एका महानगरपालिकेच्या प्रचारात अमित शहांपासून ते योगीजी का उतरले आहेत?

साडे पाच हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, एक कोटी पेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर, ८२ लाख मतदार, ५ लोकसभेच्या जागा, २४ विधानसभेच्या जागा. हा सगळा अवाढव्य पसारा आहे,

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचा.

ज्यामध्ये सध्या निवडणूक होत आहे, आणि भाजपने ती प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे बिर्याणीसाठी प्रसिद्ध असं आपल्या तोंडावर सतत येणारे हैदराबादचे नाव हल्ली तिथल्या निवडणूकीमुळे येवू लागलं आहे.

तेलंगणा राज्याच्या या राजधानीत मागील पाच ते सहा दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापासून ते केंद्रीय मंत्र्यांसह भाजप शासित राज्यांचे आजी – माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार तळ ठोकून आहेत.

याच कारणामुळे आज सबंध देशात या महानगरपालिकेच्या निवडणूकीची चर्चा चालू आहे.

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल कसे आहे?

महानगरपालिकेतील १५० जागांसाठी १ डिसेंबरला मतदान आणि ४ डिसेंबरला इथे मतमोजणी होणार आहे. यानंतर महापौर कोण आणि कोणत्या पक्षाचा होणार याचे उत्तर मिळेल.

पण स्थानिक पातळीवर देखील राज्यातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे वर्चस्व आहे.

मागच्या निवडणूकीत १५० पैकी ९९ जागा टीआरएसला मिळाल्या होत्या. तर ४४ जागांवर एमआयएमने विजय मिळवला होता. तर भाजपला ४ जागांवर समाधान मानावे लागले होते.

यंदा प्रचारासाठी कोण कोण आहे मैदानात?

महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रचार हा कायमच स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर होत असतो. आपण देखील रस्ते, पाणी, वीज, कचरा या अशांच मुद्द्यांवर आजपर्यंत निवडणूका झालेल्या बघितल्या.

त्यामुळे अशा निवडणूकांमध्ये स्थानिक नेतृत्व, नगरसेवक, आमदार आणि तिथले खासदार असे सगळे प्रचारात असतात. तिथे जर राज्यातील मुख्यमंत्री, किंवा एखादा मोठा नेते प्रचाराला गेले तरी आपल्या भुवया उंचवतात.

पण भाजपने हैदराबाद महानगरपालिका निवडणूकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, दुसरे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, उत्तरप्रदेशचे फायरब्रॅन्ड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक आमदार-खासदार यांना प्रचारात उतरवल आहे.

योगी आदित्यनाथ यांनी तर

‘हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलोय…’

या एका वाक्यातच आपला इरादा स्पष्ट केला.

राज्याची रणनिती तयार करणाऱ्यांना महानगरपालिकेची जबाबदारी.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनिती तयार करणारे भुपेंद्र यादव यांच्याकडे हैदराबाद महापालिका निवडणुकांची जबाबदारी पक्षाने दिली आहे. बिहारमधील एनडीएचा विजय आणि भाजपची उत्तम कामगिरी निश्चित करण्यासाठी भुपेंद्र यादव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

भाजपने ही निवडणूक किती प्रतिष्ठीत केली आहे, याविषयी हैदराबादच्या डेक्कन क्रॉनिकलचे निवासी संपादक श्रीराम कर्री सांगतात,

हैदराबाद महानगरपालिकेसाठी एवढ्या वरच्या पातळीवर जावून अशा प्रकारचा प्रचार यापुर्वी कधीच झालेला नाही.

मागील निवडणूकीत तर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव देखील प्रचारासाठी आलेले नव्हते. त्यांच्या मुलानेच सगळी रणनिती तयार केली होती. पण यंदा भाजपने आक्रमक प्रचाराची अवलंबलेली रणनिती बघता त्यांना स्वतः या प्रचारात उतरण भाग होतं. असे ही कर्री सांगतात.

राज्यात कोणता पक्ष किती स्ट्रॉंग आहे?

तेलंगणा राज्यात २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ११९ पैकी टीआरएसला ८८, कॉंग्रेस १९, एमआयएमला ७ आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता.

चंद्रशेखर राव हे दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले.

यात सर्वाधिक ४६ टक्के मत टीआरएसला, २८ टक्के कॉंग्रेसला, भाजपला ७ टक्के आणि एमआयएमला २.७ टक्के मत मिळाली होती.

तर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही १७ पैकी ९ टीआरएसने आणि तर ४ जागा भाजपने जिंकल्या होत्या.

अशा टीआरएसचे प्राबल्य असलेल्या या राज्यात सध्या महानगरपालिका निवडणूकीच्या माध्यमातुन भाजप इथे उभे राहण्यासाठी जागा करत आहे. आणि एका विधानसभेच्या पोटनिवडणूकीने त्यांचा हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत केल्याचे दिसून येत आहे.

दुबक्का जागेवरच्या विजयाने आत्मविश्वास वाढला….

गेल्या चार वर्षात भाजपची स्थिती किती बदलली आहे? याचे उत्तर म्हणजे राज्यातील दुबक्कामध्ये अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मिळवलेला विजय.

हा भाग मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच केसीआरचा ‘गड’ मानला जातो. इथल्या शेजारच्याच गजवेल मतदारसंघातुन ते स्वतः निवडून जातात. पण दुबक्का या जागेवर भाजपने १००० मतांनी विजय मिळवला. हा विजय राज्यातील स्थिती बदलण्याचा संकेत म्हणून भाजप पाहात आहे.

