घड्याळ चिन्हावर हर्षवर्धन पाटलांनी पवारांच्या उमेदवाराचा पराभव केला होता…

हर्षवर्धन पाटील म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा सर्वात चमकता तारा.

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे कट्टर कार्यकर्ते. काँग्रेसमध्ये असताना संसदीय कामकाज मंत्री, सहकार मंत्री, अनेक वर्षे कोल्हापूरचे पालक मंत्री अशी सगळी महत्वाची पदे त्यांनी उपभोगली. सत्ता वर्तुळात जे निर्णय घेणारे नेते असतात त्यात अगदी तरुण वयात जाऊन पोहचायची कामगिरी हर्षवर्धन पाटलांनी करून दाखवली होती.

विशेष म्हणजे काँग्रेस मध्ये येण्यापूर्वी शिवसेना भाजप युतीच्या कार्यकाळात देखील मंत्रीपदी ते राहिले होते. गेली जवळपास वीस वर्षे हर्षवर्धन पाटील मंत्रिपदाच्या खुर्चीवर होते.

पण २०१९ ला हर्षवर्धन पाटलांचा अंदाज चुकला. त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपची वाट धरली. सगळ्या प्रमाणे त्यांनाही वाटलेलं की काँग्रेस परत काय सत्तेत येत नाही, आणि त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपची वाट धरली. पण दुर्दैवाने ते पराभूत झाले. पाठोपाठ भाजपचीही गणिते चुकली आणि फडणवीसांची खुर्ची गेली.

२०१४ साली देखील काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तुटली तेव्हा हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. या सलग फोन पराभवामुळे परिस्थिती अशी झाली कि वीस वर्षांनी पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटील सत्तेच्या बाहेर गेलेत. मुख्यमंत्रीपदाच्या तोडीचा नेता पण साधी आमदारकीसुद्धा उरली नाही.

हर्षवर्धन पाटलांच्या या पीछेहाटीस कारण त्यांचा आणि अजित पवारांचा संघर्ष आहे असं मानलं जातं. मुळात हर्षवर्धन यांनी काँग्रेस त्यांच्या पक्षात असंतुष्ट आहे म्हणून नाही तर राष्ट्र्वादीसोबतच्या वादामुळे सोडली असं सांगतात. आघाडी होती तेव्हाही आणि आजही इंदापूर भागात हर्षवर्धन आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांच्या सावलीला देखील उभे राहत नाहीत.  

पवार आणि पाटील घराण्यातील वाद हा आजकालचा नाही तर त्याला ३५ वर्षांचा इतिहास आहे.

सुरवातीपासून इंदापूर हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. बारामती तालुक्याच्या जवळचा मतदार संघ म्हणून या तालुक्यातील मतदारांवर पवार  घराण्याचा प्रभाव होता. हा इंदापूर विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी बारामती मतदारसंघात यायचा. हर्षवर्धन पाटलांचे काका शंकरराव बाजीराव पाटील तेव्हा खासदार होते. 

समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९८४ साली शरद पवार यांनी लोकसभा निवडणूकीत  काँग्रेसच्या शंकरराव पाटील यांचा पराभव केला होता. तिथून या दोन्ही घराण्याची भांडणे सुरु झाली.

पुढे शरद पवार काँग्रेसमध्ये परतूनही त्यांनी शंकरराव पाटलांच्या विरोधातल्या उमेदवाराला मदत करायचं धोरण राबवलं.

पुढे १९९१ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी वेळी स्वतः शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी बारामती लोकसभेसाठी विद्यमान खासदार शंकरराव पाटील यांना डावलून आपले पुतने अजित पवार यांना उभं केलं.

नेमक्या याच काळात शंकरराव बाजीराव पाटील यांचा देखील पुतण्या राजकारणात आपले नशीब अजमावत होता. ते म्हणजे हर्षवर्धन पाटील.

एक हुशार, अभ्यासू संघटनेवर पकड असलेला तरुण म्हणून हर्षवर्धन पाटलांची इंदापूर भागात ओळख होती. बी. कॉम. आणि एलएलबीचं शिक्षण घेतलेल्या पाटलांचं मराठीसह हिंदी आणि इंग्रजीवरही प्रभुत्व होतं. त्यांनी काँग्रेस पक्षाकडे जिल्हापरिषदेचं तिकीट मागितलं. पण भविष्यात उभं राहू पाहणारं आव्हान मोडून काढण्यासाठी पवारांनी त्यांना तिकीट नाकारलं.

तरीही हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व जिंकून दाखवलं.

पवारांच्या इच्छेविरुद्ध निवडून येणार तरुण म्हणून त्यांना ओळखलं गेलं. हर्षवर्धन पाटलांनी अगदी तळागाळातून आपले कार्यकर्ते जमवले. शंकरराव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखाना, सहकार क्षेत्रात चांगलं कार्य केलं.

त्यांनी स्थानिक पातळीवर स्थापन केलेल्या इंदापूर विकास आघाडीमार्फत राजकारणास सुरवात केली.

१९९५ सालच्या विधानसभा निवडणुका आल्या. हर्षवर्धन पाटलांनी तेव्हा इंदापूर मतदारसंघात काँग्रेसकडे तिकीट मागितलं. मुख्यमंत्री शरद पवारांनी मात्र इंदापूरचे दोन वेळा आमदार असलेल्या गणपतराव पाटील यांनाच पुन्हा तिकीट दिलं.

हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार दाखल करत त्यांना आव्हान दिले. गंमत म्हणजे तेव्हा हर्षवर्धन पाटलांना अपक्ष म्हणून चिन्ह मिळाले होते घड्याळ.

गणपतराव पाटील हे इंदापूर भागातील धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जात. ते दोन वेळचे आमदार होते. शरद पवारांचा वरदहस्त होता. या भागात निवडणुका नेहमी जातींच्या गणितावर लढवल्या जातात. विशेषतः धनगर समाजाचे प्राबल्य असल्यामुळे त्यांचं मत महत्वाचं ठरतं.

पण १९९५ साली हर्षवर्धन पाटलांनी सर्व गटातटांना एकत्र आणत निवडणूक लढवली. जोरदार प्रचार केला. घड्याळावर शिक्का मारा

त्यांनी चमत्कार घडवला. समोर शरद पवारांचा काँग्रेस चिन्हावर लढणारा उमेदवार असताना  तीस बत्तीस वर्षांच्या हर्षवर्धन पाटलांनी बाजी मारली. गणपतराव पाटलांचा ११ हजार मतांनी पराभव झाला.

पवारांच्या उमेदवाराचा पराभव करून घड्याळ चिन्ह जिंकलं होतं.

पुढच्या साडेचार वर्षात मात्र भीमेच्या पात्रातून बरच पाणी वाहून गेल. हर्षवर्धन पाटील तेव्हा शिवसेना भाजप युतीमध्ये गेले. पवारांना हरवून मनोहर जोशींची सत्ता आली. हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस सोडून तिथे मंत्रीपद मिळवलं.

दरम्यान स्वतः शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. विशेष म्हणजे त्यांच्या या नव्या पक्षाचं चिन्ह होतं घड्याळ. गेल्या दोन निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटलांना याच घड्याळ चिन्हाने आमदारकी गमवायला भाग पाडले हे नक्की.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.