हर्षद मेहताने प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवलं, त्याच्या सुटकेसमध्ये १ कोटी रुपये होते !
साल १९९२ भारतातल्या सगळ्यात मोठ्या स्कॅममुळे थरारून उठलं होतं, जवळपास शेअर मार्केटचे जवळपास १ लाख कोटी रुपये बुडले होते. या मागे होता एक माणूस नाव ‘हर्षद मेहता.’
२३ एप्रिल च्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर तीन कॉलम बातमी प्रसिद्ध झाली होती. तिचा मथळा होता.
‘भारतातील सर्वात मोठा घोटाळा’
५०० कोटी रुपयांची गडबड ; पैशाची भरपाई करण्याबद्दल स्टेट बँकेचा ब्रोकरला आदेश.
त्यानंतर त्यासंदर्भातल्या बातम्या रोजच छापून येवू लागल्या. पंचवीस वर्षांपूर्वी अशा गलेलठ्ठ रकमांचे घोटाळे लोकांना नवीन होते. त्यानंतर शेअरबाजार एकदम गडगडला. बाजारातली मंदी हर्षदमुळेच आलं आहे या शंकेमुळे रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर जानकी रमण यांची समिती बसवण्यात आली होती. त्यांनी ३० एप्रिल रोजी जाहीर केलं,
४ हजार रुपयांपेक्षा अधिक मोठा घोटाळा झाला आहे.
सीबीआयच्या मते हा घोटाळा ८ हजार कोटींपेक्षा देखील मोठा होता. ४ जूनला त्याला त्याच्या सहकाऱ्यांसह अटक करण्यात आली. पण हर्षद मेहता हा या खेळातला छोटा प्यादा आहे यात अनेक मोठमोठे लोक यात अडकले आहेत अशी चर्चा सुरु झाली.
हर्षद मेहता जवळपास १११ दिवस पोलीस कस्टडीमध्ये होता. पुढे त्याला जामीन मिळाला. त्याची केस लढत होते तेव्हाचे भारतातले सर्वात मोठे क्रिमिनल लॉयर राम जेठमलानी.
भूपेन दलाल संचालक असलेली बँक ऑफ कराड, मेट्रोपोलिटन को ऑपरेटिव्ह बँक, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, कॅनरा बँक अशा अनेक बँकांचे अधिकारी हर्षद मेहता बरोबर या व्यवहारात सामील असलयाचे समोर येत होते. कॅनरा बँकेचे माजी अध्यक्ष रत्नाकर आणि नियोजन मंडळचे सदस्य व्ही.कृष्णमूर्ती हे देखील हर्षदच्या जाळ्यात अडकले असल्याचं उघडकीस आलं.
सगळ्यात मोठा बॉम्ब पडला जेव्हा हर्षद मेहताने आरोप केले कि त्याने खुद्द तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंहराव यांना १ कोटी रुपयांची कॅश निवडणूक निधी साठी दिली होती. त्याचा दावा होता कि सुटकेस मध्ये भरून हे पैसे पंतप्रधान निवास मध्ये देण्यात आले.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट पंतप्रधानांवर लाचखोरीचे आरोप झाले होते.
हर्षद मेहताने फक्त आरोप केला नव्ह्ता तर तसे शपथपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्याने त्यात लिहिलं होतं की १९९१ सालच्या नोव्हेम्बर महिन्यात ७ रेस कोर्स रोड या पंतप्रधान निवासाच्या बंगल्यात तो एका सुटकेसमध्ये ६७ लाख रुपये भरून घेऊन गेला आणि त्याने ते नरसिंह राव यांचे खाजगी सचिव राम खांडेकर यांना दिले. दुसऱ्या दिवशी उरलेले ३३ लाख रुपये त्याने त्यांच्या कडे सोपवले. असे एकूण १ कोटी रुपये पंतप्रधानांच्या सांगण्यावरून लाच दिली असा त्याचा दावा होता.
तो म्हणाला कि मी त्या दिवशी पंतप्रधानांना समजावून सांगितलं की, शेअर मार्केटमध्ये पैसे मिळवणे किती सोपं आहे.
नरसिंह राव यांच्यावर आरोप झाल्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. विरोधी पक्षांनी संसद डोक्यावर घेतली. मीडियावर यावरून चर्चा सुरु झाल्या.
काँग्रेसने मात्र या आरोपांचे खंडन केले. हर्षद मेहता एवढ्या मोठ्या स्कॅममध्ये अडकल्यामुळे थेट पंतप्रधानांना आरोप करून सिस्टिमला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं गेलं. पंतप्रधान कार्यालयाकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आलेच शिवाय दावा केला की,
१ कोटी रुपये हे सुटकेस मध्ये मावूच शकत नाही.
१६ जून १९९३ रोजी हर्षद मेहताने आपले वकील राम जेठमलानी यांच्या सोबत एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यात तो दोन भल्या मोठ्या सुटकेस घेऊन आला होता. यात एक कोटी रुपये होती. त्याने पत्रकारांना दाखवून दिलं कि १ कोटी रुपये हे सुटकेस मध्ये मावू शकतात.
राम जेठमलानी यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही पंतप्रधानावरचे आरोप सिद्ध करू शकता का तर यावर ते म्हणाले,
हमारे पास इतने सबूत हैं कि अग्नि परीक्षा से भी बखूबी गुजर सकते हैं. जरूरत पड़ेगी तो हम प्रमाणों को पेश कर देंगे.
या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेठमलानी यांच्या मुलाने ऑडिओ कॅसेट देखील झळकवले ज्यात सांगितलं होतं हर्षद मेहता आणि सुनील मित्तल यांच्यातील टेलिफोन रेकॉर्डिंग होतं. यात मेहता हा सुनील मित्तल याना खांडेकरांना भेटून पैसे पाठवून देण्याबद्दल सांगत होता.
असं म्हटलं गेलं कि अल्प मतात असलेल्या नरसिंह राव यांनी आपले पंतप्रधान पद वाचवण्यासाठी झारखंड मुक्तिमोर्चाच्या खासदारांना पैसे देऊन खरेदी केलं होतं आणि त्यासाठीच हे पैसे त्यांनी हर्षद मेहतांकडून गोळा केले होते.
फक्त इतकेच नाही तर नरसिंह राव यांचे सुपुत्र प्रभाकर राव हे ज्या संचालक असलेल्या गोल्ड स्टार स्टील अँड अलॉय कंपनीला हितेन दलाल यांनी दोन कोटी रुपये दिले होते जो हर्षद मेहता यांचा सहकारी होता.
पंतप्रधानांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. या खटल्याची चौकशी जवळपास दहा वर्षे चालली. ३१ डिसेंबर २००१ रोजी हर्षद मेहताचा पोलीस कस्टडीत असतानाच मृत्यू झाला. एकूणच या प्रकरणातील खरं खोटं कधी बाहेरच आलं नाही. पंतप्रधान दोषी होते कि नाही याचा खुलासा झालाच नाही.
हे ही वाच भिडू.
- ५,००० कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताचं कुटूंब आज काय करत..?
- तिने फक्त एक बातमी केली, पण त्यामुळे हर्षद मेहताचा सगळा बाजार उठला.
- म्हणून तयारी असूनही पी.व्ही. नरसिंह राव यांनी अणुचाचणी घेतली नाही.
- बाबरी मशीद पडत होती तेव्हा पंतप्रधान नरसिंह राव काय करत होते?