जिकंण्यासाठी निवडणूक लढवणारे लाख असतात, पण हरण्यासाठी लढणारा हा गडी अतरंगी आहे
सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पंजाब, गोवा, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या बातम्यांनी सगळं सोशल मिडिया भरलेलं आहे. काही ना काही खडाजंगी चालूच आहे. प्रत्येकाचं एकच ध्येय आहे ते म्हणजे निवडणूक जिंकण्याचं. कोणत्या तरी पार्टीचं तिकीट मिळावं आणि आपल्याला निवडणूक लढवता यावी यासाठी अनेकांना झटताना आपण बघतो. तिकीट मिळालं की निवडणूक जिंकण्यासाठी अगदी प्राणपणाने ते प्रयत्न करतात. नाही नाही त्या देवाकडे जाऊन प्रार्थना करतात. पण निवडणूक हरावी म्हणून कुणी प्रार्थना करतंअसं ऐकलं तर तुम्हाला विश्वास बसेल का?
निवडणुकीमध्ये उभ राहायचं ते हरण्यासाठीच असं कुणाचं तरी स्वप्न असू शकतं, असं ऐकलं की आश्चर्याच वाटेल. असं कुणी का करेल? हाच प्रश्न येतो. पण अशा एका अतरंगी व्यक्तीबद्दल सध्या खूप चर्चा होतीये, जो निवडणूक हरण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवूनच निवडणुकीमध्ये उतरतो. आणि अशा १०० निवडणुका हरायचा निर्धार या व्यक्तीने केलाय. म्हणूनच यंदाच्या उत्तर प्रदेश निवडणुकीतही त्यांनी तिकीट मिळवलं आहे. या व्यक्तीचं नाव आहे हसनू राम आंबेडकरी.
कोण आहेत हसनू राम आंबेडकरी? आणि हे वेड त्यांना कसं लागल?
हसनू राम युपीच्या खेरागड तहसीलमधील नागला दुल्हा इथले रहिवासी आहेत. त्यांना असं अनोखं वेड लागण्याचं कारण सुद्धा तितकंच अनोखं आहे. सुमारे ४ दशकांपूर्वी एका मोठ्या राजकीय पक्षाने त्यांना निवडणुकीत उमेदवार बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, ऐनवेळी पक्ष आपल्या आश्वासनावरून मागे गेला आणि हसनू राम यांचं तिकीट काढून घेण्यात आलं. इतकंच नाही तर तिकीट काढून घेताना हसनू राम यांना असंही बोलण्यात आलं होतं की, तुम्हाला तर तुमचे शेजारी सुद्धा मत देणार नाहीत. मग निवडणुकीत उभं राहून करणार काय?
बस्स. हीच गोष्ट हसनू राम यांच्या काळजाला लागली. आणि तेव्हा त्यांनी भीष्मप्रतिज्ञा केली. यानंतरच्या सगळ्या निवडणुकीत मी उभं राहणार आणि तेही फक्त हरण्यासाठी. हरण्याचा रेकोर्ड तयार करण्याच्या आशेने तेव्हापासून हसनू राम निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यांची हरण्याची इच्छाही अशी आहे की, आतापर्यंत ९३ वेळा अध्यक्ष ते गावप्रमुखापर्यंतची निवडणूक ते हरले आहे. आतापर्यंत हसनू राम यांनी राष्ट्रपती, खासदार, आमदार, ब्लॉक प्रमुख, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य या पदांसाठी निवडणूक लढवल्या आहे. आणि यशस्वीपणे ते प्रत्येक निवडणूक हरले आहेत.
हसनू राम त्यांच्या नावामागे आंबेडकरी लावतात यामागेही कारण आहे?
हसनू राम हे एकेकाळी डाव्या संघटनेशी संबंधित होते. डॉ.बी.आर.आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान ते मानतात. आणि म्हणूनच हसनू राम यांनी आपल्या नावापुढे आंबेडकर जोडले आहे.
हसनू राम आंबेडकरी हे सध्या मनरेगा अंतर्गत मजूर म्हणून काम करतात. पण ते नेहमी मजूर नव्हते, तर सरकारी कर्मचारी होते. हसनू राम हे महसूल विभागात कार्यरत होते. पण, राजकीय पक्षाचं तिकीट मिळेल या आशेने त्यांनी समाजसेवा करण्यासाठी नोकरी सोडली. परंतु, नोकरी सोडल्यानंतरही त्यांना पक्षाचं तिकीट मिळालं नाही. तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी नंतर समाज सेवा सोडली नाही. अजूनही त्यांनी त्यांचं आयुष्य समाजसेवेसाठी दिलं आहे.
मनरेगा कामगार होऊनही हसनू राम त्यांची निम्मी कमाई समाजसेवेत खर्च करतात.
गेल्या वर्षी झालेल्या पंचायत निवडणुकीतही हसनू राम यांनी पंचायत सदस्यासाठी फॉर्म भरला होता. त्यावेळी हसनू राम म्हणाले होते की, ‘मी जिवंत असलो तर २०२२ ची यूपी विधानसभा निवडणूक नक्कीच लढवीन. आणि त्यानंतरही मी शंभरची मतमोजणी पूर्ण होईपर्यंत प्रत्येक निवडणूक लढत राहीन.’ त्याचनुसार आता हसनू राम त्यांच्या ९४ व्या निवडणुकीत हरण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी युपी विधानसभेचं तिकीट त्यांनी मिळवलं आहे.
हसनू राम यांचा हा १०० निवडणूक हरण्याचा नाद खरंच जगावेगळा आहे. माणसाला कशाचंही वेड असू शकतं हेच हसनू राम सिद्ध हरतात. पण असा नाद असणारे ते एकटे नाहीये हे विशेष. असा एक व्यक्ती आपल्या भारतात आहे ज्याने आतापर्यंत सगळ्यात जास्त निवडणूक हरण्याचा रेकॉर्ड आधीच केला आहे. जवळपास २०० निवडणूक तो व्यक्ती हरला आहे. त्याचं नाव आहे पद्मराजन.
पद्मराजन तामिळनाडूचे राहणारे असून लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये त्यांचं नाव नमूद झालं आहे.
हे ही वाच भिडू :
- पालक खाऊन नाद्याबाद कामं करणारा पोपॉय खऱ्या आयुष्यात होऊन गेलाय
- कोल्हापूरच्या राजकारणाचा नाद कुठं करताय? अमेरिकेत पण नगरसेविका निवडून आलीय
- गोल्डनमॅन बप्पीदाच्या गाण्याने मायकल जॅक्सनला सुद्धा वेड लावल होतं
- कोकण रेल्वे म्हणजे वेड्या माणसांनी पाहिलेलं वेडं स्वप्न होतं.