या पोरीनं पंजाबमधल्या मंत्र्यांची गाडी अडवली आणि आता तिचं करिअर घडू शकतंय…

फक्त पंजाबच नाही, तर सगळ्या देशात सध्या एकाच गोष्टीवरून राडा सुरू आहे. ते म्हणजे पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अडवण्यात आलेला ताफा. राष्ट्रीय शहीद स्मारकाच्या दिशेनं रस्ते मार्गानं निघालेला पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर अडवला गेला. या प्रकरणामुळं राजकारण चांगलंच तापलं, भाजपनं हा प्रकार काँग्रेसनं मुद्दाम केल्याचा आरोप केला. तर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी हे सगळे आरोप खोडून काढले.

आता पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ‘ट्रॅफिक जॅम’ चांगलाच गाजणार आहे, पण याच पंजाबमध्ये मंत्र्याची गाडी अडवल्यामुळं एका मुलीचं करिअर घडू शकतंय.

झालं असं की, पंजाबचे वाहतूक मंत्री अमरिंदर सिंह राजा वडिंग यांचा ताफा चंदीगडमधून जात होता. आता स्वतः मंत्री महोदय गाडीमधून चाललेत म्हणल्यावर त्यांचा लवाजमा मोठा, पोलिस बंदोबस्तही तगडा पण तरीही सोनिया नावाच्या एका २५ वर्षांच्या मुलीनं मंत्री महोदयांची गाडी अडवली. 

यामागचं कारण होतं, नोकरी.

हरियाणाच्या या पोरीनं थेट वडिंग यांची गाडी थांबवली. वडिंगही तिच्याजवळ थांबले. या मुलीनं नोकरी मागितली, ती पण साधी सुधी नाही तर बस ड्रायव्हरची. आता बस ड्रायव्हींग हे तसं पुरुषांची मक्तेदारी असणारं क्षेत्र. पण ही मुलगी म्हणाली, ‘मला सरकारी नोकरी हवीये, पण बस ड्रायव्हरची. माझ्याकडे हेव्ही ड्रायव्हिंगचं लायसन्सही आहे.’

वडिंग यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ती हट्टाला पेटली होती. वडिंग यांनी तिच्या कुटुंबाची चौकशी केली. तेव्हा तिनं सांगितलं की, ‘मला वडील नाहीत. आई हरियाणामध्ये असते, मी इकडे एकटीच राहते.’

तिची जिद्द बघून वडिंग यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. त्याही एक महिलाच. मंत्री वडिंग यांनी मुलीची ट्रायल घ्या आणि जर ती योग्यरित्या बस चालवत असेल, तर तिला नोकरीवर घ्या असं त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. अधिकारी म्हणाल्या, ‘ड्रायव्हर म्हणून बरेचसे पुरुषच काम करतात आणि हे काम करणं अवघड आहे. माहौल खराब है.’ अधिकाऱ्यांचं म्हणणं त्या मुलीनंही ऐकलं. तिचं उत्तर होतं…

‘झेलने के लिए तय्यार हूं मॅम. अभी भी तो अकेली ही रेह रही हूँ’

 मंत्री वडिंग अधिकारी महिलेला म्हणाले, ‘जर एखादी महिला अधिकारी होतेय, तर बस ड्रायव्हरही महिला होऊच शकते की. आणि महिला बस ड्रायव्हर झाली, तर त्याचं क्रेडिटही तुम्हालाच मिळू शकतं. त्यामुळे बघा विचार करा. ही मुलगी इथे तीन तास उभी होती, तिला तुमचा नंबर देतो, बघा काय होतंय.’

आता या सोनिया नावाच्या मुलीला नोकरी मिळणार का? आणि बहुसंख्य पुरुष असणाऱ्या या क्षेत्रात बसचं स्टेअरिंग महिलेच्या हातात येणार का? हा देखील पंजाबमध्ये चर्चेचा विषय असणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.