तिने फक्त एक बातमी केली, पण त्यामुळे हर्षद मेहताचा सगळा बाजार उठला.

सुचेता दलाल. पहिल्या बिझनेस स्त्री-पत्रकार. टाईम्स ऑफ इंडियाच्या अर्थविभागाच्या तत्कालिन संपादक. त्यांची अजून एक विषेश ओळख सांगायची तर ‘बिग बुल’ हर्षद मेहताचं ५०० कोटी रुपयांचं प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पत्रकार. आजवर त्यांनी एन्रॉनसारखे ऊर्जा घोटाळे, दिनेश दालमियांचे आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेला घोटाळे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनमधील अनेक गडबडी उघडकीस आणल्या आहेत.

परंतु हर्षद मेहताच्या बातमीने इतिहास घडला.

२८ वर्षांपूर्वीची गोष्ट! २३ एप्रिल १९९२ हा तसा सर्वसामन्यांना नेहमीसारखाच दिवस. पण त्यादिवशीच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर तीन कॉलम बातमी प्रसिद्ध झाली होती. तिचा मथळा होता.

‘भारतातील सर्वात मोठा घोटाळा’

५०० कोटी रुपयांची गडबड ; पैशाची भरपाई करण्याबद्दल स्टेट बँकेचा ब्रोकरला आदेश.

त्यानंतर त्यासंदर्भातल्या बातम्या रोजच छापून येवू लागल्या. पंचवीस वर्षांपूर्वी अशा गलेलठ्ठ रकमांचे घोटाळे लोकांना नवीन होते. त्यानंतर शेअरबाजार एकदम गडगडला. लोक हवालदिल झाले.

बातमीच्या आदल्या दिवशी टाईम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये :

अखंड देशाला हादरवून टाकणारी ही बातमी कोणाला, कशी मिळाली? ती खरी आहे का, अशा शंका येवू लागल्या. पण वृत्तपत्राच्या अर्थविभागाच्या संपादकाकडूनच ही बातमी आली होती. त्यामुळे अविश्वास असण्याची शक्यताच नव्हती. तरी ही एवढ्या रकमेच्या घोटाळ्याची भांडाफोड करणारी आणि मोठ-मोठी नाव असणारी ही बातमी होती. त्यामुळे बातमी छापण्यापूर्वी पुराव्यांची शहानिशा करायला हवी असं मुख्य संपादकांचं मत होत. रात्री उशिरापर्यंत ही सगळी चर्चा चालू होती.

तसेच ती लगेच छापणं भाग होतं. होल्डवर ठेवली असती तर एका दिवसात सगळं प्रकरण दडपलं जाण्याची शक्यता होती.

शेवटी रात्री खूप उशिरा, थेटपणे कुणाचं नाव न घेण्याच्या अटीवर मुख्य संपादकांनी परवानगी दिली आणि २३ तारखेला ती बातमी छापण्यात आली.

अर्थात तो ‘बिग बुल’ म्हणजे हर्षद मेहता होता हे लोकांना ओळखू आले.

बातमी सुचेतांच्या नावाने Byline गेली. पत्रकारितेत आल्यापासूनच सुचेता आर्थिक विषयांशी स्फोटक अशा वेगवेगळ्या बातम्या देत होत्या. त्यामुळे दडपणं, ताण हे नवीन नव्हते. पण वयाच्या ऐन तिशीत हा एवढा मोठा घोटाळा बाहेर काढण्यासाठी त्यांनी आपली चांगली नोकरी पणाला लावली.

पुढे हा घोटाळा उघडकीला आणल्यापासून वर्षांच्या आत त्यांनी पत्रकार व लेखक देबाशीष बसू यांच्या साहाय्याने ‘The Scam- who won, who lost, who got away’- हे पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर हे पुस्तक २००१ मध्ये नवीन माहितीसह From Harshad Mehta to Ketan Parekh -The Scam या नावानं प्रसिद्ध झालं.

सुचेता दलाल यांचा जन्म ३० जानेवारी १९६१ रोजी मुळचा मुंबईतील मराठी कुटूंबातील.

त्यांना एक मोठी बहीण व लहान भाऊ. आई-वडील डॉक्टर. मात्र वडिलांची नोकरी सतत बदलीची होती. त्यामुळे बेळगाव येथे इंग्रजी माध्यमातुन शालेय शिक्षण झालं. घर तसं मध्यमवर्गीय.

पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात शेअर मार्केट, त्यातील चढ-उतार, बॉण्ड्स, रोखे, ट्रेडिंग आदी शब्दांशी सुचेतांची ओळखसुद्धा नव्हती. स्टॅटिस्टिक्सची पदवी घेतल्यावर, कायद्याची पदवी मिळवायची म्हणून त्या पुन्हा मुंबईला आल्या आणि स्वतंत्रपणे मुलींच्या वसतिगृहात राहू लागल्या.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी हॉटेल ओबेरॉयमध्ये दीड वर्ष नोकरीही केली, पदवी मिळवली.

मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या बहुतेक जणी शिकाऊ पत्रकार किंवा चित्रपटक्षेत्राताशी निगडीत होत्या. त्यांचे एकेक विलक्षण अनुभव ऐकून आपणही पत्रकारच व्हायचं हा विचार पक्का झाला. आई-वडील डॉक्टर असले तरी मुलांनी तोच व्यवसाय निवडावा, असा  त्यांचा आग्रह नव्हता. पण पत्रकारितेशीही तशी काहीच ओळख नव्हती. ‘लोकसत्ता’चे पहिले संपादक त्र्यं. वि. पर्वते हे बहिणीचे सासरे. तिथे प्रथम पत्रकारितेशी ओळख झाली होती.

अखेर १९८४ ला ओबेरॉयमधील नोकरी सोडून ‘फॉर्च्यून इंडिया’ या नियतकालिकामधून पत्रकार म्हणून आरंभ केला. त्या पहिल्या बिझिनेस स्त्री-पत्रकार. पुढे ‘बिझिनेस स्टॅण्डर्ड’ आणि नंतर टाईम्स ऑफ इंडिया.

हर्षद मेहताची बातमी कशी मिळाली ?

हर्षद मेहता आणि त्यांची भेट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वरचेवर होत असायची. मात्र मुंबईत चाळीस रुपये घेवून आलेला हर्षद ब्रँड टोयाटा गाडीतुन उतरताना बघून त्यांना कायम काहीतरी चुकीच घडत असल्याचा वास यायचा. आणि त्यामुळेच सुचिता त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या.

हर्षद मेहताच्या घोटाळ्याबद्दल यापूर्वी आम्ही लिहीले आहेच.

अशीच हर्षदची बँककडून पैश्यांची फिरवाफिरवी चालू होती. तो मधले पैसे शेअर मार्केटवर लावायचा. असाच १९९२ सालामध्ये त्याने खूप मोठ्या प्रमाणारवर पैसे लावले. पण तेव्हा बाजारात मोठी मंदी आल्याने हर्षदचे चांगलेच नुकसान झाले. इतके की बँकांचे पैसे परत करणे अशक्य झाले. १५ चे २० दिवस झाले तरी हर्षदने पैसे परत न केल्याने बँका गॅसवर आल्या.

इकडे सुचिता हर्षदवर लक्ष ठेवून होत्याच.

हर्षद जवळपास सर्वच मोठ्या बँकांचे देणे बाकी होता. आणि याची टिप सुचिता यांना मिळाली. इथेच त्यांनी ‘त’ म्हणता ‘ताक’ ओळखण्याचं कौशल्य वापरलं. त्यांनी बँकाशी संपर्क साधला. सगळ्यात मोठा म्हणजे जवळपास ५०० कोटींचा फटका स्टेट बँकेला बसला होता. आणि इथूनच त्यांनी पुढचा मागमूस घेतला. सर्व बँकिंग व्यवस्थांचा ४ हजार ९०० कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

२०१५ साली आणखी एक घोटाळा बाहेर काढला

२०१५ मध्ये सुचेताजींनी ‘मनीलाइफ’च्या मासिकातील एका लेखात ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’मधील अफरातफर त्यांनी उघडकीला आणली. त्यामुळे आपली बदनामी झाली असं म्हणत ‘एनएसई’ने त्यांच्यावर १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला.

पण त्या दाव्याचा निकाल सुचेतांच्या बाजूने लागला आणि एनएसई’ला पन्नास लाख रुपयांचा दंड बसला. मात्र न्यायालयाने यातील ४७ लाख रुपये ‘टाटा कॅन्सर हॉस्पिटल व मसीना हॉस्पिटल’ यांना देऊन खर्चापोटी केवळ तीन लाख सुचेता व देबाशीष यांना मिळतील अशी व्यवस्था केली.

सध्या त्या आणि देबाशीष बसू स्वतंत्र रीतीने आपल्या ‘मनीलाइफ फाऊंडेशन’तर्फे अर्थसाक्षरता वाढवणं, सुरक्षित आर्थिक व्यवहारांबाबतचं समाजप्रबोधन करणं, सामान्यांच्या त्याबाबतच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणं, ही कामं करत आहेत. त्यासाठी विविध चर्चासत्रे, गाठीभेटी, समुपदेशन असे अनेक पर्याय वापरत आहेत.

२००६ मध्ये सुचेताजी ‘पद्मश्री’च्या मानकरी ठरल्या.

सेबीचे सल्लागारपद, ग्राहकोपयोगी व ग्राहकहितासाठी काम करणाऱ्या देशभरातील काही संस्थांचं विश्वस्तपद आदी मान त्यांना मिळाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.