पोलीस अधिकाऱ्याचं कोरोना मॅनेजमेंट कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाचा भाग झालाय…

राज्याच्या पटलावर सतत या ना त्या कारणावरून चर्चेत राहणार्‍या बीड जिल्हा कोरोना काळात मात्र एका गोष्टीमुळे चांगलाच चर्चेत आला होता, ती गोष्ट म्हणजे तेथील प्रशासकीय कार्यप्रणाली !

एरवी मागास जिल्हा म्हणून नेहेमीच बीड च नाव घेतलं जातं, तेथील रस्त्यांची समस्या तर बोलूच नये. बाकी काही का असो मात्र कोरोनाच्या लढ्यात बीडने बाजी मारली आहे.

एकंदरीत सर्वच यंत्रणा कामाला लागली त्यात आरोग्य विभाग सांभाळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनीही कोरोना संकटावर मात करण्याचे व्यवस्थापन करून ठेवले. दुसरीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी झेडपीची यंत्रणा कामाला लावली. तर तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी जिल्ह्यात ऊसतोड कामगारांसाठी नियोजन लावले होते.

उसतोड कामगार म्हणलं कि सर्वाधिक स्थलांतरीत असणार्‍या बीड जिल्ह्याचं नाव निघतं,

आतापर्यंतच्या बीडच्या प्रशासनाच्या योग्य त्या नियोजनामुळे, सर्वाधिक स्थलांतरीत असणार्‍या बीड जिल्ह्यात पहिल्या लाटेत एकही कोरोनाबाधीत आणि संशयित रुग्ण सापडलेला नाही. आणि जरी कुणी सापडलाच तर जिल्हा प्रशासनाने बी प्लॅन देखील तयार होता. जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाचं नेतृत्व करत होते,

परंतु सर्वात कौतुकाचा विषय ठरला तो काटेकोरपणे अंमलबजावणी करणारे तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार ह्यांचा !

त्यांनी केलेलं स्थलांतरित उसतोड कामगारांसाठीचं नियोजन वाखाणण्याजोगं होतं.

जिल्हा सीमेवरील कायदा सुव्यवस्था स्थिती पाहणे, ऊसतोड कामगारांना काही अडचणी आहेत का, पोलिसांना व इतर अधिकाऱ्यांना काही अडचणी आहेत का, या उद्देशाने त्या त्या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे.

त्यावेळच्या कामकाजाच्या समस्या समजून घेऊन मार्गदर्शन करणे, तसेच कामगारांना कोरोनापासून सुरक्षिततेबाबत सूचना देणे. अशा कामगारांना प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील चेकनाका पॉईंटला दररोज भेट देणे.

हर्ष पोद्दार यांचे हेच व्यवस्थापन इतके गाजले कि त्याचा समावेश कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात झाला.

ऑक्टोबर २०२० मध्ये ते कोरोनाच्या काळात बीड जिल्ह्यात ते कार्यरत पहिल्या असताना पहिल्या लाटेत हर्ष पोद्दार यांनी कोरोनाकाळात केलेले पोलिसिंग जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कस्थित कोलंबिया स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्सच्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा विषय झाला आहे.

त्यांच्या लॉकडाऊनमधील नियोजनामुळे बीडमधील १ लाख ६० हजार कामगारांची ‘घरवापसी’ झाली तर ७० हजार कामगार कसल्याही प्रकारची जीवितहानी न होता आपआपल्या कुटुंबात सुखरूप परतले. 

महत्वाचं म्हणजे ३१ मे रोजी पहिला लॉकडाऊन अधिकृतरीत्या संपेपर्यंत एकही कोरोना संक्रमिताची जिल्ह्यात नोंद नव्हती.

बीड जिल्ह्यातून आजूबाजूच्या साखरपट्ट्यात तसेच उत्तर कर्नाटकमध्ये गेलेले ७० हजार ऊसतोड कामगार एप्रिल-मे २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे परतले.

