कोर्टाच्या सुनावणीत हुक्का आणि कोका कोला पिताना कधी पाहिलंय का भिडू..

न्यायव्यवस्था आपल्या लोकशाहीचा तिसरा पण महत्वाचा स्तंभ. अपराध्यांना शिक्षा आणि पीडितांना न्याय देण्याचं काम न्यायपालिका करते. त्यामुळे कोर्टाचा मान हा प्रत्येकाला ठेवावाच लागतो. मग तो तुमच्या आमच्या सारखा आम आदमी का असेना, कोणी मोठा सेलिब्रिटी का असेना किंवा कोणी मोठा नेता. कोर्टरूममध्ये सगळेच एकदम सिरीयस मोडमध्ये असतात. 

म्हणजे आपण पिक्चरमध्ये बघतोच कि, कोर्टात एखाद प्रकरण सुरु असताना कुणी साधा आवाज जरी वरचढ केला तरी जज साहेब लगेच ऑर्डर ऑर्डर करून चिडीचूप बसायला लावतात. मग काय सॉरी आपोआप ऐकायला मिळत. आणि एखाद्याने जर जास्तचं नखरे केले तर डायरेक्ट शिक्षाचं. 

 पण कोरोना व्हायरस आला. सगळं टाईमटेबल बदललं आणि रुटीन लाईफमध्ये व्हर्चुअल नावाच्या शब्दाने स्वतःची वेगळी इमेज बनवली. मग शाळेत- कॉलेजात लेक्चर करायचं असलं, ऑफिस किंवा बिजनेस मीटिंग करायची असलं किंवा आपल्या नातेवाईकांशी बोलायचं असलं व्हर्च्युअल मोड नेहमी ऑन  ठेवायला लागतोय. आणि या व्हर्च्युअल जगात कोर्टाला सुद्धा सुट्टी मिळाली नाही. 

सगळीच कोर्ट ऑनलाईन पद्धतीचा वापर करायला लागली. कोर्टाची प्रकरण ऑनलाईनचं मार्गी लावायला सुरुवात झाली. आता ऑनलाईन का असेना कोर्टाचा मान ठेवायला लागतोय. पण जशी शाळा कॉलेजातली काही पोरं ऑनलाईन लेक्चरला हलक्यात घ्यायची, तसचं कोर्टाच्या सुनावणीच्या वेळीसुद्धा झालं. 

कोर्टाची ऑनलाईन सुनावणी सुरु असताना किंवा महत्वाच्या प्रकरणावर निर्णय देत असताना असे काही कांड पाहायला मिळाले कि मीडियापासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे नुसत्या चर्चा रंगल्या. 

ऑनलाईन सुनावणीत वकिलांचा हुक्क्याचा धूर

 

राजस्थान हायकोर्टात एक ऑनलाईन सुनावणी सुरु होती. यावेळी कपिल सिब्बल सारखे प्रसिद्ध नेते आणि वकील सुद्धा होते. या सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील राजीव धवन पेपरच्या आड हुक्का मारताना दिसले. हे करताना धवन यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. पेपरच्या आड जरी वकील साहेबांनी हुक्का मारला तरी धुराचे लोट मात्र स्वतः ला अडवू शकले नाही.

 

पोलिसांना थंडा पिताना बघून जज साहेब तापले

गुजरात उच्च न्यायालयात एका प्रकरणाची व्हर्च्युअल सुनावणी सुरू होती. बरेचसे वकील आणि जज यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी ए.एम. राठोड कोका कोलाचे सिप घेताना दिसले. पोलिसांना थंड पिताना पाहून जज साहेब मात्र तापले. म्हणाले- ‘हे  अधिकाऱ्यांचं काम आहे का? तो फिजिकल कोर्टात असता तर कोका-कोला घेऊन आला असता का?’

एवढेच नाही तर न्यायाधीशांनी पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून बार असोसिएशनमध्ये कोका कोलाचे १०० कॅन वाटण्याचे आदेश दिले. आणि तसं नाही केलं तर मुख्य सचिवांना अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यास सांगितले.

व्हर्च्युअल सुनावणीत सिंगरची एन्ट्री

अभिनेत्री जुही चावलाने देशात ५जी नेटवर्कच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच प्रकरणाची  त्याची ऑनलाइन सुनावणी सुरू होती. तेव्हाच एका व्यक्तीने जुहीच्या १९९३ साली आलेल्या  ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटातील ‘घुंगट की आड से दिलबर का’ हे गाणं गेला सुरुवात केली.

एकदम सिरीयस सुरु असलेल्या सुनावणीत एकदम गाणं ऐकून भडकलेल्या  न्यायाधीशांनी त्याला  गप्प बसायला सांगितलं. पण भिडू काय गप्प बसेना. ते गाणं सुरु होतचं तेवढ्यात कोणीतरी दुसरं गाणं म्हणायला सुरुवात केली, ​​’लाल लाल होंटो पे गोरी किसका नाम है’.

यानंतर सुनावणी करणारे हायकोर्टाचे न्यायाधीश चांगलेच भडकले आणि त्यांनी त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अवमानाची नोटीस बजावायला सांगितलं. आता तस पाहिलं तर यात चूक नाही म्हणतात तरी जुही मॅडमची होती. त्यांनी आपल्या सोशल अकाउंटवरून व्हर्च्यूवल सुनावणीची लिंक शेअर करून इन्व्हाईट केलं होत. आता जुही मॅमचे फॉलोवर्स काय कमी आहेत का? आणि लोक जेव्हा येणार तेव्हा कांड तर होणारच. 

 

सुट्टा मारण्यापासून स्वतःला कंट्रोल नाही करू शकले वकील साहेब

गुजरात उच्च न्यायालयात एका प्रकरणाची व्हर्च्युअल सुनावणी सुरू होती. यादरम्यान वकील जे.व्ही. अजमेरा स्वतः ला कंट्रोल करू शकले नाही. आणि साहेबांनी कारमध्ये बसून सुट्टा प्यायला सुरुवात केली. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि साहेबाना १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

कोर्टानं ब्रश आणि दाढी करायला पण वेळ दिला नाही

केरळ उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान ही घटना घडली. सुनावणी सुरु असतानाच एक व्यक्ती बाथरुममध्ये फिरत ब्रश आणि दाढी करताना दिसली.

899ae504 8885 4240 9b2c 3be509d5044c.jpg

आता हे किस्से एवढंच नाहीत, व्हर्च्युअल सुनावणी दरम्यान कोणी तंबाकू चघळताना दिसलं, कोणी जेवताना, कोणी मस्त पलंगावर पडून होत, कोणी गाडीवर जाता जाता सुनावणी अटेन्ड करत होत, कोणी बनियानवरचं सुनावणीत घुसलं आणि अशा बऱ्याच घटना सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.