मंत्रीपदावर असणारा माणूस मुंबईच्या चाळीत एका खोलीत राहतोय हे कोणाला सांगूनही पटायचं नाही..

आजकाल मंत्रिपदावरून होणारी भांडणे आपण पाहतोय. खातं कोणतं असावं इथपासून मंत्रिपदासाठी बंगला कोणता मिळावा, गाडी कोणती असावी अशा अनेक मुद्द्यांवरून नेतेमंडळी नाराज असतात. राजकारणातली पदे हि नेत्यांची घरे भरण्यासाठी असतात असाच गैरसमज गेल्या काही काळापासून दृढ झालाय.

पण एक व्यक्ती या सगळ्याला अपवाद होती.

नाव हशू पसराम अडवाणी. मूळचे पाकिस्तानात गेलेल्या सिंध प्रांतातील हैदराबादचे. जन्म २२ फेब्रुवारी १९२६ साली झाला. शाळेत असल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांकडे आकर्षित झाले. साधारण चाळीसच्या दशकात सिंधी तरुणांमध्ये हिंदुत्ववाद पक्का होत चालला होता. संघाच्या शाखा रुजू होत होत्या. हशू अडवाणी देखील अशाच शाखांमध्ये जाऊ लागले. १९४२ च्या सुमारास त्यांनी संघ प्रचारक बनण्याचा निर्णय घेतला.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि जाता जाता इंग्रजांनी देशाचे दोन तुकडे केले. सर्वात मोठा धक्का बसला सिंध प्रांताला. इथल्या लाखो हिंदूंना आपलं घरदार सोडून विस्थापित व्हावं लागलं. नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानच्या सीमेवर दंगली भडकल्या होत्या. दोन्ही साईडचे लोक जीव मुठीत धरून आपला संसार सांभाळत देश बदलत होते. 

अशीच मजल दरमजल करत हशू अडवाणी यांचं कुटुंब देखील पाकिस्तानमधून मुंबईला आलं.

सिंधतून आलेल्या अनेक निर्वासितांना चेंबूर कॅम्पमध्ये म्हणजेच दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील सैन्याच्या बराक्समध्ये जागा मिळाली. हशुजी निर्वासितांच्या समस्या सोडविण्यात आघाडीवर होते. पण, त्यांना स्वतःला मात्र बराच काळ घराशिवाय राहावं लागलं.

मुंबईत हशू अडवाणी यांनी आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं आणि एका साप्ताहिकात पत्रकार म्हणून नोकरी पकडली. अशातच मुंबईत संघ विचारांवर चालणाऱ्या जनसंघ या राजकीय पक्षाची शाखा सुरु झाली. या पक्षात हशू अडवाणी देखील सामील झाले. पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या समवेत त्यांनी काश्मीर आंदोलनात सहभाग घेतला. त्यांना आग्रा येथे एक महिन्याचा कारावास देखील झाला.

मुंबईला परतल्यावर हशू अडवाणी यांनी चेंबूर कॉलनी युवक मंडळची स्थापना केली आणि पूर्ण वेळ सार्वजनिक जीवनात उडी घेण्याचा निर्णय घेतला. 

मुंबईत तेव्हा डाव्या चळवळी आणि काँग्रेस यांचे वर्चस्व होतं. केंद्रापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत राज्य करणाऱ्या काँग्रेसला नमवन निव्व्ल अशक्य होतं, तरी हशू भाई अडवाणी यांच्या सारखे एकांडे शिलेदार डोंगराला धडक देण्याचं काम थांबवत नव्हते.

१९६१ साली प्रथमच ते मुंबई महापालिकेत जनसंघाच्या तिकिटावरून निवडून आले.

१९६२ साली २३९ विद्यार्थी असलेली एक छोटीशी शाळा संस्थाचालक बंद करायला निघाले होते. हशुजींनी त्यांच्या श्री हरिराम समतानी व अन्य मित्रांकडे जाऊन ३५ हजार रुपये उभे केले. त्या काळात एक तोळा सोनं शंभर रुपयांच्या आत यायचं एवढं सांगितलं तरी ही रक्कम केवढी मोठी होती याचा अंदाज येईल. हशुजींनी त्यातून ती शाळा जमिनीसकट खरेदी केली आणि विवेकानंद एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शाळा चालवायला सुरुवात केली.

