसेस महत्त्वाच्या ठरणार आहेत, तशीच हरिशंकर जैन आणि विष्णू शंकर जैन ही वकील बाप-लेकाची जोडी सुद्धा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.