टिळकभक्त असलेल्या उर्दू शायर मौलानांचा भारतातील कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेत पुढाकार होता.

आज काल इतिहासाला दोन हिश्श्यात वाटायची आपल्याकडे चढाओढ लागलेली दिसते. प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तीच्या कार्याला त्यांच्या जातीधर्माच्या आधारे मूल्यमापन करण्याची चूक केली जाते.

यातूनच काहीजण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे विशिष्ट जातीपुरते मर्यादित असलेले फक्त पुण्याचे नेते होते अशी प्रतिमा बनवतात, पण टिळक हे स्वातंत्र्यलढ्याचे राष्ट्रीय पातळीचे नेतृत्व करत होते हे निर्विवाद सत्य होते.

याचं उदाहरण म्हणजे त्यांचे अनुयायी असलेले उर्दू शायर हसरत मोहानी

हसरत मोहानी यांचा जन्म उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील मोहन या गावी झाला. त्यांचं खरं नाव सय्यद फझल उल हसन. वडील मोठे जमीनदार होते. त्यांच्यामुळेच शायरीचा शौक निर्माण झाला.

शायरी साठी म्हणून त्यांनी आपल्या गावाचं नाव लावलं व ते बनले हसरत मोहानी.

पुढे जाऊन अलिगढ मुस्लिम विद्यापीठ बनलेल्या मोहमेडण अँग्लो इंडियन स्कुल मध्ये त्यांचं शिक्षण झालं. कॉलेजमध्ये ते इंग्रजीचे फर्स्टक्लास टॉपर होते. त्यांचं मुस्लिम धार्मिक शिक्षणही झालं होतं.

म्हणूनच त्यांना मौलाना हसरत मोहानी याा नावाने ओळखत.

त्याकाळी त्यांना सबजजची नोकरी चालून आली होती पण इंग्रजांची नोकरी करायची नाही या सबबी खाली त्यांनी ती ठोकरून लावली आणि स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.

1908 साली त्यांनी सुरू केलेल्या उर्दू इ मोहल्ला या मासिकात छापून आलेल्या एका लेखामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाची केस केली.

आपण न लिहिलेल्या लेखाबद्दल हसरत मोहानी यांनी सक्त मजुरीचा कारावास झेलला.

जेल मध्ये असताना त्यांना उलट टांगून मारलं जायचं. रोज वीस किलो गहू दळून घेतलं जायचं. याच वेळी त्यांची बायको गरिबीमुळे दुसऱ्याच्या घरी दळण दळून पोट भरत होती. ते म्हणायचे,

“है मश्के-सुख़न जारी, चक्की की मश्क्कत भी इक तुरफ़ा तमाशा है, ‘हसरत’ की तबीयत भी।।”

हसरत मोहानी यांना एकदा ब्रिटिशांचा दंड भरण्याइतपतही पैसे नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या गझलांचे पुस्तक विकून दंड वसूल करून घेतला.

स्वातंत्र्यलढ्यामुळे वारंवार झेलायला लागलेला तुरुंगवास हसरत मोहानी यांच्यातील काव्य प्रतिभेला चालना देणारा ठरला. निम्म्या गझल त्यांनी तुरुंगवासात लिहिल्या आहेत.

भारतीय स्वातंत्र्याची प्रतीक ठरलेली, शहिद ए आझम भगतसिंग यांच्या मुळे प्रसिध्द झालेली

इन्कलाब झिंदाबाद ही घोषणा सुद्धा त्यांनीच लिहिली होती.

ते कृष्ण भक्त होते. मुस्लिम धर्मात जन्मलेला हा मौलाना जेलमध्ये बासरी वाजवत भगवान श्रीकृष्णावर कविता करायचा हे आजच्या जमान्यात न पटणारी गोष्ट.

मथुरा नगर है आशिकी का,
दम भरती है आरजू उसी का
हर जर्रा सर ज़मीने गोकुल,
वारा है जमाले दिलबरी का

11 वेळा हजची वारी करणाऱ्या मौलाना मोहानी यांचा हिंदू मुस्लिमांच्या गंगा जमुनी तहजीब वर पूर्ण विश्वास होता.

कविता आणि राजकारण या दोन्ही गोष्टींवर त्यांचं प्रभुत्व होतं.

लोकमान्य टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अर्ज विनंत्या करून स्वातंत्र्य मिळणार नाही हे त्यांचं मत मोहानी यांना पटायचं. टिळकांच्या स्वदेशीच्या संदेशाने त्यांना भारावून टाकलं होतं.

एकदा ते आपल्या मित्राच्या घरी झोपायला गेले होते, तिथे त्यांच्या मित्राने एक ब्लॅंकेट दिलं. दुसऱ्या दिवशी पाहतो तर हसरत साहेब थंडीने कुडकुडत झोपले आहेत. तेव्हा हसरत साहेब म्हणाले,

ते विदेशी ब्लँकेट मी कसं वापरू. मी तर टिळक भक्त आहे.

टिळकांच्या मृत्यूनंतर हसरत मोहानी हे आतून मोडून पडले होते. याच दुःखात त्यांनी एक शायरी लिहिली,

मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से सिधारे आज तिलक
बलवन्त तिलक, महराज तिलक, आज़ादों के सरताज तिलक
जब तक वो रहे, दुनिया में रहा हम सब के दिलों पर ज़ोर उनका
अब रहके बहिश्त में निज़्दे-ख़ुदा हूरों पे करेंगे राज तिलक
हर हिन्दू का मज़बूत है जी, गीता की ये बात है दिल पे लिखी
आख़िर में जो ख़ुद भी कहा है यहीं फिर आएंगे महराज तिलक

हसरत मोहानी यांनी मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पहिल्यांदा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.

हीच मागणी पुढे काही वर्षांनी सुभाषबाबू आणि पंडित नेहरू यांनी काँग्रेसमध्ये भांडून मंजूर करून घेतली व इतिहास घडवला.

महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना यांच्या सारख्या नेत्यांना भर सभेत खडसावणारे हसरत मोहानी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे एकाच पक्षात टिकणे अवघड होते. त्यांनी अनेक पक्ष बदलले.

भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

भारताच्या संविधान बनवणाऱ्या संसदेच्या सभेमध्ये त्यांचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांची मैत्री होती. पण मुस्लिमांबद्दलच्या अपेक्षा या संविधानात पूर्ण होत नाहीत या कारणामुळे त्यांनी संविधानावर सही केली नाही.

पण मोहम्मद जिना यांनी आमंत्रण दिलेले असूनही हसरत मोहानी हे फाळणीनंतर पाकिस्तानला गेले नाहीत.

13 मे 1951 रोजी भारतीय भूमीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या हजारो गझला, हजारो शेर प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्या साठी ब्रिटिशांच्या लाठ्या झेलणाऱ्या हसरत मोहानी यांनी हळुवार प्रेमाच्या कविताही केल्या.

चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है
हम को अब तक आशिकी का वो ज़माना याद है

ही त्यांची एक गझल गुलाम अली यांनी अजरामर करून ठेवली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.