हर्षवर्धन पाटील आणि गडकरींनी मिळून आमदारांना वडापाव खाऊ घातला आणि आंदोलन मिटवलं.

राजकारणात असं म्हंटल जातं कोणी कोणाचं मित्र नसतंच. त्यात आणि मित्र आणि शत्रू अशी गणित कधी बदलतील सांगता यायचं नाही. पण या मित्र आणि शत्रूत्वातून मध्यममार्ग स्वीकारणारी नेतेमंडळी थोडी फारच असतात.

या मध्यममार्गी नेत्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील. एकेकाळचे कट्टर काँग्रेस नेते, माजी मंत्री. एवढंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव घेतलं जायचं. हर्षवर्धन पाटील म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा सर्वात चमकता तारा.

अशा या हर्षवर्धन पाटलांनी १५ आमदारांना घेऊन सभापतींचा रस्ता अडवायला निघालेल्या रावतेंचा प्लॅन फेल केला होता. त्याचाच हा किस्सा. 

आमदार असताना विनाकारण निर्माण होणारे कटुतेचे  प्रसंग अतिशय खुबीने हाताळण्यात हर्षवर्धन पाटलांचा हातखंडा होता. कारण एकच, ते म्हणजे त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते. असच एकदा विधान परिषदेमध्ये एक वादाचा प्रसंग घडला. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख होते.

काहीतरी कारणावरून शिवसेना गटनेते दिवाकर रावते आणि सभापती असलेल्या देशमुखांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला. या वादाची तीव्रता वाढतच होती. देशमुखांनी रावतेंना ‘असंसदीय शब्द वापरु नका’ अशी सूचना केली. पण रावतेंचा पारा आणखीनच चढला. परिस्थिती स्फोटक बनत चालली होती. जो काही वाद रंगला होता, त्यामुळे सभागृहाचे नियम आणि संकेतांची पायमल्ली सुरु होती.

बघायला गेलं तर हा वाद खरंतर देशमुख आणि रावते यांच्यात सुरु होता. पण तत्कालिन संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटलांनी यात मध्यस्थी केली. त्यांनी दिवाकर रावतेंना सबुरीचा सल्ला देत म्हंटल, तुम्ही सभागृहाचे सन्माननीय सदस्य आहात. तुम्ही जे बोलत आहात ते अशोभनीय आहे. सभागृहाच्या नियमाविरुद्ध आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही असं बोलू नका. पण वाद वाढतच राहिला.

रावतेंनी असंसदीय शब्द वापरल्यामुळे सभापतींनी रावतेंना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. पण रावते शांत होण्याऐवजी रावतेंचा पारा आणखीनच चढला. आतापर्यंत खाली उभे राहून बोलणारे रावते चक्क बाकावर उभे राहिले आणि जोरजोरात सभापतींना म्हणू लागले,

 मला बाहेर जा असे आदेश देणारे तुम्ही कोण ?

यावर भडकलेल्या सभापतींनी रावतेंच एका दिवसासाठी निलंबित केलं. झालं वाद विझण्याऐवजी अजूनच पेटला.  रागाच्या भरात रावतेंनी सभागृह सोडलं. पण रावतेंनी प्लॅन केला की आमदारांना घेऊन सभापतींचा रस्ता अडवायचा.

सभापतींनी रावतेंच एका दिवसासाठी निलंबन केलंय म्हंटल्यावर प्रश्न तिथेच मिटला असेल असं वाटलं होत. पण तस न होता सभागृहाबाहेर वेगळंच काहीतरी शिजत होतं. हर्षवर्धन पाटलांना याची कुणकुण लागली. त्यांना त्यांच्या सचिवाचा फोन आला. सचिव म्हंटले की,

रावते सभागृहाच्या गेटवर सभापतींचा रस्ता अडविण्यासाठी १५ आमदार घेऊन बसले आहेत. सभापती घरी जात असताना त्यांचा रस्ता अडवून त्यांना घराकडे जाऊ देणार नाहीत.

