क्रांतिसिंहांच्या लेकीने तान्ह्या बाळाला माघारी सोडून क्रांतिकार्यात उडी घेतलेली

स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीचा काळ. सातारा सांगली भागात एक वादळ घुमत होतं. हे वादळ साधं नव्हतं तर त्या वादळाने सातासमुद्रापार इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना घाम फोडला होता. या वादळाच नाव म्हणजे,

प्रति सरकार 

१९४२ च्या चले जावं आंदोलनानंतर  क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली खेड्यापाड्यातील तरुण पोरं गोळा झाली आणि त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारी सरकार विरुद्ध शस्त्र बंड उभा केलं. हे साधं बंड नव्हतं तर त्यांनी आपल्या भागातून इंग्रजांना पिटाळून लावलं. तिथला कारभार हातात घेतला. स्वातंत्र्य मिळायच्या आधी स्वातंत्र्याची चव सातारा सांगलीच्या लोकांना चाखायला मिळाली.

या प्रति सरकारमध्ये नाना पाटलांनी सशस्त्र सेना उभारली होती. त्यांच्या क्रांतिकारकांमध्ये ध्येयवेडे तरुण होतेच शिवाय या क्रांतीच्या यज्ञामध्ये महिलांनी देखील तितक्याच जिद्दीने सहभाग घेतला होता.

यातच होती क्रांती सिंहाची पोटची लेक हौसाबाई पाटील 

हौसाबाई फक्त ३  वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांच्या आईचे निधन झालं. वडलांनी तर केव्हाच नोकरी घरदार सोडून देशाला स्वतंत्र करायचा वसा हाती घेतला. ते भूमिगत असल्यामुळे हौसाबाईंना त्यांच्या आज्जीनेच अत्यंत हाल अपेष्टा सहन करून वाढवलं.

क्रांतिसिंहांच रक्त वाहणाऱ्या हौसाबाईंनी अत्यंत कमी वयात स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यांचं लग्न देखील प्रतिसरकारचेच प्रमुख कार्यकर्ते असणाऱ्या भगवानराव पाटील यांच्याशी गांधी पद्धतीने झालं होतं. त्यामुळे लग्नानंतर देखील क्रांतिकार्याचा वसा तसाच सुरु राहिला.

प्रतिसरकारच्या क्रांतीकारकांना जेवण पोहचवणे, त्यांच्यातील संदेशाची देवाणघेवाण करणे इतकंच काय तर पत्रीसरकारला लागणाऱ्या हत्यारांची ने-आण करणे, अशी कामं देखील त्यांनी केली.

बीबीसी मराठी या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी या बद्दलची एक आठवण सांगितली होती.

त्याकाळात शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी क्रांतीकारक पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याला जात व तिथून हत्यारांची सोय  करत.अशाच कामगिरीवर असलेल्या बाळ जोशी नावाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आणि गोव्यातल्या पणजी येथील तुरुंगात ठेवलं. आता तुरुंगात अडकलेल्या बाळ जोशींना भेटून प्रतिसरकारचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता. पण हा निरोप पोहोचवणार कोण? याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली.

अखेर या कामगिरी साठी हौसाबाई पाटलांना पाठवायचं ठरलं.

पण हौसाबाई नुकताच बाळंत झाल्या होत्या. त्यांचं चार महिन्याचं बाळ तेव्हा आजारी होतं. कार्यकर्त्यांनी मात्र तरीही आग्रह धरला. शेवटी विषय क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत आला.

त्यावर नाना पाटील म्हणाले ‘मी तिला जा ही म्हणार नाही आणि थांबही म्हणणार नाही. मात्र माझी मुलगी म्हणून तिने बाप करत असलेल्या कार्याला शोभेल असे वागावे’.

नाना पाटलांचे हे उद्गार ऐकताच हौसाबाई पाटलांनी आपल्या बाळाला आत्याजवळ सोडलं आणि बाळ जोशींना भेटण्यासाठी रवाना झाले. तिथं पोहोचून त्यांना सांगितलेली कामगिरी पार पाडली.

हौसाबाई सांगतात,

माघारी परतताना इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आडवाटेने चालायला सुरुवात केली. या मार्गात असलेली मांडवी नदीची खाडी मी पोहत पार केली. पुढे जंगलातून अनवाणी चालत वाट शोधत घरी पोहोचले. कामगिरी पार पाडून सुखरूप घरी आले तेव्हा मात्र दादांनी मला मिठी मारत हंबरडा फोडला.’

अशीच दिवसाढवळ्या पोलीस स्टेशन मधून शस्त्रास्त्रे लुटण्याची कामगिरी देखील त्यांनी बजावली होती. सांगली जिल्ह्यातील भवानीनगर येथे पोलीस स्टेशन मध्ये हौसाबाई व त्यांचा एक सहकारी बहीण भाऊ बनून गेले आणि बहीण सासरी नांदत नाहीत या कारणावरून भांडण केलं. पोलीस स्टेशनमध्ये दोघांनी वादावादीचे नाटक केलं आणि हा मौका साधून त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी बंदुका घेऊन तिथून पाबोरा केला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील त्यांनी व त्यांचे पती भगवानराव पाटील यांनी नाना पाटलांनी सोपवलेला समाजसेवेचा पुढे नेला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून शेकाप मध्ये प्रवेश केला. १९५७ साली भगवानराव पाटील संयुक्त महाराष्ट्र समितीच्या तिकीटावर निवडून देखील आले. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गिरणी कामगारांचा प्रश्न, अन्नधान्याचा लढा, दुष्काळनिवारणासाठीचे प्रयत्न, जनवऱ्यांच्या छावणी अशा अनेक समस्यांसाठी त्यांनी लाल बावटा तळपत ठेवला. हौसाबाई पाटलांची त्यांना समर्थ साथ राहिली.

नाना पाटलांचे अखेरचे काही दिवस हौसाबाईंच्या हणमंत वडीये या गावी गेले. अशा या सिंहाची लेक म्हणून हौसाबाई राजकीय व सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत राहिल्या. वयाची नव्वदी पार झाल्यावर देखील त्यांची राजकीय मते अगदी ठाम होती. त्या नेहमी म्हणायच्या,

“सध्याचं सरकार गोरगरिबांवर अन्याय करणारे आहे आणि माझं वडील क्रांतीसिंह नाना पाटील जिवंत असतं तर त्यांनी 3 दिवसापेक्षा जास्त दिवस हे सरकार ठिवलं नसतं, कधीच त्याला बाजार दाखवला असता.”

अशा या रणरागिणी क्रांतिकन्या हौसाबाई पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.