खून, खंडणी, ISI ते कुख्यात दहशतवादी : मराठवाड्यातून पाकीस्तानात पोहचलेला रिंदा..

५ ते ६ महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे.  मुंबईतील दहशतवादी हल्ल्याबाबत एक इनपुट आले होते, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की दहशतवादी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रिंदा नामक दहशतवादी सिरीयल बॉम्बस्फोट घडवून आणू शकतो अशी टीप मिळाली होती…

सुदैवाने त्या हल्ल्याचं पुढे काय झालं नाही..

मात्र दुर्दैव हे कि यामागे हात असलेला जो दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा आहे तो मूळचा पंजाबचा खलिस्तानी आहे. आणखी एक म्हणजे त्याचं मराठवाडा कनेक्शन आहे….

रिंदा हा नांदेडमध्ये छोटे मोठे गुन्हे करणारा किरकोळ गुन्हेगार होता. गुन्ह्यांचं जाळं हळूहळू वाढवत तो आयएसआयचा एजंट बनला.

कोण आहे हरविंदर सिंह रिंदा ? 

 त्याचा महाराष्ट्रातील नांदेडशी काय संबंध ?

हरविंदर सिंह रिंदा. त्याचं कुटुंब मूळचं पंजाबमधील तरणतारण येथील. त्याचं कुटुंब महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात शिफ्ट झालं. रिंदाचा जन्म नांदेडचा अन शिक्षण देखील तिथेच झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड मध्ये असतांना त्याने छोटे-मोठे गुन्हे करायला सुरुवात केली. १८ वर्षाचा असतांना त्याने कौटुंबिक वादातून त्याच्याच नात्यातील एका तरुणाचा खून केला. झटपट पैसे कामवायच्या नादात त्याने खंडणी वसुली देखील सुरु केली. त्यातच त्याने नांदेडमधल्या २ नागरिकांची हत्या केली. 

२०१६ मध्ये त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल झाले होते. याशिवाय २०१४ मध्ये पटियाला सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. तसेच एप्रिल २०१६ मध्ये रिंदा यांनी चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षावरही त्याने गोळीबार केला होता.

या सर्व प्रकरणांमध्ये त्याला फरार घोषित करण्यात आले होते. त्याच्यावर पंजाब आणि महाराष्ट्रात अनेक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच मागील २०११ च्या हत्येच्या प्रकरणी त्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंदा सध्या पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये लपलाय. त्यापूर्वी तो लाहोरमध्ये लपला होता. रिंदाच्या तपासात असं समोर आलंय की, तो बनावट पासपोर्टद्वारे नेपाळमार्गे पाकिस्तानात पोहोचला.

नांदेडमध्ये असताना त्याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI शी संबंध निर्माण केले. 

नांदेडमध्ये राहणाऱ्या बड्या लोकांकडून रिंदाने कोट्यवधी पैसे गोळा केले आणि त्याचा दहशतवादी कारस्थान करण्यासाठी वापरत आहे.  

गेल्या काही काळात नांदेड जिल्ह्यातील व्यावसायिक लोकांमध्ये रिंदाच्या नावाची दहशत आहे. खंडणी नाही दिली तर रिंदा जिवंत सोडणार नाही म्हणून अनेक श्रीमंत व्यापारी लोकं धास्तावलेले आहेत.

आपल्या नावाची दहशत निर्माण करणारा रिंदा एकेकाळी विद्यार्थी नेता होता. सुरुवातीपासून गुन्हेगारीमध्ये गुंतलेला रिंदा हळूहळू दहशतवादाकडे वळला. 

रिंदा हा आता पंजाबचा गुंड राहिला नसून पाकिस्तानमधील कुख्यात बब्बर खालसा प्रमुख वाधवा सिंगचा राईट हॅन्ड बनलाय.

ISI ने रिंदाच्या पाठीवर हात ठेवला आणि आज तो ISI च्या जोरावर पाकिस्तानमधून दहशतवादी कारवाया चालवतोय. त्याचे पंजाबमध्ये मोठे नेटवर्क आहे. रिंदाने ड्रोनद्वारे पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांची खेप पाठवण्यास सुरुवात केली आहे. तसेच स्लीपर सेलच्या मदतीने RDX च्या दोन खेप तेलंगणाला पाठवल्या होत्या. 

अलीकडे नांदेड, औरंगाबाद आणि इतर काही भागात तलवारी सापडल्यात त्यात रिंदाचा हात असल्याचं सांगण्यात येतं.

तसेच गेल्या काही काळात झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये रिंदाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग आहे. कारण ज्या गँगस्टर दिलप्रीत सिंग बावा असो की जयपाल भुल्लर या दहशतवाद्यांची आणि गुंडांची नावे समोर आली आहेत त्या सगळ्यांचे रिंदाशी काहींना काही संबंध आहेत.

तसेच लुधियाना येथील न्यायालयात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कथित मानवी स्फोटामागे रिंदाचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यादरम्यान रिंदाने या बॉम्बस्फोटापूर्वी संशयितासोबत संभाषण केले होते.

यात भर म्हणजे अलीकडेच हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारा जिल्ह्यातून ४ दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर असं समोर आलंय कि हे दहशतवादी रिंदाच्या संपर्कात होते. 

महाराष्ट्रात RDX पुरवल्याची जी माहिती मिळतेय त्याद्वारे मुंबईची लोकल ट्रेन खलिस्तानवाद्यांचे टार्गेट असल्याचा एजन्सींना संशय आहे.

त्यामुळे महाराष्ट्र पोलीस आता सतर्क झालेत. महाराष्ट्र पोलीस रिंदाने पाठवलेली शस्त्रे शोधण्यात व्यस्त आहेत. कारण रिंदाची दहशतवादी गॅंग अजूनही नांदेड मध्ये आणि महाराष्ट्रात ऍक्टिव्ह असल्याचा पोलिसांचा संशय आहे कारण त्याच्या नांदेडमधील काही संशियित साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

महाराष्ट्रात RDX पुरवून या खलिस्तानी गॅंगचा काही घातपात करण्याचा प्लॅन आहे का ? याचाच तपस करण्यात सद्या नांदेड पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस कामाला लागलंय. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.