दिवाकर रावते यांचा मनसुबा कळल्यानंतर हर्षवर्धन पाटील सभापतींना भेटण्यासाठी तडक सभागृहाकडे गेले. तोपर्यंत सभागृहाचे त्या दिवशीचे कामकाज संपलेले होत. सभागृहातील बरेचसे सदस्य घराकडे गेले होते. तिथे सभापती एकटेच होते. हर्षवर्धन पाटील त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना विचारलं की,

तुम्ही घरी कधी जाणार आहात…?

सभापती म्हंटले, माझ्या समोर जेवढ्या फाईल पडल्या आहेत. त्यावर सह्या झाल्या की मग मी घराकडे जाईन. यावर हर्षवर्धन पाटलांनी सभापतींना सांगितलं की, दिवाकर रावते काही आमदार घेऊन बाहेर गेटवर बसलेत. ते तुमचा रस्ता आडवणार आहेत. तर हा प्रसंग टाळण्यासाठी आपण रावतेंना सभागृहात बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी. जेणेकरुन चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल. यावर सभापती म्हणाले मी शिवाजीराव देशमुख आहे. त्याच रस्त्याने जाईन.

सभापती देशमुखांच्या त्याच रस्त्याने जाणार या भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटलांसमोर प्रश्न पडला की, हा मोठा प्रश्न हाताळायचा कसा ? कारण प्रश्न सुटण्याऐवजी आणखीनच चिघळत चालला होता. मुख्यमंत्र्यांना बोलवायचं तर ते शक्य नव्हतं. मग मात्र हर्षवर्धन पाटील ठरवलं की, आपल्यालाच यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. गेटवर बसलेल्या सर्वांवर त्यांनी एकदा नजर फिरवली. त्या घोळक्यात त्यांना नितीन गडकरी दिसले. हर्षवर्धन पाटलांनी बरोबर हेरलं की गडकरींशी चर्चा होऊ शकते. म्हणून पाटलांनी गडकरींना बाजूला बोलवून घेतलं आणि गडकरींशी चर्चा केली.

गडकरींना समजावलं की, तुम्ही सर्वजण अशाप्रकारे सभापतींचा रस्ता अडवला तर समाजामध्ये आणि राज्यामध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे तुम्ही पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये या सर्वांना समजावून सांगा. मी स्वतः सभापतींना घेऊन जाणार आहे.

यावर गडकरी म्हंटले, मी रावतेंना आणि या १५आमदारांना खूप वेळापासून समजावून सांगतोय, पण ते ऐकत नाहीत. तरी मी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहतो.

थोड्याच वेळात हर्षवर्धन पाटील सभापतींना घेऊन खाली आले. गेटवर सर्वजण घोषणा देत होते. गडकरींनी पुढाकार घेत त्यांच्या घोषणा थांबवल्या आणि सर्वजण घोळक्याने सभापतींजवळ येऊन चर्चा करू लागले. मग यातून सुटका करण्यासाठी हर्षवर्धन पाटील म्हणाले की,

आपण उद्या सभागृहात चर्चा करु. आणि गडकरींनी सुद्धा त्याचीच री ओढली. तेही म्हंटले, उद्या यावर चर्चा करु. मग सर्वजणांनी घोषणा देण्याचे थांबवले. आणि सभापतींची गाडी सुखरूपपणे त्यांच्या घराच्या रस्त्याने निघून गेली.

पण किस्सा इथंच संपत नाही बरं का.. तो आमदारांचा घोळका पांगण्याआधी हर्षवर्धन पाटीलत्यांना मिश्किलपणे म्हणाले, की चला तुम्ही खूप घोषणा दिलेल्या आहेत. त्यामुळे तुमचा घसा कोरडा झाला असेल. मी तुम्हाला चहा पाजतो आणि वडापाव खाऊ घालतो. आणि विशेष म्हणजे सर्वजण चहा आणि वडापाव खाण्यासाठी सोबत गेले.

विनाकारण निर्माण होणारा कटुतेचा प्रसंग अतिशय खुबीने हाताळण्यात हर्षवर्धन पाटलांना यश आलं होत. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.