दुबक्कातील पोटनिवडणुकीत राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुतणे हरीश राव यांच्यावर टीआरएसची जबाबदारी होती. राव यांची प्रतिमा उत्तम निवडणूक रणनीतिकार म्हणून आहे. पण असे असूनही त्यांच्या पक्षाला दुबक्कामध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

या पोटनिवडणूकीत भाजपच्या मतांची टक्केवारी १३.७५ वरुन वाढून ३८.५ झाली.

यामुळेच राज्यात आणि स्थानिक पातळीवर स्ट्रॉंग नसलेल्या भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे राजकीय जाणकार सांगतात. आणि याच आत्मविश्वासातुन त्यांनी महानगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

भाजपसाठी ही निवडणूक इतकी महत्वाची का? या प्रश्नांची राजकीय विश्लेषक आणखी तीन ते चार कारण सांगतात,

त्यातील पहिले आणि सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे ग्रेटर हैदराबादचे तेलंगणामधील महत्व. महानगरपालिका क्षेत्रात जवळपास विधानसभेच्या २४ जागा येतात. तर बजेट साडेपाच हजार कोटी इतके आहे. तेलंगणाच्या जीडीपीचा सगळ्यात मोठा हिस्सा याच शहातुन येतो. त्यामुळे इथे सत्तेत येवून भाजप एक प्रकारे आपल्यासाठी राज्यातील सत्तेचे दार उघडू पाहत आहे.

दुसरे कारण, २०१७ मध्ये पक्षाध्यक्ष असताना अमित शहा यांनी  ठेवलेले लक्ष. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपची पंचायत ते पार्लमेंट अशी सत्ता आणण्यासाठी मैदानात उतरा असे म्हंटले होते. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

तिसरे कारण म्हणजे, टीआरएसमधील अंतर्गत राजकारण.

भाजपला वाटत आहे, चंद्रशेखर राव यांचा पुतण्या हरिश राव आणि मुलगा के टी रामा राव यांच्यातील विसंवाद. आजपर्यंत पुतण्या हरिश राव यांना पक्षाचे निवडणूक रणनितीकार मानले जात होते. पण मागील काही दिवसांपासून केटी रामा राव यांच पक्षातील वजन वाढलं आहे.

हैदराबाद महानरपालिकेची मागील निवडणूक केटी रामा राव यांच्याच नेतृत्वात टीआरएसने जिंकली होती. तर चंद्रशेखर राव यांनी देखील मुलालाच झुकत माप दिल्याचे दिसून येते.

चौथी गोष्ट म्हणजे अनेक प्रयत्नानंतर दुब्बाकच्या पोटनिवडणूकीत कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. आजपर्यंत तेलंगणामधील पक्षीय रचनेत भाजप चार नंबरला होती. पण कॉंग्रेस पक्षाची खराब कामगिरी बघता स्ट्रॉंग पार्टी म्हणून भाजप वर येवू पाहत आहे.

सोबतच एमआयएमला आजपर्यंत इतर राज्यात कायम कॉंग्रेसची मुस्लिम मत खाणारा पक्ष म्हणून भाजपची बी-टीम असं समजलं जाते. भाजपला हा गैरसमज सध्या दुर करायचा आहे.

महानगरपालिका निवडणूकीत धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण…

राजकीय विश्लेषक जिनका नागाराजू या ध्रुवीकरणाच्या राजकारणाबद्दल सांगतात, आजपर्यंत रस्ते, वीज, पाणी याच्या पलिकडे न गेलेली ग्रेटर हैदराबादची निवडणूक यंदा पहिल्यांदाच मुसलमान, सर्जिकल स्ट्राइक, बांग्लादेश, आणि पाकिस्तान या प्रश्नांकडे गेली आहे.

राज्यात सगळ्यात जास्त प्राबल्य टीआरएसच आहे. तर हैदराबादमध्ये एमआयएमचा प्रभाव जास्त आहे. जवळपास ४० टक्के शहर हे मुस्लीम बहुल आहे. आणि असदुद्दीन औवेसी खासदार देखील इथूनच आहेत. 

नागाराजू पुढे सांगतात, भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या निवडणूकीत रोहिंग्या मुस्लीमांचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच अकबरुद्दीन ओवैसी आणि असदउद्दीन ओवैसी यांनी रोहिंग्या मुस्लीमांचा विकास करण्याचे काम केल्याचा आरोप केला.

त्यामुळेच ओवेसींना वोट म्हणजे भारतविरोधी वोट असल्याचा प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे. सोबतच भाजप सत्तेत आल्यानंतर रोहिंग्या मुस्लीम आणि इथे अवैध राहणारे पाकिस्तानी नागरीक यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

स्मृती इराणी देखील या मुद्द्यावर बोलण्यात मागे नव्हत्या.

याचे उत्तर देताना औवेसी म्हणाले, जर रोहिंग्या मुस्लीम आणि पाकिस्तानी इथे राहतात तर सिकंदराबादचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी अजून शांत कसे काय आहेत? असा सवाल त्यांनी केला.

या सगळ्या गोष्टीमुळे भाजप सध्या या निवडणूकीत सेंटर स्टेजला आहे. आणि त्यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा राबवून एकप्रकारे ‘साइकोलॉजिकल वॉर’ जिंकले आहे. त्यामुळे यंदा हैदराबादमध्ये काहीतरी ‘अनपेक्षित’ पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको इतकेच.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.