खुद्द हशुजींचे वडील व भाऊ जिब्राल्टर या ड्युटी फ्री बंदरात व्यवसाय करीत. हशुजी व्यवसायात आले असते तर त्यांना आवडलं असतं पण हशुजींचं मन देशकार्यात अडकलं. बाकीचं सगळं कुटुंब युरोप मध्ये स्थायिक झालं तरी हशू अडवाणी यांनी चेंबूरलाच त्यांनी आपली कर्मभूमि केली.

चेंबूर मध्ये एका चाळवजा इमारती मध्ये १० बाय १० च्या खोलीत त्यांचा मुक्काम असायचा. हि खोली म्हणजे त्यांचं निवासस्थान होतं आणि हेच त्यांचं कार्यालय. त्यांना भेटायला येणारे शेकडो लोक याच खोलीच्या बाहेर रांगा करून उभे असायचे. या खोलीत टेबल खुर्ची वगळता जास्त काही सामान देखील नव्हतं. हशू अडवाणी घराला कधी कुलूपही लावत नसत.

सार्वजनिक शौचालय वापराव्या लागत असलेल्या या घरात हशूजी अनेक वर्षे राहिले.

या घरात राहूनच त्यांनी आधी जनसंघ, नंतर भारतीय जनता पक्षाचे संघटन मुंबईत पक्क केलं. आदर्श जनप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना दुसरीकडे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचा डोलारा उभा केला. आज या सोसायटीच्या दहा इमारतीत विविध २४ संस्था आहेत. पाळणाघर, माँटेसरी पासून ते हायस्कुल, दोन पॉलिटेक्निकल, एक इंजिनिअरिंग कॉलेज, एक मॅनेजमेंट कॉलेज, मूक-बधिरांची शाळा, योग केंद्र अशा अनेकानेक संस्थांतून आज तिथे १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

एखाद्या दक्ष पित्याप्रमाणे या सर्व संस्थांकडे हशुजींचे लक्ष असे. गुणवत्तेबाबत तडजोड नाही या त्यांच्या धोरणामुळेच संस्थेचा वटवृक्ष झाला.

हे सगळं सुरु असताना त्यांची राजकीय घोडदौड सुरूच होती. त्यांनी संघाच्या विचारांना आणि जनसंघाला मुंबईत खऱ्या अर्थाने रुजवलं. १९६७ साली त्यांनी चक्क चेंबूर मधून आमदारकी देखील जिंकली. 

पुढे १९७८ साली जेव्हा शरद पवार यांनी वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून पुलोदचा प्रयोग केला तेव्हा हशू अडवाणी यांना नगरविकास मंत्रालय देण्यात आलं. मंत्री बनल्यावरहि अनेक दिवस ते आपल्या खोलीतच राहायचे. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अखेर त्यांनी मंत्र्यांसाठी दिलेल्या बंगल्यात राहायला जाण्याचं मान्य केलं.

सध्याचे उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक एकेठिकाणी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या आठवणींमध्ये लिहितात,

पहिल्यांदा बंगल्यावर गेल्यानंतर हशुजींनी आधी सगळा बंगला हिंडून पहिला. “एवढी काय घाई आहे सगळं आताच पाहायची?” असं विचारल्यावर हशुजी म्हणाले होते, “कशा – कशाची स्वतःला सवय होऊ द्यायची नाही ते बघून ठेवलं!” इतकं साधेपणा आणि विचारांची स्पष्टता असलेला नेता आम्हाला लाभला, हे आमचं भाग्य होतं.

आपल्या घरातून फक्त काही जोड कपडे घेऊन हशू अडवाणी तिथे राहायला गेले. त्यांना दोन वेळा मंत्रीपदे मिळाली. नव्वदच्या दशकात युतीच्या काळातही अडवाणी मंत्रीपदी राहिले. आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांच्यावर टीका करण्याचं धाडस देखील कोणाचं झालं नाही. देशासाठी लग्नही न केलेल्या हशू अडवाणी यांनी आपल्या अखेरच्या काळात घरचे बोलवत असूनही परदेशात जाण्यास नकार दिला.

२२ जुलै १९९५ साली त्यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक भीष्म पितामह, भाजपला मुंबईत रुजवणारा जेष्ठ नेता आपल्या साधेपणाचा आदर्श सोडून निघून गेला होता.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.