फाळकेंच्याही १४ वर्षे आधी सावे दादांनी भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली होती

भारतातील पहिला चित्रपट कोणता? असा प्रश्न उपस्थित झाला की, आपसूकच ‘राजा हरिश्चंद्र’ हे नाव तोंडून निघतं.  ‘भारतात पहिल्यांदा दादासाहेब फाळकेंनी  चित्रपट निर्मिती केली. यासाठी दादासाहेब फाळकेंना सहा महिने कालावधी लागला. ३ मे १९१३ रोजी मुंबईच्या त्यावेळच्या सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

हा चित्रपट एकूण २३ दिवस चालला’, इथपर्यंतच आपल्याला भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास माहितीये.

पण तसं नाय भिडूंनो ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाच्या आगोदरच एका हरिश्चंद्रांनी भारतात चित्रपट निर्मितीची मुहूर्तवेढ रोवली होती. होय हेच खरंय. दादासाहेब फाळकेंच्या १४ वर्षे अगोदर भाटवडेकर दादांनी लघुपटाची निर्मिती करून चित्रपट निर्मितीला सुरुवात केलेली.

भारतात पहिला लघुपट निर्माण करणारे दादा म्हणजेच हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर. भाटवडेकरांना आदराने दादा म्हटल जातंय. त्यांनी दासाहेब फाळकेंपूर्वी मुंबईत लघुपटांची निर्मिती करून भारतात चित्रपटसृष्टीला सुरवात केली होती. त्यामुळंच अजून पण चित्रपट सृष्टीत भाटवडेकर दादांचं नाव आवर्जून घेतल जातंय. विशेष म्हणजे भाटवडेकर दादा हाडाचे फोटोग्राफर होते बरं.

हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावे दादांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात १५ मार्च १८६५ रोजी झाला. ऐन तारुण्यात त्यांनी छायाचित्रकाराचा व्यवसाय केला होता. मुंबईतील सँडहसर्ट ब्रिजजवळ सावे दादांनी आपला फोटो स्टुडिओ सुरु केला होता.

सावे दादांनी पहिल्यांदा मुंबईतल्या हँगिंग गार्डन मध्ये पुंडलिक दादा आणि कृष्णा न्हावी या दोन पैलवानांच्या कुस्तीचं चित्रीकरण केलं. त्यानंतर माकडवाला आणि त्याच माकड याच चित्रीकरण केलं.

पण दादांना दोन्ही चित्रपटांची रिळे डेव्हलपिंग प्रक्रियेसाठी लंडनला पाठवावी लागली होती. निश्चितच ही प्रक्रिया साधी नव्हती. तरीही सावे दादांनी चित्रपट निर्मितीचं आव्हान यशस्वीरित्या पेलत नोव्हेंबर १८९९ मध्ये आपले दोन्ही चित्रपट मुंबईत प्रदर्शित केले. आणि अशा तर्हेनं सावे दादा भारताचे आद्य चित्रपट निर्माते ठरले.

मुंबईतल्या पॅरी थिएटर मध्ये हे लघुपट ३ रुपये तिकीट आकारून प्रदर्शित केले गेल्यानंतर मिळालेल्या पैश्यातून सावे दादांनी चित्रपट निर्मितीस आवश्यक ती यंत्रसामग्री विकत घेतली होती. अपोलो बंदर इथं सर एम. एम. भावनगरी यांच आगमन आणि खोजा समाजानं त्यांचं केलेलं स्वागत चित्रित करून सावे दादांनी ‘द लँडिंग ऑफ सर एम. एम. भावनगरी’ हा चित्रपट बनवला होता.

महान गणिततज्ञ् रघुनाथ परांजपे ‘ रॅग्लर ’ ही पदवी संपादन करून भारतात परतले तेंव्हा उद्योजक नरोत्तम मोरारजी गोकुळदास यांनी आपल्या पेडर रोड इथल्या निवासस्थानी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला गोपाळ कृष्ण गोखले आणि सर भालचंद्र भाटवडेकर देखील उपस्थित होते.

सावे दादांनी या सत्कार समारंभाचं चित्रीकरण करून ‘द रिटर्न ऑफ रॅग्लर परांजपे’ या नावाचा चित्रपट बनवला. हा चित्रपट १९०२ च्या फेब्रूवारी महिन्यात दाखवला गेला. हाच चित्रपट भारतात तयार झालेला आणि भारतीयाने बनवलेला पहिला माहितीपट ठरला!

१९०३ च्या जानेवारी महिन्यात सातव्या एडवर्डला भारताचा राजा म्हणुन घोषित करण्यात आल होत. तेंव्हा तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झननं राज्यारोहण सोहळा साजरा करण्यासाठी दिल्लीत दिल्ली दरबार भरवला होता. त्यावेळी दरबाराच्या चित्रीकरण करण्याची जबाबदारी सावे दादांवर सोपविण्यात आली होती. हीच ब्रिटिश सरकारनं सावेदादांना त्यांच्या कर्तृत्वाची दिलेली पावती होती!

सावे दादा यांनी भारतात शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंट्री फिल्म बनवण्याची सुरवात केली. संपूर्ण लांबीचा फिचर फिल्म बनवण्याची त्यांची इच्छा होतीच.

सतत चित्रपट निर्मितीचे प्रयोग पार पाडणाऱ्या दादांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर देखील कथापट बनवण्याचा ध्यास घेतला होता. पण खाजगी व व्यावसायिक जीवनात खंबीर साथ देणाऱ्या धाकट्या भावाच्या अकाली मृत्यूनं दादा हताश झाले. या धक्क्याने त्यांनी आपली चित्रनिर्मिती बंद केली. 

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना परिस्थितीमुळे आपला ल्युमिए कॅमेरा ७०० रुपयांना विकावा लागला.

हा फक्त सावे दादांचा कॅमेरा नव्हता तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार होता. पुढे सावे दादांनी रचलेल्या पायावर दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा सिनेमा बनवून कळस चढवला. भारतीय सिनेमासृष्टीचीसुरवात या मराठी माणसांनी शंभर वर्षांपूर्वी केली.

१९५६ मध्ये मुंबईत भारतीय बोलपटांचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यावेळी सावे दादांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दोनच वर्षांनी वयाच्या ९१ वर्षी २० फेब्रुवारी १९५८ रोजी त्यांचं  निधन झालं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.