ठाण्याच्या लोकांनी एकाच घरात तब्बल १५ मृतदेहांची रास पडलेली बघितली होती.

२०१६ सालात ठाण्यात एक हत्याकांड घडलं होतं. आज लोक विसरले देखील असतील पण ठाण्यातले कासारवडवलीचे लोक आज ही हत्याकांड घडलेल्या घरासमोरुन जाण्याचं टाळतात.

कारण त्यातल्या बऱ्याच लोकांनी एकाच घरात तब्बल १५ मृतदेहांची रास पडलेली बघितली होती.

ठाण्यात कासारवडवली नावच एक गाव आहे. त्या भागात अन्वर वारेकर आपल्या कुटुंबासोबत राहायचे. त्यांना चार मुली आणि एक मुलगा असा परिवार. मुलांचं नाव हसनैन. कॉमर्स पदवीधर असलेला हसनैन नवी मुंबईतील सीए फर्ममध्ये आयकर संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होता. मुलांचं लग्न झालं होतं. तसं मुलींची पण लग्न उरकलीच होती. सर्व मुली आपापल्या घरी सुखानं नांदत होत्या. मुलाचा संसार ही आपला बराच चालू होता म्हणायचं.

ना आजूबाजूच्या लोकांशी भांडण, ना कोणाशी हाडवैर. सगळं कसं निवांतच होतं म्हणायच.

शांततेत नांदाणाऱ्या वारेकर कुटुंबाला आपल्यावर काळाचा घाला येणार आहे या भयंकर घटनेची पुसटशी कल्पना ही नव्हती. क्षणार्धात सर्वांचे गळे कचाकच चिरण्यात आले होते.

काय घडलं होतं ‘त्या’ रात्री ?

२८ फेब्रुवारी २०१६ ची ती रात्र ठाण्याच्या वारेकर कुटुंबासाठी काळरात्र ठरली होती. त्या दिवशी एकाच घरात सर्व बहिणी-भाचे कंपनी जमली होती. घरातला मुलगा म्हणून हसनैन नेच सर्वांना दावत देण्यासाठी बोलावलं होतं. घरात आनंदाचं-हसरं खेळतं वातावरण होतं. रात्री हसनैनने शीतपेयातून सर्वांना गुंगीचं औषध दिलं. घरातील सर्वांची शुद्ध हरपल्यानंतर रात्री एकामागून एक मोठ्या चाकूने त्याने सगळ्यांचे गळे चिरले. आई, वडील, बायको, पोटच्या दोन मुली, ज्यातली धाकटी अवघ्या तीन महिन्यांची होती. तिचाही त्याने गळा चिरला. याशिवाय तीन बहिणी, तीन भाच्या, तीन भाचे यांनाही त्याने संपवलं.

कुटुंबातल्या तब्बल १४ जणांची हत्या करुन ३५ वर्षीय हसनैन अन्वर वारेकर याने सुध्दा आत्महत्या केली होती. ७ लहान मुलं, ६ महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू त्या घरात झाला होता.

त्या हत्याकांडात हसनैनची एकमेव बहीण बचावली होती.

या हत्याकांडातून जिवंत वाचलेली एकमेव व्यक्ती म्हणजे त्याची २२ वर्षांची बहीण सबिया युसूफ भारमल. तिनेच पोलिसांना घटनाक्रम सांगितला.

त्या रात्री भावाने सगळ्यांना सॉफ्टड्रिंकमधून गुंगीचं औषध पाजलं. मात्र सर्दी झाल्यामुळे ती ते प्यायली नव्हती. ही गोष्ट हसनैनला समजली नव्हती. रात्रीच्या वेळी हसनैनने एकामागून एक सगळ्यांचे गळे चिरताना तिने पाहिलं होतं. भाऊ जवळ येताच ती उठली आणि त्याच्याशी भांडायला लागली. मात्र त्याने तिच्यावरही वार केले. कशीबशी त्याच्या तावडीतून ती निसटली आणि तिने स्वतःला एका खोलीत बंद केलं. पहाटेचे तीन वाजले होते. तिने जोरजोरात आरडाओरड करुन शेजाऱ्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत हसनैनने इतर सर्वांचे जीव घेतले होते. आणि स्वतःही गळफास घेतला होता.

हसनैनने असं का केलं होतं, याविषयी बरेच तर्क लढवले गेले. लोकांच्या मते, त्याने त्याच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं. तो जवळपास ६७ लाख रुपयांच्या कर्जाच्या डोंगराखाली दबला गेला होता. तो शेअर ट्रेडिंगही करायचा आणि त्यातही त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जायचं. तर वारेकर कुटुंबात मालमत्तेवरुन वाद असल्याचीही त्यावेळी चर्चा होती.

हसनैन बाहेरख्याली होता असं ही त्यावेळी म्हंटल गेलं. कदाचित अन्य महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असावेत, असा अंदाज त्याच्या फेसबुक अकाऊंटवरील काही हार्टब्रेक मेसेजवरुन बांधण्यात आला होता. विशेष म्हणजे, त्याने घराजवळच्या माजिवाडा परिसरात भाड्याने एक खोली घेतली होती आणि त्याच्या कुटुंबातील कोणालाही याबद्दल माहिती नव्हती. त्याला बहुधा मानसिक आजार ही होता. तशाप्रकारची काही औषधेही पोलिसांनी जप्त केली होती.

हल्ल्यातून वाचलेली बहीण सबिया युसूफ भारमलने पोलिसांना सांगितलं होतं, की हसनैन त्याच्या मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या धाकट्या बहिणीवर बलात्कारही करायचा.

हे हत्याकांड घडल्यावर संपूर्ण ठाणे हदरलं होतं. आज ही या घटनेचा उल्लेख झाला तरी तिथल्या लोकांना ही काळरात्र आठवते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.