राजकारणाच्या दणक्यात काँग्रेस पुन्हा एका राज्यात फुटीच्या मार्गावर निघाली आहे!

देशात काँग्रेसची ज्याप्रकारे वाताहात झाली आहे ती भरुन निघण्याजोगी नाही. बऱ्याच राज्यांमध्ये काँग्रेसची परिस्थिती खूपच ढासळली आहे आणि ढासळत ही आहे. त्यात भरीस भर म्हणून आता हरियाणात काँग्रेस फुटीचा गोंधळ सुरु झालाय.

वाद सुरूय माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा आणि हरियाणा कॉंग्रेसच्या अध्यक्षा कुमारी सैलजा यांच्यात.

भूपिंदरसिंग हुड्डांच्या समर्थकांनी कुमारी सैलजा विरोधात मोर्चा उघडला असून कॉंग्रेस हायकमांडला आपला मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. २०२४ च्या निवडणुका होण्यास अजून तीन वर्षे बाकी आहेत. पण दोन दिग्गजांमधील सुरू असलेल्या या संघर्षामुळे कॉंग्रेस हायकमांडची कोंडी झाली आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात हुड्डा समर्थक आणि कॉंग्रेस हायकमांड यांच्यातच तणावाचे वातावरण तयार झालंय.

२०१९ च्या निवडणुकांपूर्वीही असेच तणाव निर्माण झाले होते. आता २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पण अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या. इतक्या मोठ्या संख्येने जागा येतील हे कॉंग्रेसवाल्यांनाही माहित नव्हते.  हुड्डाच्या समर्थकांची संख्या २४ होती. तर सैलजा यांच्याकडून तीन आमदार आहेत. यात किरण चौधरी, कुलदीप बिश्नोई आणि चिरंजीव जे कॅप्टन अजय यादवांचे सुपुत्र आहेत.

किरण चौधरी वगळता कुलदीप आणि चिरंजीव हे हुड्डा समर्थक आमदारांच्या सभांमध्ये जातात. पण जेव्हा विषय नेतृत्वाचा येतो तेव्हा हे आमदार वेगळे होतात. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी हुड्डा समर्थकांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांना पदावरून हटवण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. त्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सैलजा यांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली.

जर कॉंग्रेस हायकमांडने हुड्डांच्या समर्थकांचे म्हणणे ऐकल नाही तर हरियाणाच्या राजकारणात काहीही शक्य आहे.

हुड्डा यांनी कुमारी सैलजा यांना २०१९ साली अध्यक्ष बनविण्यास सहमती दर्शविली होती. परंतु जसजसा  २०२४ च्या निवडणुकांचा काळ जवळ येत आहे तसतसं सैलजा संघटनेत सक्रिय नसल्याचा आरोप होतोय. तसंच आमदारांना सोबत न घेण्याच्या आरोपाचा सामना पण त्यांना करावा लागतोय. त्याआधारेच  हुड्डा समर्थक आमदारांनी सैलजा यांना पदावरून काढून टाकण्यासाठी जोर लावलाय.

कॉंग्रेस मध्ये भूपिंदरसिंग यांचा खुट्टा मजबूत मानला जातो. त्यांचा मुलगा दीपेंद्रसिंग हूडा हा देखील हरियाणाच्या राजकारणातला प्रसिद्ध चेहरा आहे.

पण सोनिया गांधी यांच्या अगदी जवळ असलेल्या सैलजाचे राजकीय वजन कोणत्याही प्रकारे दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही.

सैलजाच्या बाजूने असणारे कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असलेले किरण चौधरी यांची दिल्ली दरबारात चांगलीच ओळख आहे. तर माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा कुलदीप बिश्नोई हे राहुलच्या मित्रमंडळात आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादवांचे साडू असल्यामुळे कॅप्टन अजय यादव थेट सोनिया गांधींच्या नजरेत असतात. रणदीपसिंग सुरजेवाला यांचे वाढलेले राजकीय बळ पण कुणापासून लपलेले नाही.

अशा परिस्थितीत कॉंग्रेसमध्ये सुरु असलेलं बंड केवळ संघटनेच्या सक्रियतेशी संबंधित नसून मुख्यमंत्रीपदाची शर्यत म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. हुड्डा समर्थकांचे मत आहे की केवळ त्यांच्या नेत्याच्या नेतृत्वातच कॉंग्रेस हरियाणामधील निवडणुका जिंकू शकेल. तर कॉंग्रेसचे अन्य दिग्गज नेतेही स्वतःच्या नेतृत्वाबाबत हाच दावा करत आहेत.

आणि अशा परिस्थितीत हुड्डा यांना पाठिंबा देण्याऐवजी जर काँग्रेस हायकमांडने सैलजाला पाठिंबा दिला तर हुड्डा नवा पक्ष स्थापन करण्यासही मागे पुढे बघणार नाहीत. असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. 

हरियाणात नवा पक्ष स्थापन होण्याच्या घटना याआधी ही घडल्या आहेत. देवीलाल, बन्सीलाल आणि भजनलाल यांनी त्यावेळी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता.

हरियाणाच्या राजकारणात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन पक्षाची स्थापना करण्याचा मोठा इतिहास आहे. कॉंग्रेसपासून विभक्त होऊन हरियाणाच्या राजकारणात आतापर्यंत नवे तीन राजकीय पक्ष स्थापन झाले आहेत.

चौधरी देवीलाल यांनी लोकदल, बन्सीलाल यांनी हरियाणा विकास पार्टी आणि भजनलाल यांनी हरियाणा जनहित कॉंग्रेसची स्थापना केली. यातल्या चौधरी देवीलाल यांनी १९७१ मध्ये कॉंग्रेसची साथ सोडली होती.

हरियाणा विकास पार्टी स्थापण्यापूर्वी चौधरी बन्सीलाल दोनदा मुख्यमंत्री होते. बन्सीलाल यांचे त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचा मुलगा संजय गांधी यांच्याशी चांगले संबंध होते. नंतर बन्सीलाल पक्षविरोधी कार्यात गुंतल्याचे आरोप होऊन कॉंग्रेसमधून हद्दपार झाले. १९९६ मध्ये बन्सीलाल यांनी हरियाणा विकास पार्टीची स्थापना केली. आठ वर्षानंतर २००४ मध्ये हरियाणा विकास पार्टी पुन्हा कॉंग्रेसमध्ये विलीन झाली.

चौधरी भजनलाल तीन वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते. २००५ मध्ये कॉंग्रेसने भजनलाल यांना पुढं करुन हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली होती, पण मुख्यमंत्री बनविताना भुपिंदरसिंग हुड्डा यांना मुख्यमंत्री बनवले. यामुळे भजनलाल यांना राग आला आणि त्यांनी २००७ मध्ये कॉंग्रेस सोडली आणि हरियाणा जनहित कॉंग्रेस (एचजेसी) ची स्थापना केली. आता हरियाणा जनहित कॉंग्रेसचे पण कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण झाले आहे.

हे हि वाचा भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.