परंतु त्याच दरम्यान सीमेवर असणारे पुणे व औरंगाबाद हे जिल्हे कोरोना हॉटस्पॉट बनले होते. या भागातील मजूर किंव्हा तिथे जाणाऱ्या मजुरांकरवी कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून अगदी काटेकोर नियोजन लावले.

बीडच्या आजूबाजूंच्या ६ जिल्ह्यांना जोडले जाणारे छोटे-मोठे रस्ते शोधून सील करण्यात आले.

जिल्ह्यात परत घेण्यात येणाऱ्या मजुरांना सीमेवरच चाचणी करून क्वारंटाईन करणे, तसेच या कामासाठी  जिल्हा पोलीस मुख्यालयात कंट्रोल उभारून हे काम चालवले गेले.  कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेलमार्फत लोकांना इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात येत होते. त्यांनी त्यांच्या मदतीला गावाचे सरपंच, पोलीस पाटील, आणि ग्रामसेवकांना देखील हाताशी घेतलं आणि गावोगावी जाऊन हे कामकाज पाहिलं.

आणखी एक महत्वाचं म्हणजे अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसाठी आलेल्या अर्जाला अर्ध्या तासात सुविधा पुरविण्याचे काम केलं.  

हर्ष पोद्दार यांनी आणखी एक शक्कल अशी लढवली कि, या योजनेची अंमलबजावणी, नागरिकांनी या  नियमांना गांभीर्याने घ्यावे म्हणून त्यांनी त्या-त्या समुदायांच्या पंडित, महाराज,मुल्ला-मौलवी, धम्मगुरू इत्यादींकडून काही कोरोन जनजागृती चे व्हिडीओ करवून घेतले.

त्याचा परिणाम असा झाला कि, कोणत्याही धर्माचा सण असू देत नागरिकांनी मात्र नियमांचे पालन केले.     

कोण आहेत हर्ष पोद्दार?

हर्ष पोद्दार हे मुळचे बिहारचे आहेत. कोलकत्त्या मध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर परदेशात शिक्षणासाठी गेले. पैशाच्या जोरावर नाही तर त्यांच्या शैक्षणिक आणि इतरही उपक्रमात त्यांचे यश पाहून त्यांना परदेशातल्या युके आणि युएस मधून १३ महाविद्यालयातून प्रवेशाच्या ऑफर्स आल्या होत्या.

मग हर्ष यांनी इंग्लंड मधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची निवड केली. त्यानंतर त्यांनी तिथेच दीड वर्ष नोकरी केली, मात्र आपल्या देशातच समाजपयोगी काम करावे म्हणून त्यांनी अधिकारी व्हायचं ठरवलं आणि त्यांनी भारतातून पुस्तके मागवले आणि इंग्लंडमध्येच राहून अभ्यास केला.

लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेत यशस्वी झाले मात्र याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले तरी देखील तितक्याच जोमाने त्यांनी मुलाखतीची प्रक्रिया पार पाडली आणि देशात मुलाखतीत प्रथम आले होते. 

सध्या ते अमरावतीमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून कार्यरत आहेत.   

अमरावतीमध्ये देखील त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. तिथे राज्य राखीव पोलीस दल कॅम्प परिसरात त्यांच्या नियोजनामुळे कोरोनाचे संक्रमण च झाले नाही. तसेच त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोस चे लसीकरण ९०% टक्क्यांपर्यंत आणले आहे.

पहिल्या लाटेच्या दरम्यान हर्ष पोद्दार हे बीड मध्ये तर दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ते अमरावतीमध्ये दाखल झाले आणि अमरावतीत दुसऱ्या लाटेने एन्ट्री मारली आणि तेवढ्यात पोद्दार यांनी लागलीच कॅम्प परिसरात पहिल्या लसीचे १००% लसीकरण पूर्ण केले आणि दुसऱ्या डोसचे ९०%लसीकरण पूर्ण केले होते.

या परिसरात कोरोनाग्रस्त होते परंतु एकही पेशंट हा गंभीर नव्हता कि दगावला नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.