याआधी मुश्रीफांवर आरोप झालेले तेव्हा कोल्हापूरकरांनी त्यांच्यावर दुधाचा अभिषेक केला होता…

आमदार हसन मुश्रीफ यांच्याभोवती ईडीने फास आणखी आवळला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे. हसन मुश्रीफ अधिवेशनासाठी मुंबईत असून ते कागलमध्ये नाहीत. त्यांच्या समर्थकांना ईडीच्या कारवाईबाबत माहिती मिळताच कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी प्रवेशद्वारावजवळ येऊन निषेध नोंदवला शिवाय समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

इतकंच नाही मुश्रीफांची लोकप्रियता एवढी आहे कि, याआधी मुश्रीफांवर आरोप झालेले तेव्हा कोल्हापूरकरांनी त्यांच्यावर दुधाचा अभिषेक केला होता…

सालं होतं २०१३. हसन मुश्रीफ पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री तसेच बुलढाण्याचे पालकमंत्री होते. डिसेंबर २०१३ मध्ये ते बुलढाणा इथं एका कार्यक्रमासाठी गेले होते. व्यासपीठावर हसन मुश्रीफ यांच्यासह अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी असे सगळे उपस्थित होते.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अपंग सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवे हा कार्यकर्ता मुश्रीफांचे आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ गेला, अचानक डोंगरदिवे याने खिशातून शाईची बाटली काढून ती शाई मुश्रीफ यांच्या अंगावर फेकली. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

त्यावेळी पालकमंत्री म्हणून मुश्रीफ निर्णय घेण्यात अकार्यक्षम आहेत, असे आरोप डोंगरदिवे याने केले होते. त्यामुळे रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचं त्यानं मान्य केलं होतं. 

मात्र या प्रकारानंतर मुश्रीफ यांची प्रतिमा डागाळली असल्याचा समज कोल्हापुरामध्ये पसरला. मुश्रीफ यांना मानणारे त्यांचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड चिडले होते. त्यानंतर रागाच्या भरात कार्यकर्त्यांनी डोंगरदिवेच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते.सोबतच मुश्रीफ राहात असलेल्या संपूर्ण कागल तालुक्यात एक दिवसाचा बंद पाळण्यात आला होता. तालुक्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले.

त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मुश्रीफ कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर आले तेव्हा शेकडो कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले. काल बुलढाण्यात नेमकं काय झालं असं विचारू लागले. मात्र नेमकं काय झालं आहे हे सांगण्यासाठी मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शासकीय विश्रामगृहात येण्यास सांगितले. कार्यकर्ते लगेच  मुश्रीफांच्या मागे विश्रामगृहावर पोहोचले.

मुश्रीफ तिथं एका खुर्चीवर येऊन बसले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी येऊन त्यांच्या डोक्यावर तांब्या, घागर, बादली, कॅन अशा वस्तूंमधून शेकडो लीटर दुधाचा अभिषेक घालण्यास सुरुवात केली. मुश्रीफ यांना देखील हा आश्चर्याचा धक्का होता. त्यामुळे ते चक्रावून गेले होते.

मात्र त्यानंतर कोल्हापूरसह अख्या राज्यभरात मंत्र्यांना अभिषेक घालण्यात आल्याच्या प्रकाराची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मुश्रीफांवरील शाई ओतणे व दुधाचा अभिषेक घालणे हा प्रकार दांबिकपणाचा असल्याची टीका तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांनी केला होती. तर योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे कोल्हापूरमध्ये होते. पत्रकारांनी त्यांना दुधाच्या अभिषेकाच्या प्रकाराबद्दल विचारणा केली. त्यावर जाधव म्हणाले होते,

बुलढाणा येथे शाई ओतण्याच्या प्रकारावर कार्यकर्त्यांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तो अभिषेक नव्हता.

या सगळ्या प्रकार आणि चर्चांनंतर मुश्रीफ यांनी देखील कार्यकर्त्यांकडून घडलेल्या दुग्धाभिषेकाची कबुली देऊन पुरोगामी महाराष्ट्रात अभिषेक घालण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचे म्हंटलं आणि जनतेची माफी मागत विषय शांत केला होता.

हे हि वाच भिडू

1 Comment
  1. K.p.s. says

    Aamchya nanded jilhyatil godavari manyar sahakari sakhar karkhana aani sut giranya band padalya aahet jara ed bi tikade lavave kirit somayya yanni hajaro kamgar berojagar zale aahe dum aahe ka somayya madhe

Leave A Reply

Your email address will not be published.